Fact Check: 'ते' एकनाथ शिंदे नाहीत; जाणून घ्या, रिक्षासोबत उभा असलेला तो दाढीवाला तरुण नेमका कोण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 04:07 PM2022-07-26T16:07:54+5:302022-07-26T16:20:55+5:30

एक दाढीवाला तरुण आपल्या रिक्षासोबत उभा असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा तरुण दुसरा-तिसरा कुणी नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जातोय. मात्र, 'लोकमत'ने केलेल्या पडताळणीत सत्य वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

Fack Check: It is not CM Eknath Shinde photo with auto rickshaw, he is baba kamble from pimpri chinchwad | Fact Check: 'ते' एकनाथ शिंदे नाहीत; जाणून घ्या, रिक्षासोबत उभा असलेला तो दाढीवाला तरुण नेमका कोण!

Fact Check: 'ते' एकनाथ शिंदे नाहीत; जाणून घ्या, रिक्षासोबत उभा असलेला तो दाढीवाला तरुण नेमका कोण!

googlenewsNext

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत सक्रिय होण्याआधी काही काळ ठाण्यात रिक्षा चालवत असत. 'रिक्षावाला ते मुख्यमंत्री', या त्यांच्या जिगरबाज प्रवासाची चर्चा मीडियात आणि सोशल मीडियातही झाली. 'रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती', असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या विधानसभेतील भाषणाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर, अनेक ठिकाणी रिक्षावाल्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता आणि मग हळूहळू हा विषय आपोआप निवळला होता. मात्र, काल-परवापासून एकनाथ शिंदेंचं रिक्षा कनेक्शन पुन्हा चर्चेत आलंय. कारण, एक दाढीवाला तरुण आपल्या रिक्षासोबत उभा असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा तरुण दुसरा-तिसरा कुणी नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जातोय. मात्र, 'लोकमत'ने केलेल्या पडताळणीत सत्य वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. फोटोतील ती व्यक्ती कोण आणि सध्या काय करते, याचीही माहिती आम्ही मिळवली आहे. 

काय आहे दावा? 

फुलांच्या माळांनी सजवलेल्या रिक्षासोबत एक दाढीवाला तरुण उभा आहे. रिक्षाचा क्रमांक आहे, MH14 8172. हा फोटो १९९७ चा असून त्यात दिसणारा तरुण रिक्षावाला म्हणजेच आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून 'महाराष्ट्र रिक्षा पंचायत'चे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचं 'लोकमत'च्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे. 

कशी केली पडताळणी?

रिक्षाच्या नंबर प्लेटवर MH14 हा कोड आहे. म्हणजेच, या रिक्षाची नोंदणी पिंपरी-चिंचवड आरटीओमधील आहे. त्यामुळे हा फोटो खरंच एकनाथ शिंदेंचा असेल का, अशी शंका आली. 'फॅक्ट चेक'च्या सुरुवातीलाच, शिंदे यांच्या माध्यम समन्वयकांशी संपर्क साधला. त्यात, या फोटोतील व्यक्ती एकनाथ शिंदे नाहीत, असं त्यांच्या टीमने स्पष्ट केलं. 

त्यानंतर, हा फोटो कधीचा, कुणाचा, कुठला आहे, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रिक्षाचं रजिस्ट्रेशन पिंपरी-चिंचवडचं असल्यामुळे 'लोकमत'च्या पिंपरी-चिंचवड प्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यांनी या फोटोतील व्यक्ती बाबा कांबळे असल्याचं सांगितलं. ते महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे ते अध्यक्ष असून ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रचे सरचिटणीस आहेत. १९९६ मध्ये जालन्यातील आपल्या गावाहून पिंपरीत आलेल्या बाबा कांबळे यांनी १९९७ मध्ये स्वत:ची रिक्षा घेऊन परमिट काढले. पिंपरी चौकात रिक्षांचा रातराणी थांबा सुरू झाला. त्याचा अध्यक्ष म्हणून बाबा यांची निवड झाली. सहा आसनी रिक्षांच्या विरोधातील बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा पंचायत या संघटनेच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि रिक्षावाला ते संघटनेचा नेता असा प्रवास यशस्वीपणे केला, अशी माहितीही आमच्या प्रतिनिधींनी मिळवली. 

या फोटोबाबत 'लोकमत'ने बाबा कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून माझा तरुण वयातील आहे. फोटोमध्ये साधर्म्य असल्याने नागरिकांना तो शिंदे यांचा वाटल्याने त्यांच्या नावाने व्हायरल झाले आहे. परंतु, हा माझा फोटो असून, त्यासोबतच्या रिक्षाचा नंबर एमएच १४ (पिंपरी चिंचवड) आहे. तो माझा १९९७ सालीचा रिक्षासह फोटो आहे, असं त्यांनी नमूद केलं.

'बाबा कांबळे रिक्षा' हे की-वर्ड्स फेसबुकवर सर्च केले असता, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे हे अकाउंट सापडलं. त्यावर हा फोटो आणि सविस्तर डिस्क्रिप्शनही आहे. बहुधा तिथूनच हा फोटो घेऊन चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात असावा. 

निष्कर्ष

रिक्षावाल्या तरुणाचा फोटो खरा असून तो १९९७ मधला आहे. मात्र त्या फोटोतील दाढीवाला तरुण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, हा दावा दिशाभूल करणारा आहे.  

Web Title: Fack Check: It is not CM Eknath Shinde photo with auto rickshaw, he is baba kamble from pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.