Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 03:00 PM2024-05-01T15:00:25+5:302024-05-01T15:01:41+5:30
Fact Check: नेपाळच्या संसदेत पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आल्यासंदर्भात व्हिडिओ व्हायरला झाला.
Created By: Fact Crescendo
Translated By: ऑनलाइन लोकमत
भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सातत्याने होताना पाहायला मिळत आहे. प्रचारसभा, मेळावे, बैठका यांवरही मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे झाले असून, तिसऱ्या टप्प्यावर सर्वांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही समर्थक आणि विरोधकांमध्ये वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
याच सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विधिमंडळ किंवा संसदीय सभागृह दिसत आहे. यामध्ये एक नेता पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहे. एका युझरने सदर व्हिडिओ शेअर करता दावा केला आहे की, हे नेपाळचे संसदीय सभागृह आहे आणि तिथे पंतप्रधान मोदींविरोधात टीका केली जात आहे. एका कॅप्शनसह व्हायरल झालेला आहे.
नेपाळच्या संसदेत मोदीजींचे कौतुक केले जाते, जे ऐकून देशभक्ताला अभिमान वाटेल. हे फक्त देशभक्तांनीच ऐकावे.
व्हायरल व्हिडिओसंदर्भातील तपासात समोर आले की...
या व्हायरल व्हिडिओच्या तपासाच्या सुरुवातीला आमच्या लक्षात आले की, व्हायरल व्हिडिओमध्ये पीएम मोदींवर टीका करणाऱ्या व्यक्तीने हिमाचली टोपी घातली होती. याचा आधारे आम्ही व्हिडिओ शोधायला सुरुवात केली. परिणामी, आम्हाला लाइव्ह टाइम्स टीव्ही हिमाचलच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला तोच व्हायरल व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ १७ मार्च २०२१ चा आहे. जगतसिंग नेगी यांनी भाजपवर टीका केल्याचे कॅप्शनमध्ये दिसते. हा व्हिडिओही सभागृहाच्या कामकाजाचा आहे. येथे आपण १ मिनिट ३९ सेकंदाच्या वेळेपासून व्हायरल व्हिडिओचा भाग पाहू शकतो.
हिमाचल काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केलेला हाच व्हिडिओ आम्हाला आढळला.
आम्हाला आमच्या तपासात असेही आढळून आले की, काँग्रेस आमदार जगतसिंग नेगी हे हिमाचल प्रदेश सरकारमध्ये विद्यमान महसूल मंत्री आहेत. नेगी पाचव्यांदा आमदार झाले आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील किन्नौर मतदारसंघातून विजयी झाले. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीची माहिती उपलब्ध आहे.
निष्कर्ष
तथ्यांची तपासणी केल्यानंतर आम्हाला हा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचे आढळून आले. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशच्या सभागृहातील आहे. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी २०२१ मध्ये पंतप्रधान मोदींवर टीका करणारी विधाने केली होती. हा व्हिडिओ नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर टीका केली, अशी दिशाभूल करणारे दावे करून पसरवला जात आहेत.
(सदर फॅक्ट चेक Fact Crescendo या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)