Fact Check: "भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या PMची गरज", असं ऋषी सुनक खरंच म्हणालेत का?... वाचा व्हायरल फोटोमागची 'रिअल स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 05:34 PM2022-10-29T17:34:36+5:302022-10-29T17:46:04+5:30

ऋषी सुनक यांची विधानं, मतं, प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, काही 'फोटोशॉपप्रेमी कलाकार' सुनक यांनी न केलेली विधानंही त्यांच्या नावाने फिरवताना दिसताहेत.

Fact Check: Did Rishi Sunak Say India Needs a PM Like Manmohan Singh? No, claim on viral image is misleading | Fact Check: "भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या PMची गरज", असं ऋषी सुनक खरंच म्हणालेत का?... वाचा व्हायरल फोटोमागची 'रिअल स्टोरी'

Fact Check: "भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या PMची गरज", असं ऋषी सुनक खरंच म्हणालेत का?... वाचा व्हायरल फोटोमागची 'रिअल स्टोरी'

googlenewsNext

ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं 'भारत कनेक्शन' हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते भारतीय वंशाचे असणं, हिंदू असणं, प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई असणं, यामुळे त्यांच्याविषयी वेगळीच उत्सुकता नेटिझन्समध्ये पाहायला मिळतेय. स्वाभाविकच, त्यांची विधानं, मतं, प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र त्याचवेळी, काही 'फोटोशॉपप्रेमी कलाकार' सुनक यांनी न केलेली विधानंही त्यांच्या नावाने फिरवताना दिसताहेत. "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची आज भारताला गरज आहे", अशा आशयाचं विधान ऋषी सुनक यांच्या नावाने व्हायरल होतंय. मात्र, 'लोकमत डॉट कॉम'ने केलेल्या पडताळणीत हा दावा सपशेल दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे दावा?

'अब भक्तों को बहुत तेज़ मिर्ची लगने वाली है' अशा कॅप्शनसह अनेक ट्विटर हँडलवरून २६ ऑक्टोबर रोजी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ऋषी सुनक आणि डॉ. मनमोहन सिंग या फोटोत दिसत आहेत. त्यासोबत, "भारत को सही दिशा और दशा देने कमजोर गिरती अर्थव्यवस्था को सुधारने के लिए मनमोहन सिंह जैसे प्रधानमंत्री की आवश्यकता है'', असं वाक्य ऋषी सुनक यांच्या नावाने देण्यात आलंय. फोटोवर 'दैनिक भास्कर'चा लोगो आहे. म्हणजेच, ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंह यांचं कौतुक केल्याचा दावा करत, आता मोदी अन् भाजपा समर्थकांना मिरच्या झोंबतील, अशी टिप्पणी बऱ्याच ट्विटर युजर्सनी केली आहे. 

कशी केली पडताळणी?

सगळ्यात आधी ऋषी सुनक आणि मनमोहन सिंग हे की-वर्ड्स आम्ही गुगलवर सर्च केले. मात्र, ऋषी सुनक यांनी मनमोहन यांच्याबद्दल कुठलंच विधान (ना कौतुक, ना टीका) केल्याचं दिसलं नाही. ऋषी सुनक यांचं व्हेरिफाईड ट्विटर हँडल तपासलं असता, तिथेही मनमोहन सिंग यांच्याबद्दल कुठलाच उल्लेख नव्हता. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानणारं ट्विट ऋषी सुनक यांनी केलं आहे. 

व्हायरल होणाऱ्या फोटोवर 'दैनिक भास्कर'चा लोगो असल्यानं आम्ही 'भास्कर'च्या फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवर असं काही क्रिएटिव्ह शेअर करण्यात आलंय का, हे तपासलं. तेव्हा व्हायरल फोटोतील ऋषी सुनक आणि मनमोहन सिंग यांच्या फोटोशी साधर्म्य असलेला एक फोटो आम्हाला सापडला, मात्र त्यावरचा मजकूर वेगळा आहे. 

तो असा - "चिदंबरम-थरूर की सलाह, भारत में भी हो अल्पसंख्यक PM: भाजपा बोली - मनमोहन सिंह को भूल गए"

निष्कर्षः 

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर, भारतातही अल्पसंख्याक पंतप्रधान व्हायला हवा, अशी टिप्पणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. त्यावर, मनमोहन सिंग यांना काँग्रेस विसरल्याचा प्रतिटोला भाजपाने लगावला होता. या बातमीसाठी 'दैनिक भास्कर'ने बनवलेल्या क्रिएटिव्हवरील मजकूर बदलून, ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग यांचं कौतुक केल्याचा आणि मोदी सरकारचं अपयश दाखवल्याचा दावा व्हायरल केला जात आहे. तो दिशाभूल करणारा आहे. 
 

Web Title: Fact Check: Did Rishi Sunak Say India Needs a PM Like Manmohan Singh? No, claim on viral image is misleading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.