Fact Check: 'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले?... नाही; 'तो' व्हिडीओ जुना, दावा खोटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:53 PM2022-03-15T16:53:46+5:302022-03-15T16:55:23+5:30

देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रडत असलेला एक व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ जुना असून 'द कश्मीर फाईल्स' पाहून ते रडल्याचा दावा खोटा आहे.

fact check lal krishna advani cried after watching shikara movie, not the kashmir files | Fact Check: 'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले?... नाही; 'तो' व्हिडीओ जुना, दावा खोटा!

Fact Check: 'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले?... नाही; 'तो' व्हिडीओ जुना, दावा खोटा!

googlenewsNext

काश्मिरी पंडितांच्या व्यथा-वेदना मांडणाऱ्या, या गहन विषयावर परखड भाष्य करणाऱ्या 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाची देशभरात चर्चा आहे. काश्मीर खोऱ्यातील हा भीषण इतिहास पडद्यावर आणणं गरजेचं होतं, असं म्हणत एक वर्ग या सिनेमाचं कौतुक करतोय; तर हा सिनेमा धार्मिक तेढ वाढवणारा असल्याचा काहींचा दावा आहे. हीच टोकाची मतं वेगवेगळ्या दाव्यांसह सोशल मीडियावर मांडली जात आहेत. त्यातच, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रडत असलेला एक व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ जुना असून 'द कश्मीर फाईल्स' पाहून ते रडल्याचा दावा खोटा असल्याचं 'लोकमत डॉट कॉम'च्या पडताळणीतून समोर आलं आहे.

काय आहे दावा?

लालकृष्ण अडवाणी आपल्या मुलीसह थिएटरमध्ये बसलेत... त्यांचा कंठ दाटून आला आहे आणि डोळे पाणावले आहेत... त्यांच्या मुलीलाही अश्रू अनावर झालेत... इतक्यात एक जण येतो आणि अडवाणींना धीर देण्याचा प्रयत्न करतो... असा एक व्हिडीओ अनेक नेटिझन्सनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. ''काश्मिरी पंडितांवरील 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहून लालकृष्ण अडवाणी रडले'', असा दावा या व्हिडीओसोबत करण्यात आला आहे. मात्र, लालकृष्ण अडवाणींचं वय आणि तब्येत विचारात घेता, त्यांनी खरंच हा सिनेमा पाहिलाय का, याबाबत 'लोकमत'ने खातरजमा केली. तेव्हा, या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं.

कशी केली पडताळणी?

Lal krishna Advani Cried हे की-वर्ड वापरून आम्ही यू-ट्युबवर व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, अडवाणी जेव्हा-जेव्हा भावुक झाले होते, ते व्हिडीओ दिसले. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदींबद्दल बोलताना त्यांना भरून आलं होतं. ज्येष्ठ भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतरही अडवाणींना अश्रू अनावर झाले होते. या व्हिडीओंसोबतच, सध्या व्हायरल होत असलेला थिएटरमधील व्हिडीओही सापडला. हा व्हिडीओ ७ फेब्रुवारी २०२० रोजी  इंडिया टीव्हीनं अपलोड केला होता. त्या दिवशी निर्माते-दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या शिकारा या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहिले होते. सिनेमा पाहिल्यावर विधु विनोद चोप्रा त्यांना भेटायला गेले, तेव्हा अडवाणींना भरून आलं होतं. 

या संदर्भात आणखी एखादा व्हिडीओ शोधत असताना, विधु विनोद चोप्रा फिल्म्सच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर ७ फेब्रुवारी २०२० रोजी शेअर केलेला तोच व्हिडीओ सापडला आणि न्यूज १८ ने ९ फेब्रुवारी २०२० रोजी केलेली एक बातमीसुद्धा. त्या बातमीचं शीर्षकच LK Advani Couldn't Hold Back Tears After Watching Vidhu Vinod Chopra's Shikara असं आहे.

'लोकमत'च्या दिल्ली प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून घरीच आहेत. ते थिएटरला जाऊन सिनेमा बघण्याची शक्यता कमीच आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल स्क्रिनिंग झाल्याचंही ऐकिवात नाही.  

निष्कर्षः 

'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. २०२० मधील व्हिडीओ वापरून एक विशिष्ट वर्ग ही खोटी माहिती पसरवत आहे. त्यावर विश्वास न ठेवलेलाच बरा!

Web Title: fact check lal krishna advani cried after watching shikara movie, not the kashmir files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.