Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:02 PM2024-05-25T13:02:21+5:302024-05-25T13:11:53+5:30
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Created By: Boom
Translated By: ऑनलाइन लोकमत
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही दिवसापासून ईशान्य दिल्लीतील भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत, लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच त्यांनी आपला पराभव स्वीकारला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बुमला ला हा दावा दिशाभूल करणारा वाटला. व्हायरल व्हिडीओ मूळ संदर्भ सोडून शेअर केला जात आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये मनोज तिवारी २००९ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याबाबत सांगत होते आणि त्यांना पराभवाची भावना असल्याचे सांगत होते. २००९ मध्ये मनोज तिवारी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते.
या ११ सेकंदाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी "मला माझ्या पराभवाची जाणीव झाली आहे. दुःख गोष्टीचं वाटत आहे की, मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि आता हा पराभव स्वीकारला आहे."
हा एडीट केलेला व्हिडीओ शेअर करताना सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका यूजरने लिहिले की, 'रिंकियाच्या वडिलांनी आपला पराभव स्वीकारला आहे. आता त्यांच्या समर्थकांनी शांत बसून त्यांची गाणी ऐकावीत.
पोस्टची आर्काइव लिंक
फॅक्ट चेक-
व्हायरल व्हिडिओमध्ये न्यूज आउटलेट जिस्टचा लोगो होता. व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही जिस्टच्या अधिकृत YouTube चॅनेलवर गेलो. तेथे आम्हाला ३१ मार्च २०२४ रोजी अपलोड केलेला मूळ व्हिडीओ सापडला.
एक तास १० मिनिटांच्या या मूळ व्हिडिओमध्ये २७ मिनिटांनंतर पत्रकार त्यांना गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा किस्सा विचारतो. आपल्या आयुष्यातील हा एक रंजक प्रसंग असल्याचे सांगताना मनोज तिवारी म्हणतात, "अमर सिंह जी यांनी यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. २००९ च्या निवडणुकीपूर्वी, अमिताभ बच्चन यांच्या घरी यासाठी एक बैठक झाली होती, यामध्ये अनिल अंबानी देखील उपस्थित होते. निवडणूक लढवायची इच्छा नव्हती पण ठामपणे नाही म्हणू शकलो नाही.
"निवडणूक लढवायची नव्हती कारण योगी आदित्यनाथ यांचे समर्थक होतो आणि विद्यार्थीदशेत ABVP कार्यकर्ताही होतो, असंही ते म्हणाले. ही संपूर्ण घटना सांगताना मनोज तिवारी ३४ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये म्हणतात, "निवडणुका संपल्याबरोबर आम्हाला आमचा पराभव समजला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि हा पराभव झाला"
संपूर्ण व्हिडीओ पाहून हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडीओ फक्त अपूर्णच नाही तर त्यात काही कटही आहेत, त्यात मनोज तिवारी यांच्या संभाषणातील 'था' हा शब्द भ्रामक दावा करण्याच्या उद्देशाने कापण्यात आला आहे. ते सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पराभवाचा उल्लेख करत नव्हते तर २००९ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढलेल्या निवडणुकीच्या संदर्भात ते बोलत होते.
यासाठी आम्ही मुलाखत घेत असलेले पत्रकार अनिल शारदा यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी बूमला सांगितले की, "२००९ मध्ये जेव्हा सपा विरुद्ध योगी आदित्यनाथ यांच्यात लढण्याची चर्चा होती, तेव्हा ते म्हणाले होते की मला माझ्या पराभवाची जाणीव झाली आहे."
२००९ मध्ये मनोज तिवारी यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी ते भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांच्याकडून निवडणूक हरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)