Fact Check : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नावाने शेअर केला जातोय मराठी अभिनेत्रीचा 'तो' Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:58 IST2025-02-22T15:54:05+5:302025-02-22T15:58:21+5:30
Fact Check : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जुना व्हिडीओ असल्याचा दावा करून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

Fact Check : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नावाने शेअर केला जातोय मराठी अभिनेत्रीचा 'तो' Video
Created By: logically facts
Translated By: ऑनलाईन लोकमत
सोशल मीडियावर एक मिनिट ५२ सेकंदांचा व्हिडीओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये नदीकाठी एक महिला लाठीकाठी आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्याक्षिकं करताना दिसत आहे. आताच नव्याने शपथ घेतलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जुना व्हिडीओ असल्याचा दावा करून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.
एका एक्स युजरने कॅप्शनसह व्हिडीओ पोस्ट केला आहे. "आरएसएस कार्यकर्त्या रेखा गुप्ता यांचा जुना व्हिडीओ, ज्या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला थंडी वाजली का? केजरीवाल, शक्य तितक्या लांब पळून जा..." असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या पोस्टला १,२७,००० हून अधिक व्ह्यूज आणि ३,७०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत, अनेक युजर्सनी व्हिडिओमधील महिलेचं कौतुक केलं आहे. अशाच प्रकारच्या पोस्टचं अर्काइव्ह येथे, येथे, येथे आणि येथे पाहू शकतात.
फेसबुकवरही असेच दावे मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. या पोस्टचं अर्काइव्ह व्हर्जन येथे आणि येथे पाहू शकतात.
(सोर्स - Facebook/X/Modified by Logically Facts)
५ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यानंतर २० फेब्रुवारी २०२५ रोजी रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आम्हाला आढळलं की व्हिडिओमधील महिला या रेखा गुप्ता नसून मराठी अभिनेत्री पायल जाधव आहे.
वस्तुस्थिती काय आहे?
व्हिडिओमधील कीफ्रेम्सची रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर १९ फेब्रुवारी २०२५ रोजी अपलोड करण्यात आलेली मराठी अभिनेत्री पायल जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट सापडली. पोस्टचं अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहू शकता.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर कर्तुत्वाला नमन. शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, प्रौढप्रतापपुरंदर अशा थोरल्या महाराजांकडून प्रेरणा घेत केलेला हा माझा छोटा प्रयत्न" असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं होतं.
पायल जाधवने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त व्हिडीओ पोस्ट केला होता.
पायलने २०२३ मध्ये आलेल्या 'बापल्योक' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि मराठी टेलिव्हिजनवरील मालिकेतील कामासाठी देखील ती ओळखली जाते.
रेखा गुप्ता यांच्या फोटोंची तुलना केली जात आहे. ज्यामध्ये १९९६ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्याचा फोटो आहे. मात्र व्हिडीओतील महिला त्यांच्यासारखी दिसत नाही हे आता स्पष्ट झालं आहे.
(सोर्स : X/rekhagupta.in)
त्यांच्या पर्सनल वेबसाईटनुसार, गुप्ता यांनी १९९२ मध्ये दिल्ली विद्यापीठातील दौलत राम महाविद्यालयात विद्यार्थिनी असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील होऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सक्रिय सदस्या आहेत. २०२५ च्या दिल्ली निवडणुकीत त्यांनी शालिमार बाग मतदारसंघातून विजय मिळवला.
व्हायरल व्हिडिओमधील महिला त्या नाहीत.
निष्कर्ष
शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्री पायल जाधवचा लाठीकाठी आणि तलवारबाजी करतानाचा व्हिडीओ हा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा असल्याचं खोटं सांगून शेअर करण्यात आला आहे.
(सदर फॅक्ट चेक logically facts या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)