Fact Check: मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 02:19 PM2022-01-30T14:19:43+5:302022-01-30T14:20:29+5:30
मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते.
मुंबई – आगामी काही दिवसांत मुंबई महापालिका निवडणुकांचे(BMC Election 2022) बिगुल वाजणार आहे. यंदा शहरात २२७ ऐवजी २३६ नगरसेवक असणार आहेत. वार्ड संख्या वाढवण्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर कधीही निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. यातच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु कालांतराने ६ नगरसेवकांनी वेगळा गट बनवून शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या ६ नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केल्यानं राज ठाकरेंना(Raj Thackeray) मोठा धक्का बसला होता. त्यातच आता मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियात एका वृत्तवाहिनीच्या बातमीचा हवाला देत हा फोटो व्हायरल करण्यात येत आहे.
परंतु या व्हायरल बातमीबद्दल मनसेचे प्रभाग क्र. १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे यांनी स्पष्टीकरण देत मी कुठल्याही अटीवर मनसे सोडणार नाही. माझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवून लोकांमध्ये आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्या कुणी अशाप्रकारचे बनावट फोटो व्हायरल केलेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं तुर्डेंनी सांगितले.
काय म्हणाले संजय तुर्डे?
या चर्चेवर संजय तुर्डे म्हणाले की, मी २०१७ मध्ये नगरसेवक झालो. मनसेच्या ६ नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी जी ऑफर शिवसेनेने दिली ती नाकारुन मी मनसेत राहिलो. माझ्यात आणि पक्षात दरी निर्माण करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न अयशस्वी होईल. जो फोटो व्हायरल होतोय तो खोडसळपणा आहे. एका आमदाराने ऑफर दिल्याचं चुकीचं पसरवलं जात आहे. माझ्या प्रभागात चांदिवली, कलिना असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. त्याठिकाणी दोघंही आमदार माझे विरोधक आहेत असं त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी माझ्या प्रभागातील काही समस्या होत्या, तेव्हा लोकहिताच्या कामासाठी मी महापौरांना आमंत्रित केले होते अन्यथा मी मनसे आंदोलन करणार होती. महापौर एल वार्डात आल्यापासून ते फोटो व्हायरल झाले. तेव्हापासून माझ्याविरोधात असं बनावट चित्र पसरवलं जात आहे. नगरसेवक म्हणून मी महापौरांकडे जाऊ शकत नाही का? असा सवाल तुर्डे यांनी विचारत १० कोटींची ऑफर दिल्याचा विनोद पसरवला जात आहे. मला काहीही ऑफर नाही हे स्पष्ट केले आहे.
त्याचसोबत कलिना विधानसभेत मी शिवसेनेविरोधातील मोठा स्पर्धक आहे. कलिना विधानसभेत कमीत कमी ३ नगरसेवक मनसेचे निवडून येतील. राजसाहेबांना माझ्याबद्दल ठाम विश्वास आहे. ते या गोष्टीला जास्त वाव देणार नाही. प्रत्येक लोकांच्या अपेक्षा असतात. या समाजकंटकांमुळे अनेक जण दुखावले जाते. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे. मी मनसे कधीही सोडणार नाही असंही संजय तुर्डे म्हणाले आहेत.