Fact Check : मुख्यमंत्री होताच रेखा गुप्तांनी खरेदी केली ५० लाखांची कार? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:41 IST2025-02-24T15:37:38+5:302025-02-24T15:41:51+5:30

मुख्यमंत्री झाल्यानंतर रेखा गुप्ता यांनी लाखोंची आलिशान कार खरेदी केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Fact Check News Claimed that Rekha Gupta bought luxury car worth lakhs after becoming the Chief Minister | Fact Check : मुख्यमंत्री होताच रेखा गुप्तांनी खरेदी केली ५० लाखांची कार? जाणून घ्या सत्य

Fact Check : मुख्यमंत्री होताच रेखा गुप्तांनी खरेदी केली ५० लाखांची कार? जाणून घ्या सत्य

Claim Review : मुख्यमंत्री झाल्यानंतर रेखा गुप्ता यांनी लाखोंची आलिशान कार खरेदी केल्याचा दावा
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: आज तक
Translated By: ऑनलाईन लोकमत

Delhi CM Luxury Car Fact Check News: 'शीशमहल'वरून अरविंद केजरीवालांना घेरणाऱ्या रेखा गुप्ता यांनी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ५० लाख रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे का? या दाव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये, एक चमकणारी काळी कार दिसत आहे ज्यावर दिल्ली नंबर प्लेट 'DL11CM0001' आहे.

व्हिडिओ शेअर करताना अनेक सोशल मीडिया यूजर्सनी, रेखा गुप्ता यांनी शीशमहलला जाणार नसल्याचे सांगितले होते, पण मुख्यमंत्री बनताच त्यांनी करदात्यांच्या पैशातून स्वत:साठी ५० लाख रुपयांची कार खरेदी केली, असं म्हटलं आहे.

व्हिडिओ शेअर करत एका एक्स युजरने म्हटलं की, “मुख्यमंत्री झाल्यानंतर ४८ तासांच्या आत ५० लाखांची कार…मुख्यमंत्री रेखा गुप्ता ‘शीशमहल’मध्ये जाणार नाहीत…रस्त्यावरच ‘शीश महल’ बनवतील…नवीन मुख्यमंत्र्यांसाठी आणि नवीन कारसाठी एकच वाक्य, गाण्याचे बोल बोलावेसे वाटतात, तुहाँ तुम बिल्कुल वैसी हो…जैसा मैंने सोचा था”.

शेकडो लोकांनी फेसबुक आणि एक्सवर याच कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. अशाच एका पोस्टचे अर्काईव्ह व्हर्जन येथे पाहिले जाऊ शकते.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल यांनी बांधलेल्या आलिशान मुख्यमंत्राच्या निवासस्थानात राहणार नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ही पोस्ट व्हायरल होत आहे.

पण आज तक फॅक्ट चेकमध्ये ही कार रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर नव्हे तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना खरेदी करण्यात आली होती असं समोर आलं.

सत्य कसं समोर आलं?

सगळ्यात आधी हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. २० फेब्रुवारी रोजी IANS या वृत्तसंस्थेने एक्सवर पोस्ट केल्याचे उघड झाले. यासोबत रेखा गुप्ता यांना घेण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा पथक पोहोचल्याचेही लिहिले होते. रेखा गुप्ता यांनी शपथ घेण्यापूर्वीच हा व्हिडिओ शेअर केला होता.

आता हा व्हिडिओ व्हायरल दाव्यासह शेअर केला जात आहे. या व्हायरल पोस्टवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं की, ही कार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आधीपासूनच आहे. पुरावा म्हणून लोक जुने व्हिडिओ शेअर करत आहेत ज्यात अरविंद केजरीवाल 'DL11CM0001' नंबर असलेल्या त्याच काळ्या कारमध्ये बसलेले दिसत आहेत.

ही माहिती तपासली असता, त्याच कारचे अनेक जुने व्हिडिओ आणि फोटो देखील सापडले ज्यात केजरीवाल बसलेले दिसतात.

फक्त केजरीवालच नाही तर आतिशी मार्लेना यांनीही मुख्यमंत्री असताना ही कार वापरली होती. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.

“RTO VEHICLE INFORMATION” नावाच्या वेबसाईटवर या वाहनाचा क्रमांक शोधला असता, हे वाहन २२ एप्रिल २०२२ रोजी नोंदणीकृत असल्याचे आढळून आले. त्यावर वाहनाचे नाव “MG GLOSTER” असं लिहीलं आहे. व्हायरल व्हिडिओ आणि इतर व्हिडिओंमध्ये दिसणारी कार देखील एमजी ग्लोस्टर आहे.

तपासात दिसून आलं की जुलै २०२२ मध्ये, आरटीआयच्या हवाल्याने एक बातमी प्रसिद्ध झाली होती ज्यामध्ये दिल्ली सरकारने मुख्यमंत्र्यांसाठी वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे १.४४ कोटी रुपये खर्च केले असल्याचे म्हटलं होतं. त्याचवेळी केजरीवाल ३६ लाख रुपयांच्या नवीन एमजी ग्लोस्टर कारमध्ये दिसले होते.

अशाच कारचे काही जुने व्हिडिओ देखील सापडले ज्यात केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल जाताना दिसत आहेत. या वाहनाचा नोंदणी क्रमांक वेगळा आहे (DL4CBB0001). एका व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवालही या कारमधून प्रवास करताना दिसत आहेत.

निष्कर्ष

त्यामुळे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे वाहन दिल्ली सरकारकडे आहे हे स्पष्ट होतं. हे वाहन अलीकडेच खरेदी केले गेले नाही. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनीही व्हायरल झालेला दावा खोडून काढला आहे.

(सदर फॅक्ट चेक आज तक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: Fact Check News Claimed that Rekha Gupta bought luxury car worth lakhs after becoming the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.