Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:38 PM2024-05-20T12:38:31+5:302024-05-20T12:45:29+5:30
Fact Check: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Created By: Boom
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे पाच टप्पे पूर्ण होत आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता सांगतेकडे जात असून, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. अद्याप काही टप्पे बाकी आहेत. यातच आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र झाले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीशी या व्हिडिओचा संदर्भ जोडला जात असून, निवडणूक निकाल पाहिल्यानंतर अखिलेश यादव पंतप्रधान मोदींना भेटायला गेले, असा दावा युजर्सकडून करण्यात येत आहे.
या व्हायरल व्हिडिओची सतत्या तपासली असता, हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ २०१४ मधील असून, अखिलेश यादव तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. एक फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, निवडणुकांचे निकाल कळताच अखिलेश यादव हे प्रकरण मिटवण्यासाठी मोदींच्या दरबारात पोहोचले.
फॅक्ट चेक
या व्हायरल व्हिडिओशी संबंधित कीवर्डसह YouTube वर शोधण्यात आले. आम्हाला हा व्हिडिओ १३ जून २०१४ रोजी पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला आढळला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पीएम मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मार्च २०१२ ते मार्च २०१७ या काळात अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अखिलेश यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पीएम मोदी यांच्या भेटीचा हा व्हिडिओ डीडी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरही शेअर करण्यात आला होता. याशिवाय, आम्हाला अखिलेश यादव आणि पीएम मोदी यांच्या भेटीचे वृत्त देणारा कोणताही अन्य विश्वसनीय सोर्स अलीकडे आढळून आलेला नाही. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष विरोधी पक्षांच्या भारत आघाडीचा भाग आहे.
निष्कर्ष
अखिलेश यादव आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचा हा व्हिडिओ १० वर्षे जुना असून, सदर व्हिडिओ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचा दावा खोटा, चुकीचा आहे.
(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)