Fact Check: तो मी नव्हेच!... 'धर्मवीर'वरून एकनाथ शिंदेंना 'टार्गेट' करणारी पोस्ट आनंद दिघेंच्या ड्रायव्हरची नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:20 PM2022-05-17T12:20:59+5:302022-05-17T12:24:25+5:30

आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणारे आणि सध्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत एक पोस्ट सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल झाली आहे.

Fact Check post targeting Eknath Shinde about Dharmaveer movie is not shared by Anand Dighes driver | Fact Check: तो मी नव्हेच!... 'धर्मवीर'वरून एकनाथ शिंदेंना 'टार्गेट' करणारी पोस्ट आनंद दिघेंच्या ड्रायव्हरची नाही!

Fact Check: तो मी नव्हेच!... 'धर्मवीर'वरून एकनाथ शिंदेंना 'टार्गेट' करणारी पोस्ट आनंद दिघेंच्या ड्रायव्हरची नाही!

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या 'धर्मवीर' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 'धर्मवीर' चित्रपट ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असून यात अभिनेता प्रसाद ओक यानं दिघेंची भूमिका साकारली आहे. आनंद दिघे यांची एकंदर लोकप्रीयता पाहता चित्रपटाची चर्चा झाली नसती तर नवलच. दिघेंचं संपूर्ण आयुष्य एकंदर थरारक आणि मनोरंजन राहिलं आहे. त्यांच्या मृत्यूबाबतही आजवर अनेक चर्चा केल्या जातात. 'धर्मवीर' चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोशल मीडियात आनंद दिघे यांच्याशी संबंधित अनेक पोस्ट, आठवणी आणि विविध चर्चा व्हायरल होत आहेत. यातच आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणारे आणि सध्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत एक पोस्ट सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल झाली आहे. आनंद दिघे यांचे १२ वर्ष ड्रायव्हर राहिलेले पीटर डिसुझा यांनी धर्मवीर चित्रपट आनंद दिघेंचा नसून तो एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या मार्केटिंगसाठी बनवला असल्याचा आरोप केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमागचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला असता संबंधित पोस्ट खोटी असल्याचं समोर आलं आहे.

दावा काय?
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' चित्रपट मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या मार्केटिंगसाठी केला असल्याचा दावा पोस्टमधून करण्यात आला आहे. संबंधित पोस्ट आनंद दिघे यांच्याकडे १२ वर्ष त्यांच्या कारचे ड्रायव्हर राहिलेल्या पीटर डीसुझा यांनी केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पीटर डीसुझा यांच्या नावे व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारी पोस्ट पुढीलप्रमाणे- 

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे १२ वर्षे ड्रायव्हर राहिलेले पीटर डिसुझा यांचे धर्मवीर चित्रपटाविषयी मत हे धर्मवीर पिक्चर धर्मवीरांचा नसून एकनाथ शिंदेचा आहे. कारण आजचे जे युवापिढी आहेत त्याने कधीच दिघे साहेबांना बघितलं नाही. धर्मवीर यांची कारकीर्द पाहिली नाही.म्हणून एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांच्या जीवनावर नाही तर स्वतःच्या मार्केटिंग साठी हा पिक्चर बनवला. का आजच्या युवा पिढीला दाखवायला का जे काय होतो ते मी दिघे साहेबांचे होतो. कारण एकनाथ शिंदेला माहित आहे शिवसेना ठाण्यात संपलेली आहे आत्ता पर्याय फक्त युवा पिढी आहे. ते पण दिघे साहेबांच्या नावाने. आज सर्वे जुने शिवसैनिक नाराज आहे का पिक्चर बघून पण त्यांना नाईलाज आहे. आज आपलं पक्षांमध्ये ठाण्यात किती लोक आहेत जे साहेबांबरोबर राहिले साहेबांचा इतिहास माहीत आहे. त्यांनी  कधी पाहिलय तुम्ही एकनाथ शिंदे ला दिघे साहेबांबरोबर. मी स्वतः बारा वर्ष धर्मवीरांचे ड्रायव्हर होतो मी स्वतः कधी पाहिलं नाही शिंदेंना, हे सर्व काय निवडणुकीसाठी चाललाय कारण वीस वर्ष साहेबांची गाडी २०१३ भीमजी च्या गॅरेजला उफाळला सडत होती तेव्हा कोणी त्या देवाचा रथाला लक्ष दिलं नाही.
(जय शिव आनंद)

कशी केली पडताळणी?
'धर्मवीर' चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांचं मोलाचं योगदान आहे. सिनेमाच्या म्युझिक लॉन्च, ट्रेलर लॉन्च असो किंवा मग प्रिमिअर असो एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित होते. पण ज्या पीटर डीसुझाच्या नावे संबंधित पोस्ट व्हायरल केली जात आहे. त्याच पीटर डीसुझा यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि पोस्टबाबत माहिती जाणून घेतली असता त्यांनी अशी कोणतीही पोस्ट केल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे. "ती माझी पोस्ट नाही. ती कुणी केली? का केली? ते मलाच कळालेलं नाही. मी एकतर ठाण्यातही नाही. मी सध्या कोकणात आहे. मला लोकांनी स्क्रिनशॉट काढून पाठवले तेव्हा मला कळालं की असं काहीतरी माझ्या नावाने व्हायरल होत आहे. तुम्ही व्हायरल पोस्टचं हेडिंग वाचलं तर लक्षात येईल की त्यात आरोप आणि यांचे मत असं नमूद केलं आहे. जर मी तशी पोस्ट लिहिली असती तर मी यांचे आरोप असं का लिहिलं असतं? मी स्वत: माझ्या नावानं लिहिलं असतं. दिघे साहेबांच्या ड्रायव्हरचे आरोप अशा हेडिंगनं पोस्ट मी का लिहीन?", असं पीटर डीसुझा यांनी सांगितलं आहे. माझ्या नावाचा वापर करुन खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याचं पीटर डीसुझा यांनी स्पष्ट केलं आहे. 

निष्कर्ष: 'धर्मवीर' चित्रपटाच्या नावाने एकनाथ शिंदे स्वत: मार्केटिंग करत असल्याची व्हायरल झालेली पोस्ट पीटर डीसुझा यांनी केलेली नाही.

Web Title: Fact Check post targeting Eknath Shinde about Dharmaveer movie is not shared by Anand Dighes driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.