Fact Check: तुमच्याकडे आहे का ५०० ची नोट? सावध व्हा! सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 10:48 AM2021-12-08T10:48:57+5:302021-12-08T10:52:39+5:30
दोन नोटांमधला फरक दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नवी दिल्ली: तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट आहे का? तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या ५०० रुपयाच्या नोटेबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका विशिष्ट प्रकारची ५०० रुपयांची नोट तुमच्याकडे असल्यास सावध व्हा असं आवाहन या व्हिडीओमधून करण्यात येत आहे. याबद्दल आता सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत ५०० रुपयांच्या दोन नोटांमधला फरक सांगण्यात येत आहे. खऱ्या आणि बोगस नोटांमधला फरक सांगत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात पीआयबीनं फॅक्ट चेक करत सत्य सांगितलं आहे.
पीआयबीकडून फॅक्ट चेक
५०० रुपयांची अशी कोणतीही नोट स्वीकारू नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीच्या बाजूला नसून गांधीजींच्या फोटोच्या शेजारी आहे, अशी माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र यामध्ये तथ्य नाही. ५०० च्या दोन्हीही नोटा वैध आहेत, असं पीआयबीनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ बोगस आहे. त्यातील माहिती खरी नाही, असं पीआयबीनं सांगितलं आहे.