व्हॅलेंटाईन डेनिमित्त ताज हॉटेलची स्पेशल ऑफर, ७ दिवसांचा मुक्काम मोफत; जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 13:38 IST2021-02-03T13:36:19+5:302021-02-03T13:38:34+5:30
व्हॉट्स ऍपवर व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य जाणून घ्या; अन्यथा होईल फसवणूक

व्हॅलेंटाईन डेनिमित्त ताज हॉटेलची स्पेशल ऑफर, ७ दिवसांचा मुक्काम मोफत; जाणून घ्या सत्य
सोशल मीडियाच्या जमान्यात कोणताही मेसेज लगेच व्हायरल होतो. लोक त्याची सत्यता न पडताळता तो फॉरवर्ड करतात. त्यामुळे अनेकदा फेक मेसेज व्हायरल होतात आणि त्यातून अनेकांची फसवणूक होते. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली. व्हॅलेंटाईन डे १० दिवसांवर आला आहे आणि व्हॉट्स ऍपवर एक मेसेज व्हायरल झाला आहे. ताज हॉटेल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक्स्पिरियन्स गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
ताज हॉटेल गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा करणारा मेसेज तुम्हाला आला असल्यास सावध राहा. कारण हा एक घोटाळा आहे. ताज हॉटेलनं या संदर्भात एक ट्विट करून वापरकर्त्यांना सतर्क केलं आहे. 'अशा प्रकारच्या व्हॉट्स ऍप मेसेजवर विश्वास ठेवू नका. या मेसेजमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ताज एक्स्पिरियन्स गिफ्ट कार्ड दिलं जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तो पूर्णपणे खोटा आहे. हॉटेलकडून अशा प्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही,' असं ताजकडून ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.
व्हायरल मेसेजमध्ये नेमका कोणता दावा?
व्हॉट्स ऍपवर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये फ्री गिफ्ट कार्डचा दावा करण्यात आला आहे. ताज हॉटेल सात दिवसांसाठी फ्री स्टेची ऑफर देत असल्याचा उल्लेख मेसेजमध्ये आहे. याशिवाय एक लिंकदेखील देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्याची माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे ताज हॉटेलनं वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.