Fact Check: नमाज पठण करणाऱ्या 'त्या' गर्दीचा व्हिडिओ महाराष्ट्राचा नाही, काय आहे सत्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:18 IST2025-01-18T09:16:45+5:302025-01-18T09:18:32+5:30
फेसबुक युजर्सने हा व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये हे चित्र महाराष्ट्रातील आहे असा उल्लेख केला.

Fact Check: नमाज पठण करणाऱ्या 'त्या' गर्दीचा व्हिडिओ महाराष्ट्राचा नाही, काय आहे सत्य?
Created By: विश्वास न्यूज
Translated By: ऑनलाइन लोकमत
सध्या सोशल मीडियावर नमाज पठण करणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करताना दिसत आहेत आणि यासोबतच हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
व्हिडिओ तपासणीत काय आढळलं?
सर्वप्रथम व्हिडिओच्या सत्यतेबाबत तपास केला असता व्हायरल होणारा दावा दिशाभूल करणारा आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येत असले तरी ते खोटं असून संबंधित व्हिडिओ तेलंगणातील शंकरपल्ली इथला आहे. शंकरपल्लीच्या अतिथी ग्राऊंडवर इज्तेमाच्या कार्यक्रमानिमित्त हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाजातील लोक जमले होते. हा व्हिडिओ तिथला असून तो महाराष्ट्रातील असल्याचं सांगून व्हायरल केला जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार हा व्हिडिओ कोणत्याही आंदोलनाशी संबंधित नाही आणि तो फक्त एक धार्मिक विधी होता, जो परंपरेनुसार शांततेत पार पडला आहे.
व्हायरल व्हिडिओबाबत काय होता दावा?
५ जानेवारी २०२५ रोजी हिंदू युवा वाहिनी या फेसबुक युजर्सने हा व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये हे चित्र महाराष्ट्रातील आहे असा उल्लेख केला होता.
या पोस्टची आर्काइव्ह लिंक येथे पाहू शकता.
व्हिडिओ शेअर करताना त्यावर लिहिलं होतं की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असून एका षडयंत्राचा भाग म्हणून शिवरायांची भूमी आता हळूहळू अफझलखानाची भूमी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जातीच्या नावाखाली हिंदूंना लढायला लावून हे नेते आपल्याला गोंधळात टाकतात. संपूर्ण देश जिहादीच्या हाती सोपवत आहेत असं म्हटलं आहे.
कशी केली पडताळणी?
व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी इनव्हिड टूलची मदत घेण्यात आली. त्यात व्हिडिओतून प्रमुख फ्रेम्स काढून त्या गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधल्या. त्यात Stylish Gudu नावाच्या फेसबुक युजरने या दाव्याशी संबंधित पोस्ट टाकली. ५ जानेवारी २०२५ च्या या पोस्टमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ तेलंगणातील शंकरपल्ली शहरातील असल्याचं आढळून आले.
त्यानंतर डेक्कन न्यूज डेलीच्या अधिकृत पेजवरही व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला होता. ४ जानेवारी २०२५ ला हा व्हिडिओ शेअर करताना शंकरपल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाचा सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे अन्य व्हिडिओही उपलब्ध आहेत.
मिळालेली माहिती आणखी तपासण्यासाठी गुगल किवर्डचा शोध घेतला त्यावेळी एएचएन न्यूजच्या अधिकृत युट्यूबवर हा व्हिडिओ सापडला. शंकरपल्लीच्या अतिथी ग्राऊंडवर इज्तेमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात लाखो मुस्लीम सहभागी झाल्याची माहिती प्रसिद्ध होती.
हा व्हिडिओ इथे पाहता येईल
२ जानेवारी २०२५ रोजी हैदराबाद मेल या वेबसाईटवर संबंधित कार्यक्रमाची बातमी सापडली. त्यात ३ ते ५ जानेवारी या दरम्यान शंकरपल्ली येथील अतिथी ग्राऊंडवर हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी चेवेल्ला पोलिसांना देण्यात आली होती. त्याचे अधिकृत पत्रही जारी केले होते. त्याशिवाय अधिक माहितीसाठी हैदराबाद येथील स्थानिक पत्रकार हर्ष यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हा व्हायरल व्हिडिओचा दावा दिशाभूल करणारा आहे असं सांगितले.
निष्कर्ष
व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळणी केली असता नमाज पठण करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून तेलंगणातील शंकरपल्ली इथला आहे. त्याठिकाणी इज्तेमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र हा महाराष्ट्रातील व्हिडिओ असल्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध झाले आहे.
(सदर फॅक्ट चेक विश्वास न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)