Fact Check: संजय राऊतांच्या टॅटूचा व्हायरल झालेला फोटो बनावट; जाणून घ्या सत्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:01 IST2024-11-15T18:00:38+5:302024-11-15T18:01:54+5:30
Fact Check - निवडणूक प्रचाराच्या काळात सोशल मीडियावर संजय राऊत यांच्या टॅटूचा आक्षेपार्ह फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check: संजय राऊतांच्या टॅटूचा व्हायरल झालेला फोटो बनावट; जाणून घ्या सत्यता
Created By: Factly
Translated By: ऑनलाइन लोकमत
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात सोशल मीडियात अनेकदा चुकीच्या आणि बनावट गोष्टी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एका कार्यकर्त्याच्या पाठीवर शिवसेना (UBT) नेत्यांचे टॅटू असलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्या व्यक्तीच्या पाठीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू दिसत आहेत, तर संजय राऊत यांचा टॅटू खालच्या बाजूस आक्षेपार्ह पद्धतीने दाखवलेला आहे. हा फोटो खरा आहे की खोटा याची पडताळणी करुया.
दावा काय आहे?
एका व्यक्तीने त्याच्या पाठीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू काढले आहेत आणि त्याच्या खालच्या भागावर संजय राऊत यांचा टॅटू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पडताळणीत काय आढळलं?
हा फोटो बनावट आहे. मूळ फोटोमध्ये रामण्णा जमदार या कार्यकर्त्याने शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आपल्या पाठीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू काढले. संजय राऊत यांचा टॅटू या फोटोमध्ये डिजिटलरीत्या एडिट करून जोडण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे.
व्हायरल झालेला फोटो रिव्हर्स इमेज सर्चद्वारे तपासला असता त्याची सत्यता बाहेर आली, सप्टेंबर २०२२ मध्ये अनेक न्यूज पोर्टलने (इथे वाचा आणि इथे वाचा) ही बातमी प्रकाशित केली होती. या फोटोत एक व्यक्ती उद्धव ठाकरे यांना आपली पाठ दाखवत आहे, ज्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू आहेत.
या रिपोर्टनुसार, सोलापूरचे एक बांधकाम कामगार रामण्णा जमादार यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी असलेल्या निष्ठेचे दर्शन घडवण्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यांचे टॅटू आपल्या पाठीवर गोंदवले आहेत. व्हायरल फोटोची मूळ फोटोसोबत तुलना केली असता संजय राऊत यांचा टॅटू बनावट एडिट केलेला असल्याचे दिसून येते.
याशिवाय, TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत, रामण्णाने आपल्या पाठीवरील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे दोन टॅटू दाखवले. हे दृश्ये रामण्णाने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर देखील शेअर केले होते.
निष्कर्ष काय?
थोडक्यात, हा एक एडिट केलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल केला जात आहे. ज्यात एका व्यक्तीने आपल्या मागील भागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदवल्याचा चुकीचा दावा केला जात आहे.
(सदर फॅक्ट चेक Factly या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)