Fact Check: लहानगा सापडला वाघाच्या तावडीत, टी-शर्ट काही सोडेना; व्हिडिओत आला मोठा ट्विस्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 15:07 IST2025-02-12T15:07:47+5:302025-02-12T15:07:47+5:30
Fact Check: काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहानगा मुलगा वाघापेक्षा आईला जास्त घाबरतो, असे दाखवण्यात आले आहे. पण यात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. जाणून घ्या...

Fact Check: लहानगा सापडला वाघाच्या तावडीत, टी-शर्ट काही सोडेना; व्हिडिओत आला मोठा ट्विस्ट!
Created By: Aaj Tak
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'माझा टी-शर्ट सोड, नाहीतर आई ओरडेल', आतापर्यंत तुम्ही एका निष्पाप मुलाचा पिंजऱ्यात बंद वाघाला ही विनंती करतानाचा व्हिडिओ पाहिला असेल. परंतु, बरेच लोक म्हणत आहेत की, ही भारतातील प्राणीसंग्रहालयातील घटना आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला मुलाला मदत करण्यापेक्षा रील बनवणे जास्त महत्त्वाचे वाटल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही जण अशा असंवेदनशील व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करायला हवा अशी मागणी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु, हा व्हिडिओ, या व्हिडिओतील मुलगा याबाबत एक नवा ट्विस्ट समोर आला आहे.
काही लोकांना असे वाटते की हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. अशाच एका पोस्टची संग्रहित आवृत्ती (आर्काइव्ड व्हर्जन) येथे पाहता येईल. फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की, हा व्हिडिओ एडिट केलेला नाही किंवा भारतातीलही नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नोमान हसन यांनी त्यांच्या वाघ आणि त्यांच्या पुतण्यासोबत बनवला आहे. हा त्यांचा पाळलेला वाघ असल्याचे सांगितले जाते.
या व्हिडिओची सत्यता कशी शोधली?
आम्हाला आढळले की, डॉ. अब्दुल सत्तार खान नावाच्या एका एक्स युजरने व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि तो पाकिस्तानचा असल्याचे म्हटले. तसेच, असे लिहिले आहे की या मुलाच्या कुटुंबाने अनेक सिंह आणि वाघ यांचा सांभाळ केलेला आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार सिंह आणि वाघ यांसारखे जंगली हिंस्र प्राणी आयात करण्याला परवानगी आहे. तेथील अनेक श्रीमंत लोक असे प्राणी सांभाळणे पसंत करतात, ही बाब येथे नमूद करणे आवश्यक आहे. आम्ही हैदराबादमध्ये राहणारे डॉ. अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, या व्हिडिओमध्ये दिसणारा वाघ नोमान हसन नावाच्या पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा आहे. या माहितीचा वापर करून, आम्ही नोमान हसनच्या अधिकृत YouTube चॅनेलवर हा व्हिडिओ शोधला आणि सापडला. इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या नोमानचे युट्यूबवर सुमारे १.१ कोटी फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा सिंह, वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांसोबतचे विविध प्रकारचे विचित्र व्हिडिओ शेअर करतो.
नोमनच्या सोशल मीडिया अकाउंटवर, आम्हाला असे अनेक व्हिडिओ आढळले ज्यात व्हायरल व्हिडिओमधील लहानगा सिंह आणि वाघांसोबत दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये तो वाघाची साखळी धरून त्याच्याजवळ उभा असल्याचे दिसत आहे. यामध्ये वाघ कोणत्याही पिंजऱ्यातही नाही. अचानक वाघ मुलाचा जोडा तोंडाने धरतो. ते मूल हसते, वाघाच्या डोक्यावर थापट देते आणि त्याला म्हणते, जर हे फुटले तर माझी आई मला ओरडेल. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो वाघावर स्वार होताना दिसत आहे, जणू काही तो खरा वाघ नसून एखादे खेळणे आहे.
व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी नोमनशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, हा व्हिडिओ इस्लामाबादचा आहे आणि त्यात दिसणारा मुलगा त्याचा पुतण्या असद आहे. आम्ही नियोजन करून हा व्हिडिओ कॉमिक शैलीत बनवला आहे. माझ्याकडे २५ सिंह आणि वाघ आहेत, जे मी आफ्रिकेतून आयात केले आहेत. मी हे सर्व प्राणी माझ्या फार्ममध्ये राहतात. नोमनला असेही विचारले की, या प्राण्यांना कसे प्रशिक्षण देतो का, जेणेकरून कोणालाही इजा करू नयेत. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जर तुम्ही लहानपणापासून एखाद्या प्राण्याला वाढवले तर ते आपोआप प्रशिक्षित होते. ते तुम्हाला ओळखू लागते आणि कधीही तुम्हाला इजा करत नाही. कधीकधी या प्राण्यांच्या नखांनी आपल्याला ओरखडे येतात. पण ते कधीही आपल्यावर हल्ला करत नाहीत.
हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी पाळणे हे पैशाचे आणि सत्तेचे प्रतीक बनले आहे.
(सदर फॅक्ट चेक Aaj Tak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)