Fact Check: 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल; चंद्रशेखर बावनकुळेंबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 09:20 PM2024-10-21T21:20:10+5:302024-10-21T22:41:27+5:30
हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने केल्याचं भासवून वाचकांची, मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे.
मुंबई - सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागावाटप आणि उमेदवारांची निवड यावरून राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू आहे. परंतु सोशल मीडियात सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला लागलेत. त्यात अफवा, दिशाभूल करणाऱ्या बातम्यांना पेव फुटले आहे. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने लोकमतच्या नावाने एक क्रिएटिव्ह व्हायरल होऊ लागले आहे.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या क्रिएटिव्हमध्ये लोकमतचं नाव आणि लोगो वापरण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणे ही फडणवीसांची चूक त्याची आम्हाला विधानसभेत मोठी किंमत मोजावी लागेल असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केल्याचा दावा या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या क्रिएटिव्हमध्ये करण्यात आला आहे. परंतु अशाप्रकारे कुठलेही क्रिएटिव्ह लोकमतने केलेले नाही. उलट, ही बाब निदर्शनास येताच आम्ही त्याची गंभीर दखल घेतली असून, या खोडसाळपणाची तक्रार 'सायबर क्राइम' शाखेकडे करण्यात येणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं हे क्रिएटिव्ह फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावर 'लोकमत डॉट कॉम' आणि त्याचा लोगो वापरण्यात आला आहे. हे क्रिएटिव्ह 'लोकमत'ने केल्याचं भासवून वाचकांची, मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. वास्तवात लोकमतने असं कोणतंही क्रिएटिव्ह बनवलेलं नाही. केवळ लोकमतच्या क्रिएटिव्हशी मिळतंजुळतं टेम्पलेट वापरून काही कार्यकर्त्यांनी हा खोडसाळपणा केला आहे. अशा कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता, विश्वासार्ह माहितीसाठी 'लोकमत'च्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करावं, असं आवाहन या निमित्ताने आम्ही आमच्या वाचकांना करतो.