महाराष्ट्र निवडणुकीनंतर EVM विरोधात आंदोलन? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:05 PM2024-11-28T20:05:39+5:302024-11-28T20:25:59+5:30

व्हायरल पोस्टमध्ये महाराष्ट्रात लोक ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check viral post claims that people in Maharashtra are protesting on the streets against EVM | महाराष्ट्र निवडणुकीनंतर EVM विरोधात आंदोलन? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

महाराष्ट्र निवडणुकीनंतर EVM विरोधात आंदोलन? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Claim Review : व्हायरल पोस्टमध्ये महाराष्ट्रात लोक ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचा दावा केला जात आहे.
Claimed By : Social Media User
Fact Check : दिशाभूल

Created By: Mews Meter
Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार,  ईव्हीएम रद्द करण्याचे आवाहन करत पारंपारिक बॅलेट पेपर प्रणालीकडे परत येण्याच्या बाजूने येणारी मोहीम सुरू करण्याच्या तयारीत महाविकास आघाडीचे नेते आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त करून आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर जोर दिला आहे.

अशात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हजारो लोकांचा जमाव रस्त्यावर घोषणाबाजी करताना दिसत आहे. हे लोक ईव्हीएम हटवा, देश वाचवा अशा घोषणा देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे, जिथे मोठ्या संख्येने लोक ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

एक्सवरील युजरने व्हिडिओ शेअर करत, “महाराष्ट्रात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू झाले, देशातील सर्वात मोठे पक्षही त्यांना ईव्हीएम मशीन नको असल्याचे सांगत आहेत. ईव्हीएम काढा आणि बॅलेट पेपर आणा!” (अर्काईव्ह)

दुसऱ्या एक्स युजरने व्हिडिओमधील एक स्क्रीनग्राब शेअर केला आणि लिहिले, "ईव्हीएमवरून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये निवडणूक आयोगाविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत." (अर्काईव्ह)

फॅक्ट चेक

न्यूजमीटरला आढळले की हा दावा दिशाभूल करणारा आहे कारण व्हिडिओमध्ये जानेवारी २०२४ मध्ये दिल्लीत ईव्हीएमच्या विरोधात विरोध दाखवला आहे.

व्हिडिओच्या कीफ्रेमची रिव्हर्स इमेज शोधल्यावर, ते फेब्रुवारी २०२४ मध्ये एक्स आणि फेसबुक युजर्संनी शेअर केलेले आढळले. या पोस्ट्स ईव्हीएमवर बंदी घालण्याच्या वाढत्या चळवळीबद्दल होत्या, ज्याला मुख्य प्रवाहातील माध्यमे कव्हर करत नव्हती. (अर्काईव्ह)

हा पुरावा लक्षात घेऊन, आम्ही एक कीवर्ड शोधला आणि ३१ जानेवारीच्या अनेक एक्स-पोस्ट सापडल्या, ज्यात असे म्हटले आहे की भारत मुक्ती मोर्चा आणि इतर संघटनांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाचे आयोजन केले होते. पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

व्हायरल व्हिडिओ आणि ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये, जनता दल युनायटेड (जेडीयू) कार्यालयाच्या फलकांसारखेच दृश्य आम्हाला दिसले.

अधिक तपास केल्यावर, आम्हाला आढळले की जेडीयूचे नवी दिल्लीतील कार्यालय ७ जंतरमंतर रोड येथे आहे. याव्यतिरिक्त, आम्ही झी बिहार झारखंडचा या ठिकाणचा जेडीयू कार्यालयाच्या इतिहासाची माहिती देणारा व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओ पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हेच फलक लावण्यात आले होते.

३१ जानेवारीच्या एका एक्स पोस्टमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नेते शरद पवार यांनी भारत मुक्ती मोर्चाने जंतर मंतर, नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. ईव्हीएमवर बंदी घालणे आणि बॅलेट मतपत्रिकांवर परत जाण्याचे त्यांनी समर्थन केले. त्यांनी आंदोलनाचे फोटोही शेअर केले, ज्यात व्हायरल व्हिडीओसारखे दृश्य होते.

आम्हाला अमर उजाला आणि दैनिक भास्कर यांचे ३१ जानेवारीचे आर्टिकल देखील सापडले. दोन्ही प्रसारमाध्यमांनी जंतरमंतर येथे भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टी यासह इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) विरोधात अनेक गटांनी आयोजित केलेल्या आंदोलनाची बातमी दिली होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि बिहारमधील आंदोलकांनी “ईव्हीएम काढून टाका” असे लिहिलेले बॅनर घेतले होते.

निष्कर्ष: म्हणूनच, आम्ही निष्कर्ष काढतो की ईव्हीएमच्या वापरास विरोध दर्शवणारा व्हिडिओ महाराष्ट्राचा नसून जानेवारी २०२४ मधील दिल्लीचा आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे.

(सदर फॅक्ट चेक Mews Meter या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: Fact Check viral post claims that people in Maharashtra are protesting on the streets against EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.