Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 01:20 PM2024-06-14T13:20:23+5:302024-06-14T13:46:14+5:30
Fact Check : ओडिशातील शपथविधी समारंभात राष्ट्रगीत संपण्यापूर्वीच मोदी खुर्चीवर बसले होते का? असा दावा करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे.
Created By: Aajtak
Translated By: ऑनलाइन लोकमत
ओडिशातील शपथविधी समारंभात राष्ट्रगीत संपण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले होते का? असा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
व्हिडिओमध्ये अमित शाह, जेपी नड्डा, नवीन पटनायक यांसारखे अनेक नेते पंतप्रधानांसह मंचावर दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला राष्ट्रगीताची धून ऐकू येत असून सर्व नेते उभे असल्याचे दिसत आहेत. काही सेकंदांनंतर, पंतप्रधान लोकांसमोर हात जोडतात आणि खुर्चीवर बसतात. हे पाहून काही लोक त्यांना उभे राहण्यास सांगतात.
बैठने की इतनी जल्दी है कि राष्ट्रगान खत्म भी नहीं हुआ और सत्ता की सनक मे कुर्सी को हीं सब कुछ मान बैठा आदमी बीच मे हीं बैठ गया!!
— Adv Vipin Nagar (@VipinNagarX) June 12, 2024
👎 pic.twitter.com/rvUyvqf54R
राष्ट्रगीत संपण्यापूर्वीच पंतप्रधान खुर्चीवर बसल्याचे सोशल मीडिया यूजर्स म्हणत आहेत. X वर व्हायरल व्हिडीओ शेअर करताना एका युजरने लिहिलं की, "बसण्याची इतकी घाई आहे की, राष्ट्रगीतही संपलंही नाही आणि सत्तेच्या उन्मादात खुर्चीला सर्वस्व मानणारा माणूस मध्यभागी बसला!" ही बातमी लिहिपर्यंत जवळपास ३ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. असाच दावा करत हा व्हिडिओही फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. अशाच एका पोस्टचं अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहता येईल.
आज तक फॅक्ट चेकमध्ये असं आढळून आलं की व्हिडिओसह दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. राष्ट्रगीत संपल्यानंतरच पंतप्रधान मोदी बसले.
तुम्हाला सत्य कसं कळलं?
मोहन चरण माझी यांनी १२ जून २०२४ रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज तकच्या यूट्यूब चॅनलवर शपथविधीचा संपूर्ण व्हिडीओ आम्हाला मिळाला आहे. व्हायरल व्हिडिओचा भाग २३ व्या मिनिटाला पाहता येतो.
राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान मोदी सर्व नेत्यांसह मंचावर उभे असल्याचं आपण पाहिलं. राष्ट्रगीत संपल्यानंतर ते लोकांसमोर हात जोडून खाली बसले. त्यांच्यासोबत अन्य काही नेतेही आपापल्या खुर्चीवर बसले. पण काही सेकंदांनंतर आणखी एक सूर वाजू लागला, ज्यासाठी अमित शाह आणि इतर काही नेत्यांनी मोदींना उभं राहण्यास सांगितलं आणि ते लगेच उभे राहिले.
आज तकच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रगीतानंतर ओडिशाचे राज्यगीत "वंदे उत्कल जननी" ची धून वाजवण्यात आली. राष्ट्रगीत संपेपर्यंत पंतप्रधान सर्व नेत्यांसमवेत उभे होते आणि राष्ट्रगीत संपल्यानंतरच ते खाली बसले, असंही या समारंभाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मोहन चरण माझी यांनी भुवनेश्वर, ओडिशात दोन उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्र्यांसह शपथ घेतली. यावेळी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह भाजपाचे अनेक नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही आले होते. ओडिशामध्ये प्रथमच भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे.
(सदर फॅक्ट चेक Aajtak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)