Fact Check : ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास कट होणार 173 रुपये?; जाणून घ्या, 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:24 PM2022-07-12T13:24:06+5:302022-07-12T13:33:00+5:30
Fact Check : एटीएममधून पैसे काढल्यास 173 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे.
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार देशाच्या बँकिंग सुविधांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात. यामध्ये काही प्रकारच्या सर्व्हिस चार्जचा देखील समावेश आहे. कोणतेही बदल केल्यास याची माहिती आरबीआय अधिकृत वेबसाईटवरून दिली जाते. सोशल मीडियावर अनेक मेसेज हे सातत्याने येत असतात. पण अनेकदा यातील खरे मेसेज कोणते? हे समजत नाही. एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एटीएममधून पैसे काढल्यास 173 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. आता एटीएममधून एकूण 4 वेळा पैसे काढल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी एकूण 173 रुपये द्यावे लागतील, असा मेसेज व्हायरल झाला आहे. यात 150 रुपये टॅक्स आणि 23 रुपये सर्व्हिस चार्ज यांचा समावेश आहे. पीआयबीने फॅक्ट चेकने या मेसेजमधील हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.
दावा: ATM से 4 से अधिक बार पैसे निकालने पर ₹173 काटे जाएंगे। #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 11, 2022
▶️यह दावा फर्जी है।
▶️अपने बैंक के ATM से हर माह 5 मुफ्त ट्रैन्ज़ैक्शन किए जा सकते हैं।
▶️इसके बाद अधिकतम ₹21/ट्रांजैक्शन या कोई टैक्स होने पर वह अलग से देना होगा।
🔗https://t.co/nkl0LBZOHNpic.twitter.com/AAWcNxd63r
बँकेच्या ATM मधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार करता येतील. यानंतर, प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त 21 रुपये किंवा कोणताही कर असल्यास तो स्वतंत्रपणे भरावा लागेल. आपल्या बँक खात्यातील शिल्लक एटीएममधून तपासण्यापासून ते मिनी स्टेटमेंट किंवा पिन बदलण्यापर्यंत सर्व गैर-आर्थिक व्यवहार विनामूल्य राहतील. 6 मेट्रो शहरे मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे 3 व्यवहार विनामूल्य आहेत आणि त्यावरील तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
तर नॉन मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना 5 एटीएम व्यवहार मोफत आहेत. यानंतर प्रति व्यवहार 21 रुपये आणि नॉन फायनान्शिय ट्रान्झॅक्शनसाठी 8.50 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे एटीएममधील व्यवहारांवर 173 रुपये शुल्क आकारण्याचा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.