Fact Check: गुजरातच्या नावानं व्हायरल होणारा बुलेट ट्रेनच्या यार्डचा 'तो' फोटो चीनमधला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:04 PM2022-12-05T16:04:41+5:302022-12-05T16:05:42+5:30
निवडणुकीचा काळ असला की फेक न्यूज आणि खोट्या दाव्यांचं जणू पेव फुटतं.
निवडणुकीचा काळ असला की फेक न्यूज आणि खोट्या दाव्यांचं जणू पेव फुटतं. वेगवेगळ्या खोट्या दाव्यांसह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जातात. सध्या गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत असाच एक बुलेट ट्रेनच्या यार्डचा फोटो व्हायरल होत आहे. देशातील पहिला बुलेट ट्रेनचा प्रकल्प मुंबई-अहमदाबाद मार्गावर होणार आहे. याचं कामही सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील बुलेट ट्रेनच्या यार्डच्या नावानं एक फोटो व्हायरल केला जात आहे. ज्यात असंख्य बुलेट ट्रेन यार्डात उभ्या असल्याचं दिसतं. या फोटोची पडताळणी केली असता संबंधित फोटो गुजरातमधील नसून चीनच्या वुहान येथील असल्याचं आढळून आलं आहे.
काय आहे दावा?
"विश्वास बसणार नाही पण हा गुजरातचा फोटो आहे", अशा कॅप्शनसह असंख्य बुलेट ट्रेन यार्डमध्ये उभ्या असल्याचा फोटो फेसबुकवर व्हायरल झाला आहे. यात Viral In Maharashtra आणि Voice Of Maharashtra या फेसबुक पेजवर हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. यासह इतरही काही ठिकाणी याच दाव्यासह हा फोटो व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
कशी केली पडताळणी?
व्हायरल इमेजच रिव्हर्स इमेज टूलच्या सहाय्यानं सर्च केलं असता २८ ऑगस्ट २०१८ रोजी "Carl Zha" नावाच्या यूझरचं एक ट्विट आढळून आलं. ट्विटमध्ये हाच फोटो "बुलेट ट्रेन्स, वुहान, चीन" मधील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Bullet Trains. Wuhan, China. pic.twitter.com/slYznVxT44
— Carl Zha (@CarlZha) August 28, 2018
याचाच आधार घेत यूट्यूबवर Bullet Trains in Whan असं सर्च केलं असता New China TV नावाच्या अकाऊंटवर दोन व्हिडिओ आढळून आले. Stunning aerial view of high-speed train maintenance center in Wuhan या मथळ्यानं अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ पाहिला असता व्हायरल फोटोत दावा करण्यात आलेली जागा वुहानमधीलच असल्याचं दिसून येतं.
New China TV च्या मते मध्य चीनमधील वुहान बुलेट ट्रेन देखभाल केंद्र हे सर्वात मोठं आहे. हे एकूण १.४ दशलक्ष चौरस मीटर क्षेत्रात पसरलेलं असून येथे एकाच वेळी १०० हून अधिक बुलेट ट्रेन उभ्या केल्या जाऊ शकतात. तसंच Getty Images या प्रतिष्ठित इमेज सोर्स पोर्टलवरही वुहान येथील बुलेट ट्रेन यार्डचे हे फोटो पाहता येतात. फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
याशिवाय, मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यस्थिती १६ ऑगस्ट २०२२ रोजी रेल्वे मंत्रालयानं शेअर केली होती. या संदर्भातील एक ट्विटही रेल्वे मंत्रालयानं केलं होतं. यात फोटोंमध्ये यार्डचा कोणताही फोटो आढळून आलेला नाही.
Bullet train Progress Report :
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 16, 2022
Land Acquisition Status-
1) Gujarat: 98.8%
2) DNH: 100%
3) Maharashtra: 75.25%
Progress of Works-
1) 162 km of Piling work completed
2) 79.2 km Pier work completed
3) Passenger Terminal Hub at Sabarmati is nearing completion. pic.twitter.com/4Ezh3lRkHy
निष्कर्षः गुजरातमधील बुलेट ट्रेन यार्डच्या दाव्यानं व्हायरल करण्यात आलेला फोटो गुजरातचा नसून चीनमधील वुहान येथील आहे.