व्हॉट्सअॅप भारतात बंद होणार सांगणारी ती व्हायरल ऑडिओ क्लिप फेक, जाणून घ्या सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:42 PM2021-10-07T16:42:56+5:302021-10-07T16:43:08+5:30
एक ऑडिओ मेसेज व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भारतात व्हॉट्सअॅप बंद होण्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकारने दररोज ११.३० ते सकाळी ६.०० पर्यंत व्हॉट्सअॅप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या या व्हायरल ऑडिओ क्लिप मागच सत्य
सोमवारी जगभरातील फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम ( Instagram) आणि व्हॉट्सअॅपची (WhatsApp) सेवा सहा तासांहून अधिक काळ बंद पडली होती. या प्रकारानंतर आता यासंबंधीचा एक ऑडिओ मेसेज व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भारतात व्हॉट्सअॅप बंद होण्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकारने दररोज ११.३० ते सकाळी ६.०० पर्यंत व्हॉट्सअॅप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपवरील वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं या व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये सांगितलं जात आहे.
व्हायरल मेसेजमध्ये पुढं असंही म्हटलं आहे की, जर तुम्ही हा मेसेज किमान १० लोकांना फॉरवर्ड केला नाही तर ४८ तासांत तुमचं व्हॉट्सअप अकाउंट अवैध मानलं जाईल आणि ते बंद केलं जाईल. अकाउंट डिलिट केल्यानंतर व्हॉट्सअॅप सुरू करण्यासाठी दरमहा ४९९ रुपये शुल्क आकारलं जाईल.
अनेक युजर्स ह्या मेसेजमधील दाव्याची पडताळणी करत होते. त्यानंतर हा मेसेज फेक असल्याचं उघडकीस आलं. व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये व्हॉट्सअॅप बंद होण्याचा केलेला हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. व्हॉट्सअॅपबाबत सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. हा मेसेज खोटा असल्याने युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. हा मेसेज दोन वर्षांपूर्वीही व्हायरल झाला होता. त्यानंतर हा मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे.