पत्रकारानं संदर्भहीन प्रश्न विचारला, पोलीस अधिकाऱ्यानं बेचकीनं नेम धरला अन्...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 01:48 PM2022-03-14T13:48:39+5:302022-03-14T13:55:55+5:30
संदर्भहीन प्रश्न विचारल्यानं पोलीस अधिकाऱ्यानं पत्रकारावर बेचकीचा वापर करून हल्ला केला; फोटो व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. पोलिसाच्या हातात एक बेचकी आहे. अधिकाऱ्यानं बेचकी हातात धरून नेम धरला आणि पत्रकारावर हल्ला केला, त्याला धडा शिकवला, असे दावे केले जात आहेत. ट्विटरवर पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
शनिवारपासून (१२ मार्च) पोलीस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होऊ लागला. 'संदर्भहीन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर नवनियुक्त पोलीस प्रवक्त्यांनी बेचकीनं निशाणा साधला,' असं ट्विट एका वापरकर्त्यानं (_@Sir_CharlesR) केलं. या ट्विटला २२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. ८ हजारपेक्षा अधिक जणांनी ते रिट्विट केलं. कालही अनेकांनी पोलिसाचा फोटो फॉरवर्ड केला. त्यामुळे तो बराच व्हायरल झाला.
व्हायरल झालेला पोलीस अधिकारी युगांडाचा आहे. त्यावरून केनियातील प्रसिद्ध वकील अहमदनासीर अब्दुल्लाही यांनी युगांडा पोलिसांची खिल्ली उडवली. 'आमचे शेजारी', असं म्हणत त्यांनी युगांडा पोलिसांना टोला लगावला. त्यानंतर युगांडा पोलिसांनी अब्दुल्लाही यांच्या ट्विटला उत्तर दिलं. व्हायरल ट्विटमधील दावा खोटा असल्याचं युगांडा पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितलं. त्यानंतर अब्दुल्लाही यांनी ट्विट डिलीट केलं.
नेमकं सत्य काय?
व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव फ्रेड इनागा आहे. गेल्या वर्षी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील त्यांचा फोटो आता व्हायरल झाला आहे. नव्या गुन्हेगारी टोळ्यांची माहिती देण्यासाठी इनागा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या टोळ्या नागरिकांना बेचकीचा वापर करून लक्ष्य करायच्या. 'ते अशा प्रकारे तुमच्यावर निशाणा साधतात. यावरून तुम्हाला गांभीर्य समजेल,' असं इनागा सांगत होते. इनागा यांचा गेल्या वर्षींचा फोटो आता चुकीच्या माहितीसह व्हायरल होत आहे.