पोलंडमधलं एक 700 लोकवस्तीचं छोटूसं गाव. पण या गावाला भेट द्यायला दरवर्षी जगभरातून हजारो पर्यटक येतात. असं काय आहे या गावात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 06:15 PM2017-07-18T18:15:45+5:302017-07-18T18:15:45+5:30
गेल्या शतकभरापासून झाल्पिमधल्या स्त्रिया आणि अगदी क्वचित पुरूष परंपरागत लोककलांचा वापर करत आपल्या घराच्या भिंती आतून आणि बाहेरुन सुशोभित करतात.
- अमृता कदम
पोलंडमधलं छोटंस गाव झाल्पि. इथल्या बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. या गावात राहणाऱ्या 70 वर्षांच्या आजीबाई दान्ता दिमॉन. सध्या त्या व्यस्त आहेत आपल्या घराचं विटांचं कुंपण रंगवण्यात. सुंदर, नाजूक फुला-फुलांच्या नक्षीनं त्या आपल्या घराचं कुंपण सजवत आहेत. या टुमदार शेतकरी गावात दिमॉन आज्जीबाई त्यांच्या या रंगीबेरंगी घरासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घराचं छत, भिंती, पडदे, उशा, किटल्या बॉइलर, लाकडी चमचे आणि बरंच काही त्यांच्या फुलाफुलांच्या नक्षीनं सजली आहेत.
पण हातात कुंचला घेऊन घर सजवणा ऱ्या झाल्पिमधल्या त्या एकट्याच नाहीत. गेल्या शतकभरापासून झाल्पिमधल्या स्त्रिया आणि अगदी क्वचित पुरूष परंपरागत लोककलांचा वापर करत आपल्या घराच्या भिंती आतून आणि बाहेरुन सुशोभित करतात. त्यामुळेच केवळ वृक्षवेलीच नाही तर ‘बहरलेल्या’ घरांचं हे पोलिश गाव पर्यटकांनाही आकर्षित करत आहे.
गेल्या वर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून 25,000पर्यटक अवघ्या 700 लोकवस्तीच्या या गावाला भेट द्यायला आले होते. जपान, अमेरिका, रशियामधून पर्यटक झाल्पिमधल्या घराघरांवर अवतरलेला ‘वसंत’ पहायला आले होते. मका, कोबी, स्ट्रॉबेरीच्या शेतांमधली ही टुमदार रंगीबेरंगी कुसर केलेली घरं पाहात गावांतून फेरफटका मारणं हा डोळ्यांना आणि मनाला सुखावणारा अनुभव आहे.