जगभरात आतापर्यंत घालण्यात आलेल्या पुस्तकबंदीचा एक 75 वर्षीय महिला करतेय अनोख्या पध्दतीनं निषेध. ग्रीकमध्ये ती साकारतेय पुस्तक बंदीचं स्मारक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 01:51 PM2017-07-15T13:51:53+5:302017-07-15T13:51:53+5:30
जगभरात पुस्तकांवरील या बंदीचा निषेध करण्यासाठी एक 74 वर्षीय महिला पुढे सरसावली आहे. बंदी घातलेल्या पुस्तकांच्या सहाय्यानं एक भव्य स्मारक ती साकारतेय.
- सारिका पूरकर-गुजराथी
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचं, ते व्यक्त करण्याचं सर्वात सुंदर माध्यम म्हणजे कला. मग ती कोणतीही असो. कोणी छान चित्रं काढत असेल किंवा कोणी कविता करत असेल, कोणी अभिनय तर कोणी लेखन. कलेतून आपला आनंद, दु:ख, संघर्ष, निषेध, पाठिंबा, विरोध सर्वकाही सहज व्यक्त करता येतं. शिवाय ते इतरांपर्यंत सहज पोहोचतं देखील. कोणताही कलाकार त्याच्या कलेतून नेहमीच समाजमनाचा, स्वमनाचा आरसा दाखवत असतो.
परंतु, या कलेतून असं प्रामाणिक व्यक्त होणं काहीवेळेस खूप महागात पडतं. कधी या कलाकारांच्या कलाकृतींवर थेट बंदीच घातली जाते. एम.एफ.हुसेन हे अलीकडच्या काळातील खूप समर्पक उदाहरण आहे त्याचं. आपल्या पेटिंग्जमधून त्यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केला आहे असा आरोप करीत त्यांच्या या कलाकृतींच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. पुस्तकांच्या दुनियेतही ही बंदी अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांच्या वाट्याला आली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स आॅफ हिंदूइझम, जेम्स लेन यांचे शिवाजी, जसवंत सिंग यांचे जिना,जोसेफ लेलिवेल्ड यांचे द ग्रेट सोल महात्मा गांधी, स्टॅनले वोलपर्ट यांचे नाईन अवर्स टू रामा, आनंद यादव यांचे संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या आणि जगभरातील इतर कितीतरी पुस्तकांवर बंदी घालण्यात आली होती.त्यामागे राजकीय, धार्मिक अशी अनेक कारणं दिली गेली. परखड भाष्य, सडेतोड लेखन यामुळे या पुस्तकांच्या लेखकांना अनेकांचा रोष पत्कारावा लागला होता.
अशाच जगभरात पुस्तकांवरील या बंदीचा निषेध करण्यासाठी एक 74 वर्षीय महिला पुढे सरसावली आहे. बंदी घातलेल्या पुस्तकांच्या सहाय्यानं एक भव्य स्मारक ती साकारतेय. हॅरी पॉटरपासून आनंद यादव काय आणि जेम्स लेन काय? साहित्यावरील ही बंदी ती मान्य करत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून या बंदीकडे पाहताना साहित्य हे या कोत्या विचारांपेक्षा कितीतरी पटीनं महान असतं, श्रेष्ठ असतं हेच ती हे स्मारक उभारुन सांगू पाहतेय. अर्जेंटिनाची मार्टा मिनुजिन हीच ती महिला.. ग्रीकमधील पार्थेनॉन या प्राचीन मंदिराची ही प्रतिकृती मार्टा मिनुजिन ही जगभरात बंदी घातलेल्या सुमारे एक लाखांहून अधिक पुस्तकांचा वापर करुन साकारतेय.