Alert : आता फेसबुक युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर वेबकॅमद्वारे ठेवणार लक्ष !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 10:20 AM2017-06-10T10:20:48+5:302017-06-10T15:58:05+5:30
इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व युजर्सची डिजीटल कुंडली फेसबुक आणि गुगलकडे आहे, हे आपणास कदाचित माहिती असेलच.
Next
आता युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर फेसबुक वेबकॅमद्वारे लक्ष ठेवणार आहे. त्यासंबंधीचे तंत्रज्ञान लवकरच विकसित केले जाणार असून त्याच्या पेटंटसाठी अर्जदेखील करण्यात आला आहे.
इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व युजर्सची डिजीटल कुंडली फेसबुक आणि गुगलकडे आहे, हे आपणास कदाचित माहिती असेलच. ही जरी चिंतेची बाब आहे, मात्र काळाचीदेखील गरज आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे आता फेसबुकने चक्क युजरच्या वेबकॅमच्याच मदतीने त्यावर नजर ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित करून याचे पेटंट मिळावे म्हणून अर्जदेखील दाखल केला आहे. या अर्जात भरण्यात आलेल्या माहितीनुसार फेसबुक या माध्यमातून युजरच्या हालचालींचे निरिक्षण करून याचे विश्लेषण करणार आहे. अर्थात आपण आपल्या यादीत असणाऱ्या एकाद्या मित्राने शेअर केलेल्या छायाचित्राकडे पाहून हसलो तर लागलीच याची माहिती फेसबुककडे जमा होईल. याचे विश्लेषण करून फेसबुक संबंधीत युजरच्या मनोवृत्तीशी संबंधीत सर्व माहिती मिळवू शकतो. याचसोबत संबंधीत युजरला त्या छायाचित्राशी संबंधीत तसेच ते शेअर करणाऱ्या युजरच्या जास्त पोस्ट त्याच्या न्यूज फिडमध्ये दिसू लागतील. तर एखादी पोस्ट, छायाचित्र वा व्हिडीओकडे त्या युजरने दुर्लक्ष केले तर त्याच्या न्यूज फिडमध्ये याच्याशी संबंधीत कंटेंट कमी प्रमाणात दिसेल. फेसबुकने या प्रकारच्या प्रणालीसाठी पेटंट दाखल केल्यामुळे सायबर विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे. अर्थात अनेक टेक पोर्टल्सनी याबाबत संपर्क करूनही फेसबुकने यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. या संदर्भात सविस्तर अहवाल सीबी इनसाईट या संस्थेने छापला आहे.