सुंदर दिसायचं मग कोथिंबीर चेहे-याला लावायलाच हवी !
By Madhuri.pethkar | Published: September 22, 2017 06:50 PM2017-09-22T18:50:15+5:302017-09-22T18:58:20+5:30
चेहेरा निस्तेज, मलूल दिसत असेल तर तो फ्रेश करण्याचा मार्ग आपल्या स्वयंपाकघरात सापडतो. मूठभर कोथिंबीर त्वचेचे अनेकप्रश्न चुटकीसरशी सोडवते.
- माधुरी पेठकर
भाजी, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ तेव्हाच चविष्ट होतात जेव्हा त्यांच्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरली जाते. कोथिंबीरमुळे पदार्थाला चव आणि सौंदर्य दोन्ही मिळतं. पण ही कोथिंबीर फक्त यासाठीच भुरभुरली जात नाही. खरंतर अनेक गुणांचा खजिना म्हणजे कोथिंबीर. लोह, क जीवनसत्त्वं, शरीरास आवश्यक असे अॅण्टिआॅक्सिडंट्स असं सर्व काही कोथिंबीरमध्ये असतं. कोथिंबीर चावून खाल्ल्यानं त्वचेवरचा ताण हलका होतो. त्वचा लवचिक होते. कोथिंबीरमुळे शरीराला अॅण्टिआॅक्सिडंट मिळतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाही. कोथिंबीरमध्ये असलेल्या लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते. उठल्यानंतर रिकाम्यापोटी कोथिंबीरची पानं धुवून चावून खाणं हे आरोग्यदायी असतं.
चेहे-यावर जर मुरूम, पुटकुळ्या, फोड असतील, ब्लॅकहेडस असतील तर कोथिंबीरचा रस काढून तो चेहे-यास लावल्यास उत्तम फायदा मिळतो. त्वचेचे अवघड विकारही कोथिंबीरच्या उपयोगानं आटोक्यात येतात. तसेच ओठ काळे असल्यास कोथिंबीर ओठांना रगडून लावल्यास ओठ मऊ होतात आणि काळसरपणाही जातो.
कोथिंबीर पोटात गेल्यानं अॅसिडीटी कमी होते. अॅसिडीटी कमी झाल्यास अॅसिडिटीनं होणारे त्वचाविकारही आटोक्यात येतात.
त्वचेसाठी कोथिंबीर वापरण्याच्या काही विशेष पध्दती आहेत. याच पध्दतीनं कोथिंबीर वापरल्यास कोथिंबीरमुळे त्वचेचा पोत सुधारून त्वचा निरोगी होते.
1. कोथिंबीर आणि कोरफड
ताजी कोथिंबीर वाटून घ्यावी. त्यात कोरफडचा गर घालावा. हे मिश्रण चांगलं एकत्र करावं. आणि ते चेहे-यास लावावं. यामुळे चेहे-यावरील सुरकुत्या निघून जातात.
2. कोथिंबीर आणि लिंबाचा रस
वाटलेल्या कोथिंबीरमध्ये थोडा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहे-यास लावल्यास मुरूमाचे डाग, फोडांच्या जखमा ब-या होतात. ब्लॅक हेडस जातात. तसेच चेहे-यावरच्या मृतपेशी निघून जातात. या मिश्रणाच्या लेपामुळे त्वचेला नवेपणा प्राप्त होतो.
3. कोथिंबीरचा फेस पॅक
कोथिंबीर रगडून घ्यावी. त्यात थोडं दूध, मध आणि लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण लेपासारखं चेहे-यास लावावं. यामुळे त्वचा चमकते, उजळते.
4. कोथिंबीर आणि तांदूळ
त्वचेला नवता प्रात्प करून देण्याचं काम कोथिंबीर आणि तांदूळ हे कॉम्बिनेशन करतं. यासाठी तांदूळ वाटून घ्यावेत. त्यात कोथिंबीरचा रस घालावा. आणि तो लेप लावावा. यामुळे चेहे-याच्या स्नायूंना आणि पेशींना आराम मिळतो. त्वचा फ्रेश होते.