आर्मीवालं प्रिंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:10 AM2018-04-12T09:10:00+5:302018-04-12T09:10:00+5:30
हृतिकने अलीकडेच एक भन्नाट कॅमो प्रिंट वापरलं, ते आपल्याला शोभेल का?
- श्रुती साठे
कॅमो फ्लाज किंवा कॅमो प्रिंट हे सहसा आर्मी युनिफॉर्ममध्ये वापरलं जातं असा आपला समज आहे. आपण तसं प्रिंट आर्मीवाल्यांच्याच कपड्यांत पाहिलेलंही असतं; परंतु आता कॅमो प्रिंट ट्रेण्डमध्ये आहे. कॉँफिडण्ट, टफ लूक देण्यास कॅमो प्रिंट अतिशय योग्य आहे. कॅमो प्रिंट दिसायला साधं दिसलं तरी ते कॅरी करणं तसं सोपं नाहीये. लेदर शूज किंवा सॅण्डल्स, डार्क गॉगल आणि हे कॅमो प्रिंट हे सारं घालता तर कुणालाही येईल, पण ते शोभणं मात्र महत्त्वाचं असतं.
कपड्यांमध्ये ठोस असे नियम नसतात, कोणी ठामपणे म्हणू शकत नाही हे चांगलं आणि ते वाईट? प्रत्येकाची रंगांची आवड, व्यक्तिमत्त्व, बांधा इत्यादी गोष्टींवर कपड्याची पसंती ठरते. अलीकडेच हृतिक रोशननं एक आगळंवेगळं कॉम्बिनेशन वापरून मोठी तारीफ कमाई केली. कधीच न पाहिलेलं फ्लोरल शर्ट आणि कॅमो जॅकेट आणि पॅण्ट हे कॉम्बिनेशन त्यानं केलं होतं. ते पेललंही खूप प्रभावीपणे. फ्लोरल आणि कॅमो याचा एकत्र वापर तसा खूप दुर्मीळ; पण त्यामुळेच हटके वाटला. सूर नवा ध्यास नवा फेम शाल्मलीसुद्धा गेल्या आठवड्यात कॅमो जम्पसूटमध्ये दिसली. तिचा स्लिव्हलेस फ्रंट झिप कॅमो जम्पसूट एकदम बोल्ड लूक देऊन गेला. तिचा सडपातळ बांधा, उंची, हेअरस्टाइल, सॅण्डल्स हे सगळंच कॅमो जम्पसूटला साजेसं होतं, त्यामुळेच तिचा एक भन्नाट लूक आपल्याला दिसला.
कॅमो प्रिंट हे काळ्या-करड्या, हिरव्या,-पिवळसर, निळया रंगसंतीत पाहायला मिळतात. या प्रिंटमध्ये कार्गो पॅण्ट, शॉर्ट्स, केप्री, शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, शूज हटके दिसतात. कॅज्युअल डे आउटिंग, ट्रेक, जंगल सफारी इत्यादीसाठी कॅमो प्रिंट साजेसं आहे. कॅमो प्रिंटेड कार्गो, कॅप्री, जॅकेट वापरत असाल तर प्लेन काळा टी-शर्ट, टॅन्क टॉप हे कॉम्बिनेशन सुटसुटीत ठरतं.
sa.shruti@gmail.com