आकर्षण पैजणांचे

By admin | Published: June 8, 2017 02:58 AM2017-06-08T02:58:32+5:302017-06-08T02:58:32+5:30

छुम...छुम... हा पैंजणातून येणारा आवाज कोणाचेही मन मोहून घेतो

Attraction pens | आकर्षण पैजणांचे

आकर्षण पैजणांचे

Next

- रीना चव्हाण
छुम...छुम... हा पैंजणातून येणारा आवाज कोणाचेही मन मोहून घेतो. पैंजण हा महिलांच्या श्रृंगारातील एक अलंकार आहे. पूर्वी स्त्रिया जाडजूड आणि मोठ्या डिझाइन्सचे चांदीचे पैंजण पायात घालत. पण बदलत्या काळानुसार पैंजण या अलंकारातसुद्धा बदल झाल्याचे दिसून येते. आजकालच्या फॅशननुसार आकर्षक कलाकुसर वेगवेगळ्या धातूतील पैंजण मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. साखळी, गोफ, डायमंड, मणी, मोती, मीनावर्क केलेले पैंजण बघायला मिळतात. एखादा समारंभ वा लग्न कार्यात पैंजणांना विशेष मागणी असते. आवडीबरोबरच शास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास चांदी किंवा सोन्याचा धातूचे अलंकार महिलांच्या हाडांकरिता फायदेशीर असतात.
पूर्वी महिला साड्यांवर पैंजण घालत, त्यानंतर पंजाबी ड्रेसवर पैंजण घालण्याची फॅशन होती. पण आता जीन्सवर एकाच पायात पैंजण घालण्याचा तरुणींचा ट्रेंड दिसतो. विशेष म्हणजे केप्रीज, शॉर्ट टॉप, हायहिल्स आणि डाव्या पायात अ‍ँकलेट. बारीक चेन आणि त्यावर घुंगरूच्या पैंजणांना तरुणींकडून विशेष पसंती दिसते.सोन्या आणि चांदीबरोबर मार्केटमध्ये विविध प्रकारच्या पैजणांना पसंती दर्शविली जाते त्याबाबत जाणून घेऊ या.
चांदीचे पैंजण
भारतीय संस्कृतीत पैंजणाला विशेष पारंपरिक महत्त्व आहे. मुलाच्या जन्मानंतर विधिपूर्वक पायात पैंजण घातले जातात. चांदी आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा शोषून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून त्या मुलाचे रक्षण होते. पैंजणातून येणाऱ्या छुम-छुम आवाजाचे तरंग वातावरणात पसरतात तेव्हा नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होते. आध्यात्मिक मान्यतेनुसार महिलांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी पायात पैंजण घालणे आवश्यक आहे.
सोन्याचे पैंजण
आवड वा फॅशन म्हणून सोन्याचे पैंजण घातले जातात. पण आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतात. सोन्यापासून बनविलेली आभूषणे अधिक उष्ण तर चांदी थंड असते. त्यामुळेच आयुर्वेदानुसार मनुष्य प्राण्याचे डोके थंड आणि पाय गरम असायला हवेत. त्यामुळे अंगावर सोन्याचे व पायात चांदीचे आभूषण घालणे गरजेचे आहे. पायात चांदीचे आभूषण घातल्याने पाठ, गुडघे, हाड दुखण्याचे प्रमाण कमी होते. जर अंगावर आणि पायात सोन्याचे आभूषण घातल्यास डोके आणि पायात गरम ऊर्जा निर्माण होऊन आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते.
सिंपल पैंजण
काही महिलांना जाड वा भरगच्च पैंजण आवडत नाही. त्यांच्यासाठी सिंपल पैंजण एक चांगला पर्याय आहे. चांदी व सोन्यामध्ये एक गोफ, साखळी व घुंगरू लावलेले पैंजण मार्केटमध्ये सहज मिळतात.
पारंपरिक पैंजण
लग्न म्हटले की नवरीच्या पायात पैंजण हवेच. पारंपरिक पद्धतीचे पैंजण मजबूत तसेच खूपच आकर्षक असतात. यामुळे तुमचे पाय खूप छान दिसतात.
थोंग पैंजण
पैंजणांतील एक आकर्षक कलाकुसर याला म्हणता येईल. यामुळे तुमचा पूर्ण पाय झाकून जातो. मणी, मोती, कुंदन, साखळी यांच्या कलाकुसरीबरोबर वेगवेगळ्या डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.
बीडेड पैंजण
चांदी आणि सोन्याच्या पैजणांपेक्षा हे पैंजण खूपच हलके असतात. इंडियन लूक बरोबर वेस्टर्न लूकवरही हे उठून दिसतात. कॉलेज तरुणींकडून यांना जास्त पसंती दिसून येते.
कुंदन पैंजण
कुंदन पैंजण हे सुद्धा उठून दिसतात. मॉर्डन आणि पारंपरिक कलाकुसीचे ते मिश्रण आहे. तसेच हाताळायलाही सोपे असतात.
घुंगराचे पैंजण
छोट्या-छोट्या घुंगारांपासून बनविलेले पैंजण आकर्षक दिसण्याबरोबर एक पारंपरिक लूक देतात. घुंगरातून येणाऱ्या छुम...छुम... हा आवाजाने मन प्रफुल्लित होते.
झालर पंैजण
वजनाला जड आणि झालर असलेले पैंजणही खूप छान दिसतात. कुंदन आणि चांदीच्या जाड पट्टीवर झालरीसारखे चांदीच्या बारीक चेन सोडलेल्या असतात.
पैंजणाचे आकर्षण हे लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत साऱ्यांनाच आहे. या पैंजणावर मराठी आणि हिंदी चित्रपटात गाणी देखील आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच या पैंजणाची फॅ शन आहे आणि काळानुसार त्यामध्ये बदल झाले आहेत.

Web Title: Attraction pens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.