सुंदर दिसण्यासाठी खूप काही आणण्याची गरज नाही थोडं खोब-याचं तेलही पुरे होतं.
By madhuri.pethkar | Published: September 20, 2017 07:08 PM2017-09-20T19:08:15+5:302017-09-20T19:13:06+5:30
सुंदर दिसण्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर मग साधा सुधा विचार करायला हवा. यासाठी हाताशी खोब-याचं तेल असलं तरी पुरतं. केसांच्या आरोग्यासाठी खोब-याचं तेल वापरलं जातं. पण त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठीही खोब-याच्या तेलाचा उत्तम उपयोग होतो.
- माधुरी पेठकर
निसर्गत: सुंदर दिसायचं तर मग उपायही नैसर्गिकच हवेत. पार्लरमध्ये जावून वेगवेगळ्या केमिकल्सचे फेस पॅक लावून, महागड्या ब्युटी ट्रीटमेंण्ट घेवून तेवढ्यापुरती सुंदर दिसण्यात अर्थ नसतो. जोपर्यंत आपली त्वचा निरोगी होत नाही, सुदृढ होत नाही तोपर्यंत दीर्घकाळपर्यंत सुंदर दिसणं हे दिवास्पन ठरू शकतं.
सुंदर दिसण्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर मग साधा सुधा विचार करायला हवा. यासाठी हाताशी खोब-याचं तेल असलं तरी पुरतं.
केसांच्या आरोग्यासाठी खोब-याचं तेल वापरलं जातं. पण त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठीही खोब-याच्या तेलाचा उत्तम उपयोग होतो.
खोब-याच्या तेलाचे सौंदर्य उपाय
1. खोब-याच्या तेलात त्वचा ओलसर ठेवण्याचा नैसर्गिक गुण असतो. खोब-याचं तेल अमूक एक प्रकारच्याच त्वचेला चालतं असं नाही. सर्व प्रकारच्या त्वचेला हे खोब-याचं तेल चालतं. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांच्यासाठी तर खोब-याचं तेल म्हणजे वरदानच.
2. चेहे-यावर लावलेला मेकअप नीट निघून गेला तर त्वचेच्या नैसर्गिक सौंदर्याचं रक्षण होतं. हा मेकअप पध्दतशीरपणे काढण्याचं काम खोब-याचं तेल करतंं. हेवी किंवा किरकोळ मेकअप असला तरी खोब-याच्या तेलानं काढता येतो. तसेच वॉटरप्रूफ मेकअपही खोब-याच्या तेलाचा उपयोग करून काढता येतो.
3. खोब-याच्या तेलाचा उपयोग बॉडी मसाजसाठी करता येतो. यामुळे बाहेरच्या प्रदुषणाला सामोरं जाणा-या त्वचेला आरामही मिळतो. खोब-याच्या तेलानं मसाज केल्यानं त्वचा ओलसर राहते. आणि चकचकीत दिसते. लकाकते.
4. खोब-याच्या तेलाचा उपयोग मॉश्चरायझर म्हणूनही करता येतो. बाजारात जे मॉश्चरायझर क्रीम आणि लोशन्स मिळतात ती प्रामुख्यानं पेट्रोलियम किंवा वॉटर बेस्ड असतात. पण या प्रकारच्या मॉश्चरायझरपेक्षा खोब-याचं तेल मॉश्चरायझर म्हणून उत्तम काम करतं. खोब-याच्या तेलामुळे त्वचेवरील लालसरपणा, खाज निघून जाते. तसेच त्वचेवरील फोडही खोब-याच्या तेलाच्या नियमित मसाजमुळे निघून जावू शकतात. खोब-याच्या तेलात थोडी रवाळ साखर घालावी. या मिश्रणानं चेहे-यावर हलक्या हातानं मसाज करावा. रवाळ साखरेमुळे चेहे-यावरची मृतत्वचा निघून जाते. आणि खोब-याच्या तेलामुळे त्वचेला आतपर्यंत मॉश्चरायझर मिळतं.
5. चेहे-यावर किंवा डोळ्याखाली सुरकुत्या पडायला लागल्या तर वय कितीही कमी असलं तरी वय वाढल्यासारखं वाटतं. पण खोब-याचं तेल जर नियमितपणे लावलं तर सुरकुत्या पडत नाही. पडल्या असल्यास कमी होतात.
6. त्वचा तजेलदार दिसण्यासाठी, त्वचेवरचे फोड बरे करण्यासाठी खोब-याच्या तेलाचा लेपासारखा उपयोग करता येतो. यासाठी समप्रमाणात खोब-याचं तेल आणि मध घ्यावं. आणि त्याचा लेप चेहे-यावर लावावा.
7. खोब-याच्या तेलाचा उपयोग लिपबामसारखाही करता येतो. ओठांना दिवसातून चार ते पाचवेळा खोब-याचं तेल लावावं. ओठ मऊ राहातात. कोरडे पडत नाही.
8. खोब-याचं तेल जंतूंशी लढतं. म्हणूनच काही कापलं, खरचटलं तर त्या जागी खोब-याचं तेल लावावं.