व्हा स्वत:च्या डिझायनर!
By admin | Published: April 6, 2017 02:29 AM2017-04-06T02:29:07+5:302017-04-06T02:29:07+5:30
कित्येकदा मनात येते, कशाला हवाय बुटीकचा खर्च? कापडाच्या खर्चापेक्षा शिलाईची फी अधिक!
- श्रुती साठे
कित्येकदा मनात येते, कशाला हवाय बुटीकचा खर्च? कापडाच्या खर्चापेक्षा शिलाईची फी अधिक! असा विचार करून आपण आपले नेहमीच्या शिंपीदादाला गाठतो, त्यांना बराच दम देत, अनेक सूचना त्यांना सांगतो. मात्र, कितीही प्रयत्न केला, तरी त्या फोटोतल्या मॉडेलसारखे फिटिंग काही होत नाही आणि मग ड्रेस दुरुस्तीसाठी वाऱ्या सुरू! बुटीकमध्ये डिझायनर अशा काय युक्त्या वापरतात, जेणेकरून तो ड्रेस त्याच क्लायंटसाठी बनलाय, असे वाटून जाते? यातल्या काही सोप्या टिप्स आपण आपल्या शिंपीदादांकडून करून घेतल्या तर...
इनव्हिसिबल
झीपरचा वापर
नेहमीच्या चेन/ झिप बंद केल्या, तरी त्याचे दात्रे आणि पुलर दिसतो. इनव्हिसिबल झीपर अतिशय पातळ आणि नाजूक असते. व्यवस्थित शिवली, तर ती अजिबात दिसत नाही. त्यामुळे सफाईदार फिटिंग येण्यास खूप मदत होते आणि कपड्याचा लूकही छान येतो. इनव्हिझिबल झीपर बाजारात सहज उपलध आहे.
चांगल्या प्रतीचे
अस्तर वापरणे
अस्तर कॉटनचे असल्यास ते मिठाच्या पाण्यात बुडवून धुवावे. यामुळे ज्यादा असलेला रंग व खळ दोन्ही निघून जाईल. असे केल्याने वरच्या कापडाला रंगाचा डाग लागणार नाही आणि ड्रेस धुतल्यावर अस्तर आटणार नाही. सहसा पॉलीस्टरचे अस्तर वापरावे, ते आटत नाही व त्याचा रंगसुद्धा जात नाही.
साध्या कापडावर शिवून पाहाणे
एखाद्या साडीचा ड्रेस बनवायचा असेल, तर आधी साध्या कापडावर (सहसा मांजरपाट कपड्यावर) आधी तो ड्रेस शिवून बघतात. या कच्च्या ड्रेसला फक्त गरजेच्या टिपा मारून साचा तयार केला जातो. क्लायंटला बोलावून त्या कच्च्या ड्रेसचे फिटिंग पाहिले जाते, गरजेनुसार पॅटर्नमध्ये योग्य ते बदल केले जातात. सर्व प्रकारची खात्री केल्यांनतर मूळ साडीचा ड्रेस शिवला जातो. यामध्ये वेळ आणि पैसे जास्त लागले, तरी ज्या मूळ कापडाचा ड्रेस शिवायचा, ते कापड वाया जाण्याचा धोका टळतो.
शोल्डर पॅडचा वापर : सुळसुळीत कापडाचा ड्रेस, जॅकेट शिवायचे असल्यास, शोल्डर पॅड्सचा नक्की वापर करावा. याने खांद्याची गोलाई उठून दिसते व फिटिंग सुरेख बसते.
गोट/ पायपिंग, बटण : तुम्हाला ब्लॉउज किंवा ड्रेसला एखादे बटण, कॉन्ट्रास्ट गोट लावायचे असल्यास, स्वत: हव्या त्या रंगाचे गोटासाठी लागणारे कापड, बटण इत्यादी खरेदी करा. गोटाची बांधणी नाजूक व घट्ट जमल्यास गळ्याभोवती अतिशय सुरेख दिसतो.
शिवताना वारंवार इस्त्री करणे
टॉप, ड्रेस किंवा ब्लाउज शिवताना, त्याचा गळा, बाह्या, चेन, बटणाचा भाग नाजूक प्रकारे हाताळातात. हे भाग शिवून होताच, त्यावर हलक्या हाताने इस्त्री फिरवली की, फिटिंगमध्ये एक वेगळीच सफाई येते.
कप्सचा वापर
ब्लॉउज, अनारकली यासारखे कपडे शिवताना ब्रा कप्स वापरल्यास फिटिंग सुरेख होते आणि बांधा डौलदार दिसण्यास मदत होते.