ब्यूटी विथ बटाटा

By Admin | Published: April 7, 2017 07:02 PM2017-04-07T19:02:57+5:302017-04-07T19:02:57+5:30

बटाट्यामध्ये काय असतं एवढं?असं टिंगलेपुरती म्हणणं ठीक आहे.पण बटाटा जेवढी चव जीभेला देतोतितकंच सौंदर्य चेहेऱ्यालाही देतो.सौंदर्यासाठी बटाटा एकदा वापरून तर पाहाम्हणजे खात्री पटेल!

Beauty with potato | ब्यूटी विथ बटाटा

ब्यूटी विथ बटाटा

googlenewsNext

बटाटा. त्यात काय असतं एवढं अशी बटाट्याची टिंगल अनेकजण करतात. काही येत नसलं तर डोक्यात काय बटाटे भरले आहेत का तुझ्या? असं म्हणून त्या व्यक्तीसोबत त्या बटाट्याचाही उध्दार होतो. पण स्वयंपाकघरात बटाटा कसा अडीनिडीला धावून येतो हे प्रत्येकीलाच माहित असतं. एवढंच नाहीतर बटाट्याला कितीही नावं ठेवली तरी प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थातला एक तरी पदार्थ हा बटाट्याचाच असतो.
अडीनिडीची वेळ भागवणारा, जिभेला चव देणारा बटाटा चेहेऱ्याला सौंदर्यही देतो.
आता बटाटा आणि ब्युटीचा कुठून आलाय संबंध. हा संबंध येतो तो बटाट्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे.
बटाट्यामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वाबरोबरच फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फायबर, प्रथिनं यांसारखे गुण ठासून भरलेले आहेत. त्यामुळे बटाटा औषध म्हणूनही उत्तम काम करतो. चेहेऱ्यासाठी बटाटा एकदा वापरून बघितला तर सौंदर्यासाठी बटाट्याच्या उपयुक्ततेची नक्की खात्री पटते.
त्वचेवरचे डाग असू देत नाहीतर डोळ्याखालची काळी वर्तुळं, बटाटा वापरल्यास उपाय लागू होणारच एवढी बटाट्याविषयी खात्री देता येऊ शकते. कच्चा बटाटा सोलून तो किसून त्याचा रस चेहऱ्याला लावला की त्वचा उजळते. वांगाचे डाग, चेहऱ्यावरचे मुरूम-पुटकुळ्यांचे डाग, डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवायची असतील तर कापसाचा बोळा बटाट्याच्या रसात बुडवून डागांच्या ठिकाणी लावल्यास फायदेशीर ठरतं. बटाट्याच्या रसाचा उपयोग संधिवात आणि पचनाच्या तक्रारीतही होतो.
त्वचेवरील बटाट्याच्या उपयोगामुळे पेशी जिवंत होतात. त्यामुळे त्वचा ताजी आणि टवटवीत होते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांसाठीही बटाट्याचा उपयोग होतो.
त्वचेसंबंधीच्या प्रत्येक तक्रारीवर नुसता बटाटा वापरून उपयोगाचा नाही. ती समस्या कोणती आहे हे बघून कशाबरोबर वापरावा हे ठरवावं लागतं. आणि म्हणूनच त्वचाविकारांवर बटाट्याचा उपयोग करताना तो काकडी, ओटस, कोरफड यासोबत वापरावा.

बटाटा, काकडी आणि बदाम
चेहऱ्यावरचे डाग घालवायचे असतील तर बटाटा, काकडी आणि बदाम हे एकत्र करून वापरायला हवं.
यासाठी एक बटाटा, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धी काकडी, अर्धा कप बदामाची पावडर आणि पाव कप गुलाबपाणी घ्यावं. हा पॅक बनवताना बटाट्याची सालं काढावी. तो किसून घ्यावा. त्यात काकडीचा रस आणि बदामाची पावडर घालावी. या मिश्रणाची बारीक पेस्ट करावी. त्यात लिंबाचा रस घालावा. आणि ही पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी जास्त डाग आहेत तिथे लावावी. पंधरा मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर सुकू द्यावी. आणि नंतर गुलाबपाण्यानं चेहरा धुवून घ्यावा.

कोरफड आणि बटाटा
बटाट्यात असलेल्या शुद्धतेच्या गुणधर्मामुळे सूर्यप्रकाशामुळे काळ्या झालेल्या त्वचेवर बटाटा उत्तम काम करतो. यासाठी बटाट्याबरोबर कोरफड वापरावी.
यासाठी पाव कप कोरफड आणि एक कप बटाट्याचे काप घ्यावेत. हे दोन्हीही मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याचा रस काढावा. हा रस सूर्यप्रकाशामुळे काळसर झालेल्या भागावर लावावा. हा उपचार डाग जाईपर्यंत रोज करावा. पण म्हणून आठवड्याभराचा पॅक एकदम करून ठेवू नये. कारण बटाटा असल्यामुळे तो पॅक लगेच काळा पडतो. म्हणून हा पॅक रोज ताजा ताजाच करावा लागतो.

ओटस आणि बटाटा
एक चमचा ओटमील पावडर, एक चमचा बदामाची पावडर आणि दोन ते तीन चमचे बटाट्याचा रस घ्यावा. हे सर्व नीट एकत्र करावं. पाच मिनिटांनी बटाट्याच्या रसानं चेहरा धुवावा. आणि नंतर चेहरा परत गार पाण्यानं धुवावा.

डोळ्यांवर सूज आली असल्यास
कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढून तो सूज आलेल्या भागावर लावल्यास डोळ्यांवरची सूज कमी होते. बटाट्याचे काप सकाळी उठल्या उठल्या पाच मिनिटं डोळ्यावर ठेवल्यासही सूज कमी होते.

 

Web Title: Beauty with potato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.