‘क्रिएटिव्ह’ होण्यासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 04:40 PM2017-01-07T16:40:09+5:302017-01-07T16:40:09+5:30

आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम करीत आहेत. काहीजण काम म्हणून काम करतात, तर काहीजण तेच काम अतिशय कौशल्यपूर्ण करुन आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवितात. यालाच सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी असे म्हणतात.

Become 'Creative'! | ‘क्रिएटिव्ह’ होण्यासाठी !

‘क्रिएटिव्ह’ होण्यासाठी !

Next

-रवींद्र मोरे 
आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम करीत आहेत. काहीजण काम म्हणून काम करतात, तर काहीजण तेच काम अतिशय कौशल्यपूर्ण करुन आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवितात. यालाच सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी असे म्हणतात. आपल्या मनातील संकल्पना कामात वापरुन हातात असलेले काम अधिक चांगल्या प्रकारे कसे पार पाडता येईल याकडे लक्ष दिले तर आपणही क्रिएटिव्ह होऊ शकतो. असे क्रिएटिव्ह काम केले तरच आपल्याला कामाचे समाधान तर मिळतेच शिवाय त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या करिअरवर होतो. आजच्या सदरात आपण आपल्या कामाच्या ठिकाणी क्रिएटिव्ह होण्यासाठी आपल्याजवळ नेमके काय असायला हवे याबाबत जाणून घेऊया...



* एक नोंदवही जवळ असू द्या
आपण कुठेही असाल तर आपल्या जवळ एक नोंदवही जवळ असावीच. परिसरात फिरताना आपण काही निरीक्षण केल्यावर तेथील अनुभव, विचार, कथा आदी नोंदवहीत नोंदवू शकता. फावल्या वेळेत जेव्हाही वेळ मिळेल त्याचे वाचन करुन त्यावर विचारमंथन करु शकता. यातून कदाचित आपणास आपल्या कामात प्रमोट करणारी एखादी आयडिया मिळू शकते. 

* स्वत:भोवती प्रेरणादायी वातावरण निर्माण करा
मनाला नेहमी उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी जेही काही प्रेरणादायी वाटले तर ते संग्रहीत करुन सहज नजर पडेल अशा ठिकाणी किंवा भिंतीवर चिकटवा. त्यात एखाद्या वृत्तपत्रातील कात्रण किंवा आवडलेल्या ठिकाणचा फोटो यांचा समावेश करा. या कात्रणांचे ही कात्रणे भविष्यात कशाप्रकारे उपयोगी ठरतील याची तुम्हाला आताच कल्पना येणार नाही. पण ती उपयोगी ठरतील हे मात्र नक्की. 

* क्रिएटिव्ह गोष्टींसाठी वेळ काढा
व्यायाम करणे किंवा योगासने करणे यासाठी जशी नियमित प्रॅक्टिसची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी वेळ द्यायला हवा. आठवड्यातील काही वेळ क्रिएटिव्ह गोष्टींसाठी राखून ठेवा. ही वेळ फक्त स्वत:साठी असेल. यावेळेत स्वत:ला मोकळे सोडा, मुक्तपणे श्वास घ्या, हाताने काही काम करा किंवा निवांत भटकंती करा. यामुळे आपल्या मेंदूला सकारात्मक एनर्जी मिळेल व आपल्यातील सृजनशीलता वाढण्यास मदत होईल.  
 
* दिनचर्येत बदल करा
रोज एकच काम केल्याने मनावर मरगळ येऊ शकते. याचाच परिणाम आपल्या कामावर होतो. कामाची गुणवत्ता ढासळू शकते. ही मरगळ घालविण्यासाठी रोजच्या कामापेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. काम तेच करा पण थोडी वेगळी पद्धत वापरा. रोज ज्या रस्त्याने जात असाल तर एखाद्या दिवशी तो रस्ता बदला. रोज जे खाता त्यापेक्षा काहीतरी वेगळे खा. रोज तोच व्यायाम करण्यापेक्षा एखाद्या दिवशी व्यायाम म्हणून डान्स करुन पहा. या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या क्रिएटिव्ह मेंदूला तरतरी प्रदान करतील. 

* आपल्या डिक्शनरीतून ‘नाही’ हा शब्द डिलीट करा
या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हा विचार सतत मनात असू द्या. आवाहनांना नेहमी सामोरे जा. 
कधीच कुठल्या गोष्टीला नकार देऊ नका. त्याऐवजी ते काम यशस्वी होण्यासाठी पर्याय काय असू शकतो हे शोधा. प्रत्येक कामात नकारघंटा वाजविण्याऐवजी नवीन आव्हाने स्वीकारा. स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा. त्यामुळे आपली क्रिएटिव्हीटी वाढण्यास नक्कीच मदत होईल

Web Title: Become 'Creative'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.