पदरावरती कुंदन, मोती खड्यांचा ‘साडी ब्रोच’ फॅशनेबल हवा! -साडीला फॅशनेबल करण्याचा एक नवा ट्रेण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:48 PM2017-07-27T14:48:50+5:302017-07-27T14:55:52+5:30
सध्या ‘साडी ब्रोच हा साडीला आणखी डिझायनर लूक देणारा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. हा ब्रोच म्हणजे साडीपिन नाही बरं का ! साडी पल्लू ब्रोच आहे हा!
सारिका पूरकर-गुजराथी
श्रावण सुरु झालाय.निसर्ग हिरवाईनं नटला आहे. सणवार सुरु झाले आहेत. त्यामुळे महिलावर्गात विशेष उत्साह पुढील महिनाभर असणार आहे. कारण त्यांच्या हक्काचा, नटण्या-मुरडण्याचा महिना सुरु झाला आहे ना ! मंगळागौर, श्रावणी शुक्र वार, जिवतीची सवाष्ण अशा अनेक कारणांसाठी महिलांना छान नटून-थटून मिरवता येणार आहे. तर अशा या श्रावणात मंगळागौर, हळदीकुंकू समारंभासाठी छान काठपदर किंवा डिझायनर साडी घालून तुमचा रु बाब, तोरा दाखवायचा असेल तर तीच ती ज्वेलरी किंवा तोच तो लूक टाळा. काय करु मग? असं म्हणताय? डोण्ट वरी. तुमच्या मदतीला आले आहेत साडी ब्रोच. होय, सध्या साडी ब्रोच हा साडीला आणखी डिझायनर लूक देणारा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. हा ब्रोच म्हणजे साडीपिन नाही बरं का ! साडी पल्लू ब्रोच आहे हा!
कसा असतो नेमका हा साडी पल्लू ब्रोच
काठपदर किंवा डिझायनर साडी अशा दोनही प्रकारच्या साड्यांवर हा ब्रोच लावता येतो. काही वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीचा हिरव्या साडीतला एक फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यात तिनं हा ब्रोच घातला होता. त्यानंतर सोनम कपूर हिनं देखील हा ब्रोच साडीवर घातला होता कुंदन आणि खडे , मोती वापरून तयार केलेल्या ब्रोचच्या खूप आकर्षक डिझाईन्स सध्या पाहायला मिळत आहेत. पदर, कमरेचा भाग या ठिकाणी ब्रोचच्या डिझाईनचा भाग येतो. त्याखाली मग मेटलच्या अत्यंत सुंदर, स्टायलिश साखळ्या लावलेल्या असतात. या साखळ्यांमुळे हा ब्रोच साडीला हटके लूक देतो.
ब्रोच कसा वापरायचा?
कंबरपटट्याला जशा साखळ्या असतात तसाच साखळ्या असलेला हा चेन ब्रोच साडीचा पदर पिनअप करतात त्या भागावर लावायचा असतो. समजा डाव्या खांद्यावर पदर पिनअप करत असाल तर तेथे पदरावर तो लावल्यानंतर त्याच्या खालच्या साखळ्यांचा भाग साडीचा पदर घेतो त्याप्रमाणेच उजवीकडे वळवून मागे हूकने अडकविला जातो. या ब्रोचमुळे खांद्यावर सुंदर ब्रोच आणि खाली पदरावर साखळ्यांचा सुंदर पदर म्हणा किंवा एक डिझायनर लेयर तयार होतो. त्यामुळे अगदी शाही लूक मिळतो साडीला. गुजराती पदर घेताना फक्त डाव्याऐवजी उजव्या खांदयावर ब्रोच लावला जातो. हाच ब्रोच आणखी वेगळ्या पद्धतीनं लावायचा असल्यास तो डाव्या खांद्यावर लावल्यानंतर उजवीकडून डावीकडे वळवत पुढे आणायचा आणि पुढे साडीपिन लावतो तेथे एक भाग अडकवायचा. खांद्यावर अडकवल्यानंतर हाच ब्रोच तुम्ही तुमच्या पदरावर न लावता हातावरून घेऊन मागे अडकवला तर आणखी हटके लूक मिळतो. दरवेळेस या ब्रोचच्या साखळ्या लांबच असतात असं नाही तर शॉर्ट ब्रोच देखील वापरता येतो. खांद्याच्या थोडे खालच्या भागावर अडकवून खालचा भाग पदराच्या मध्यभागी ( कमरेच्या वर ) लावल्यासही छान लूक मिळतो.
कुर्तीजसाठीही ब्रोच
ब्रोचचा हा प्रकार केवळ साडीवरच शोभून दिसतो असं नाही तर वनपीस गाऊनवरही तो सुंदर दिसतो. तसेच डिझायनर कुर्तीवर, फेस्टिव्हल पोशाखावर देखील उठून दिसतो. आता तर जीन्स कुर्ती, शिफॉनची प्लेन कुर्ती यावर देखील असेच परंतु थोडे शॉर्ट पॅटर्न तसेच काहीसे बोल्ड लूक देणारे ब्रोच देखील लावण्याचा ट्रेण्ड आहे. कुर्तीजवर लावायचे ब्रोच हे मोठ्या आकारातील डिझाईन्सचे तसेच त्यासोबत असणार्या या साखळ्याही थोड्या जाड असतात यामुळेच कुर्तीजचा लूक हटके दिसतो.