शोधायला गेले कॅन्सरवरचा उपाय, पण हाती आला एचआयव्हीवरचा रामबाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:03 PM2017-07-24T16:03:33+5:302017-07-24T19:20:04+5:30
कॅन्सर आणि एचआयव्ही रुग्णांसाठी खुशखबर!
- मयूर पठाडे
आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्षमताच अशा असतात, की त्या सहजासहजी कोणत्याही आजाराला आपल्या शरीरात प्रवेश करू देत नाहीत, त्यांना रोखण्याचा नैसर्गिक प्रयत्न त्या करीत असतात, पण जेव्हा ही क्षमता कमी पडते, तेव्हा मात्र हे आजार आपल्यावर स्वारी करतात आणि आपण आजारी पडतो. कॅन्सर, एचआयव्हीसारख्या आजारांसाठी तर हे फारच सत्य आहे. तुमची नैसर्गिक प्रतिकारशक्ती या आजारांपासून तुमचा बचाव करण्यासाठी पूर्णत: अपयशी ठरतात.
हे आजार आपली रोगप्रतिकारशक्तीच नष्ट करून टाकतात किंवा त्यांच्यासमोर शरीराची ही शक्ती टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे त्यसााठी मग वेगवेगळ्या थेरपींचा उपचार त्या रोग्यावर करावा लागतो.
कॅन्सरसारख्या आजारासाठी आता इम्युनोथेरपी या नव्या उपचारपद्धतीचा वापर केला जातो. बायॉलॉजिक थेरपी असंही त्याला म्हटलं जातं. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढावी कॅन्सरच्या आजाराला अटकाव बसावा यासाठी ही उपचारपद्धती आता मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
या नव्या पद्धतीचे मोठे सकारात्मक परिणामही आता दिसू लागले आहेत. कॅन्सरच्या पेशंटसाठी तर जी जणू वरदानच ठरते आहे.
या पद्धतीमुळे अगदी कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांनाही वाचवणं शक्य झालं आहे, पण आश्चर्याची बाब म्हणजे याच उपचारपद्धतीचा उपयोग करून एचव्हीलाही समर्थपणे अटकाव करता येऊ शकतं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अर्थात त्यासंदर्भात अधिक संशोधन अजून सुरू आहे.
कॅन्सरवर अधिक शक्तिशाली उपचारपद्धती शोधत असताना एचआयव्हीवर मात करण्याची एक प्रभावशाली पद्धती हाती लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संशोधक खूपच आनंदी आणि उत्साही झाले आहेत.
कॅन्सर आणि एचआयव्हीसंदर्भात आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत मुळातच फरक आहे.
आपल्या शरीरात कॅन्सरची शक्यता निर्माण झाल्याचं आपली रोगप्रतिकारशक्ती ओळखते, पण या आजाराला स्वत:हून रोखण्याइतकी शक्ती तिच्यात नसते. एचआयव्हीच्या बाबतीत मात्र सर्वात मोठा धोका म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकाराच्या सिस्टिमला मुळात एचआयव्हीचा धोकाच ओळखणे कठीण जाते. सुप्तावस्थेत असलेल्या या एचआयव्ही पेशींना मुळात ओळखणेच कठीण जात असल्यामुळे त्यावरचा प्रतिकारही मग लटकाच पडतो.
काहीही असो, ही नवी उपचारपद्धती जर एचआयव्ही पेशंट्सवरही जर रामबाण उपाय ठरली तर जगापुढचा आणि भारतापुढचाही एक मोठा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.