कॉलरचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:44 PM2017-12-05T17:44:35+5:302017-12-05T18:00:21+5:30

कॉलरचे फक्त पाच -दहा प्रकार नाहीत.50 पेक्षाही अधिक प्रकार आहेत कॉलरचे. त्यातले कितीतरी प्रकार आपले वापरूनही झालेले असतात. पण त्याला काय म्हणतात हे माहिती असेलच असं नाही.

Collar world rich with lots of variety | कॉलरचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का?

कॉलरचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहे का?

ठळक मुद्दे* स्टॅण्ड कॉलरच्या कुर्तीज महिलांमध्ये विशेष आवडीनं परिधान केल्या जातात.* मॅण्डेरीन कॉलर या जॅकेट्स आणि शर्टमध्ये वापरल्या जातात. याच कॉलर्सला चायनीज किंवा नेहेरू कॉलर अशीही प्रचलित नावं आहेत.* बटरफ्लाय कॉलर ही नावाप्रमाणेच फुलपाखरांच्या पंखांचा आकार असलेली ही कॉलर. कधीकधी ही कॉलर अगदी कमरेपर्यंत लांबही असते.

 

- मोहिनी घारपुरे-देशमुख


कॉलरच्या इतिहासात डोकावून पाहिलं की अफाट रंजक माहिती हाताशी लागते. आपल्या पोषाखाची मान ताठ करणा-या कॉलरचे तब्बल 50 पेक्षाही अधिक प्रकार आहेत हे विशेष.त्यातले किमान 5 ते 10 प्रकार प्रत्येकाला नक्कीच माहीत असतील. किंवा त्यापैकी कित्येक प्रकारच्या कॉलर्सचे ड्रेसेस आजवर नक्कीच वापरून झाले असतील. पण तरीही त्या कॉलरला काय म्हणतात हे मात्र माहित असेलच असं नाही.

कॉलरचे मूलभूत प्रकार म्हणजे -
1. स्टॅण्ड कॉलर
2. टर्नओव्हर कॉलर
3. फ्लॅट किंवा फॉलींग कॉलर
खरंतर हे सगळेच प्रकार प्रचलित आहेत. विशेषत: स्टॅण्ड कॉलरच्या कुर्तीज महिला विशेष आवडीनं परिधान करतात . मात्र असं असलं तरीही, बाकी सर्व प्रकारही तितकेच आवडीने अनेकजणी शिवून घेतात. आपल्याकडे किमान एखादा तरी कॉलरवाला ड्रेस असावा असं बहुतांश महिलांना वाटतंच.

 



1. स्टॅण्ड कॉलर

मानेभोवती शब्दश: ताठ मानेनं उभी रहाते ती ही स्टॅण्ड कॉलर. या कॉलरमध्ये कडकपणा येण्यासाठी कॅन्व्हास वापरला जातो किंवा स्टार्च केलेल्या कापडाचाही वापर होतो. स्टॅण्ड कॉलरच्या कुर्ती आॅफीसला घालून जाणा-याही कित्येकजणी आहेत. या कुर्तीजच्या स्टॅण्ड कॉलरमुळेच एकदम फॉर्मल लुक कॅरी होतो.

2. टर्नओव्हर कॉलर
संपूर्ण गळ्याभोवती ही कॉलर वेढलेली असते. पण असं असूनही ती खांद्यावर विसावत नाही, तर त्याऐवजी ती स्टॅण्ड कॉलरप्रमाणे गळ्याभोवती ताठ उभी असते.

3. फ्लॅट किंवा फॉलींग कॉलर
याप्रकारच्या कॉलर्समध्येही चिक्कार उपप्रकार आहेत. खांद्यापर्यंत लांब असलेल्या या कॉलर्स अनेकदा खूप भाव खाऊन जातात. या कॉलर्समुळे पोषाखाला सौंदर्यही प्राप्त होतं.
फॅशनच्या दुनियेत कॉलरच्या ड्रेसेसची एक खास जागा आहे. विशेषत: फॉर्मल लुक जिथे अपेक्षित आहे तिथे  कॉलर्सचा हमखास वापर फॅशन डिझायनर्स करतात. डिझायनर कॉलर्समध्ये तर चिक्कार प्रकार आहेत.

 



डिझायनर कॉलर्स

1. शॉल कॉलर - विशेषत: स्वेटर्स, जॅकेट्स यांच्या कॉलर्स अशा प्रकारच्या असतात. या कॉलरमुळे पेहेरावाला एक सभ्य लुक मिळतो.
2. पीटर पॅन कॉलर - साधारणत: 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात या प्रकारच्या कॉलर्स एकदम बूममध्ये होत्या. फ्लॅट कॉलरमधील हा उपप्रकार अत्यंत सुंदर दिसतो. आजही अनेक मुलींच्या फ्रॉकला या पीटरपॅन कॉलर जोडलेल्या असतात.
3. मॅण्डेरीन कॉलर - विशेषत: जॅकेट्स आणि शर्टच्या कॉलर्स अशा प्रकारच्या असतात. याच कॉलर्सला चायनीज किंवा नेहेरू कॉलर अशीही प्रचलित नावं आहेत. पुरूषांच्या कुर्तीजलाही या प्रकारची कॉलर फारच शोभून दिसते.

 

4. केप कॉलर - आकारानं काहीशा मोठ्या, छातीपर्यंत लांब आणि खांद्याला पूर्णत: झाकणा-या अशा या केप कॉलर्स. महिलांच्या टॉप्सला, ब्लाऊजेसला फॉर्मल लुक हवा असेल तर या कॉलरचा हमखास विचार केला जातो.

5. बटरफ्लाय कॉलर - नावाप्रमाणेच फुलपाखरांच्या पंखांचा आकार असलेली ही कॉलर. कधीकधी ही कॉलर अगदी कमरेपर्यंत लांबही असते. काही पोषाखांवर एवढी मोठी कॉलरही शोभून दिसते. मात्र, बहुतेककरून ही कॉलर छातीपर्यंत शिवण्याचा कल अधिक असतो.

 

 

6. बर्म्युडा कॉलर - काहीशी रूंद असलेली ही कॉलर शेवटाकडे जाता जाता चौकोनी होत जाते. या प्रकारची कॉलर महिलांच्या पेहेरावात बहुतेककरून वापरली जाते.
7. पिलग्रीम कॉलर - घुमटाकार अशी ही कॉलर खांद्यांवर रूळते आणि पुढील बाजूनं छातीपर्यंत खालीही जाते. हा देखील प्रकार खूपच शोभून दिसतो.
8. सेलर कॉलर - समोरून डीप व्ही आणि मागून चौकोनी आकार असलेल्या या कॉलर्स. आपण अनेकदा व्ही नेकचे स्वेटर्स घेतो, त्याला अशा कॉलर जोडलेल्या असतात. पारंपरिक सेलर्सच्या पोषाखावरील कॉलर जशी असते तशीच ही कॉलर असते.
9. टर्टलनेक कॉलर - बंद गळ्याचे स्वेटर्स अनेकदा या प्रकारच्या कॉलर्सनेही सुशोभित केलेले असतात. टर्नओव्हर कॉलर प्रकारातीलच हा उपप्रकार आहे.
10. बर्था कॉलर - राणी व्हिक्टोरीयाच्या काळापासूनच या प्रकारच्या कॉलर्स फार प्रचलित आहेत. गोलाकार आणि फ्लॅट अशी ही कॉलर खांद्यांच्या रूंदीपर्यंत लांब जाते तर खाली छातीच्या काहीशी वरपर्यंत विसावते. अनेकदा या कॉलरसाठी लेस आणि तलम कापडाचाही वापर केला जातो. जुन्या काळातील इंग्रजी चित्रपटांमध्ये या प्रकारच्या कॉलर्सचे पेहेराव केलेल्या नटनट्या दिसतील. हा प्रकार आता पुन्हा नव्यानं प्रचिलत होतो आहे.
अर्थात एवढे सांगूनही कॉलरचे प्रकार इथेच संपत नाही. आणखीही आहे त्याविषयी पुढील लेखात.

 

 

 

Web Title: Collar world rich with lots of variety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.