तुम्हाला पावसाळ्याची अॅलर्जी आहे का?-हे वाचा
By admin | Published: July 1, 2017 04:51 PM2017-07-01T16:51:31+5:302017-07-01T16:54:47+5:30
पावसाळ्यात अनेकांना अॅलर्जी छळतात, तेव्हा काही पत्थ्यं पाळा.
-निशांत महाजन
पाऊस खरंतर किती हवाहवासा. अत्यंत तजेला देणारा. मस्त पावसात भटकंतीची मौज देणारा ऋतू. पण आपल्याकडची अस्वच्छता, बिघडलेलं पर्यावरण, साथीचे आजार, साचणारं पाणी, वाढलेले डास यासाऱ्यांमुळे अनेकांना पावसाळी अॅलर्जी छळतात. आणि मग त्यांना नको तो पावसाळा असा जीवघेणा त्रास होतो. पावसाळी अॅलर्जीचं प्रमाण आपल्याकडे बरंच मोठं आहे. त्यात अॅलर्जी नक्की कशापासून येते हे आपण चटकन शोधू शकत नाही. त्यामुळे हा त्रास सहन करतच रहावा लागतो. त्यावर उपाय हा की, आपणच काही गोष्टी पावसाळ्यात नियमित कराव्यात.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात कुठले त्रास होतात याची नोंद ठेवणं. डोळे येणं, अंगावर पुरळ, ड्राय स्किन, सर्दी, कफ, सतत जुलाब किंवा पोट साफ न होणं, अंगावर पित्त उभारणं, हातापायांची सालं निघणं असे अनेक त्रास नियमित संभवतात. आपल्याला यापैकी कुठला त्रास नियमित होतो याकडे लक्ष ठेवून योग्य डॉक्टरचा सल्ला आणि नियमित औषधोपचार करणं इष्ट.
मात्र उत्तम सवयी आणि काळजी म्हणून आपण घरच्याघरी काही गोष्टी करु शकतो.
१) पावसाळ्यात नेहमी गरम अन्न खावं. शिळं, थंड, फ्रोजन, पुन्हा पुन्हा तळलेलं अन्न खावू नये.
२) पचायला हलका आहार घ्यावा.
३) बाहेरचं शक्यतो अजिबात खावू नये. तेलकट, अतीमसालेदार, मासांहार टाळणंच उत्तम.
४) पाणी नियमित आणि कोमट करुनच प्यावं. गार पाणी पिऊ नये.
५) अस्थमा असेल, दम्याचा त्रास असेल, खोकला, सर्दी, पायदुखी, हातापायांत पेटके येणं, मुंग्या येणं, हातपाय वाकडे होणं, सांधेदुखी यासाऱ्यांची नियमित औषधं घ्या. डोस चुकवू नका.
६) स्वच्छता ही फार सामान्य गोष्ट आहे.पण ती पाळली जात नाही. काहीजण स्वच्छ हातपायही धुवूत नाहीत. त्यामुळे स्वच्छता पाळा. आपलं घर, अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा.