ओढणीच्या ओढीचा इतिहास माहिती आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:18 PM2018-02-01T18:18:54+5:302018-02-01T18:30:51+5:30
वेगवेगळ्या धर्माच्या संकल्पनेप्रमाणे, त्या त्या धर्मातील स्त्रिया ओढणीचा वापर करताना दिसतात. मात्र, धर्म बाजूला ठेवला तरीही इतिहासात ओढणीला मान होता पुढे ओढणीनं फॅशनच्या जगातही आपलं साम्राज्यं निर्माण केलं.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
कधी प्रेमाची साक्ष देणारी, तर कधी प्रियकरापासून आपला चेहरा लाजून लपवणारी, कधी चंद्रतारका झोळीत घेणारी तर कधी डोळ्यातलं पाणी टिपण्यासाठी धाव घेणारी ओढणी म्हणजे स्त्रीची सखीच. पण ही ओढणी आपल्या पोषाख परंपरेत नेमकी कधी शिरली असावी याचे काही स्पष्ट अनुमान आपल्याजवळ आजही नाही हे विशेष. वेगवेगळ्या धर्माच्या संकल्पनेप्रमाणे, त्या त्या धर्मातील स्त्रिया ओढणीचा वापर करताना दिसतात. मात्र, धर्म बाजूला ठेवला तरीही फॅशनच्या जगतातही ओढणीचा मान अगदी काही वर्षांपर्यंत कायम होता आणि पुढेही राहील
मानवी इतिहासात डोकावलं तर दिसतं की अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्याचे जेव्हा माणसाला लक्षात आलं तेव्हापासून मानवाची उत्क्रांती सुरू झाली. तोवर मानवाच्या जीवनात वस्त्रांना फारसं महत्त्व नव्हतंच. असे असलं तरीही अंगभर कपडे घालूनही मानवाला स्वसंरक्षणार्थ अजूनही कापड अंगावर असावं असं कधीतरी वाटू लागलं आणि त्याने आज आपण ज्याला ओढणी म्हणतो त्यासदृश मोठं कापड अंगावर ओढून वावरायला सुरूवात केल्याचे संदर्भ इतिहासात सापडतात.
अगदी सिंधू संस्कृतीतील स्त्री-पुरूष आपल्या अंगावर अधिवास नामक कापड घेऊन वावरायचे. या अधिवासाचेच पुढे ओढणीत रूपांतर झाले आणि ती केवळ स्त्रियांपुरतीच मर्यादित झाली. दुपट्टा असा हिंदीतील प्रचलित शब्द दोहोबाजूंनी अंगावर घ्यायचं वस्त्र हाच अर्थ प्रतीत करतो.
ही ओढणी नेमकी कधी आपल्या पोषाख परंपरेत शिरली त्याची फारशी माहिती आपल्याला सापडत नाही. परंतु, अदब, नझाकत, संस्कार, शालीनता या सगळ्यांचं प्रतीक म्हणून ओढणीला मान मिळतो. ओढणी घेण्यानं अथवा न घेण्यानं स्त्रीचं शालीनत्व, घरंदाजपणा न बोलताच कळत असे एवढं महत्त्व काही वर्षांपूर्वीपर्यंत या ओढणीला होते.
सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या प्रिस्ट किंग याच्या मूर्तीच्या डाव्या खांद्यावरही ओढणीवजा, चादरीसमान एक कापड असल्याचं दिसतं. यावरूनच तत्कालिन पुरूषांच्याही पोषाखात, चादरीवजा एक कपडा अंगावरून घेण्याची पद्धत असावी असं स्पष्ट होतं. त्यानंतर वैदिक काळातही स्त्रियाआणि पुरूष आपल्या पोषाखात उत्तरीय वापरत असल्याचे संदर्भ सापडतात. हे सगळे संदर्भ, म्हणजे आपल्या पोषाखात ओढणीचं असलेलं ऐतिहासिक स्थानच स्पष्ट करतात.
मलमलका दुपट्टा असो वा रेशमी असो, लाल दुपट्टा असो किंवा मोतीयोंसे जडा हुवा दुपट्टा असो, पोषाखाला ग्रेस देण्याचं अर्धअधिक श्रेय ओढणीलाच जातं.
ओढणी ओढायच्या स्टाइल्स कितीही बदलल्या तरीही ओढणी वापरण्याची स्टाइल मात्र काळाबरोबर अविरत पुढे सुरू राहील हेच खरं.
छातीचा भाग झाकण्यासाठी वापरण्यात येणारी ओढणी कधी खांद्यावरून मागे तर कधी खांद्यावरून पुढे झोके घेते, कधी गळ्यात पडून अगदी मैत्रिणीसारखी आपल्या अवती भोवती लहरते तर कधी एकाच खांद्यावरून अंगभर विसावते, पण त्यामुळेच तर तिचं सौंदर्य तिच्यासह आपल्यालाही खुलवतं.
तर अशी ही ओढणी .. वयात येता येता आपल्याबरोबर कधी वावरायला लागते आणि कधी आपली सोबतीण होऊन जाते याचा पत्ताही लागत नाही. इतिहाससुध्दा हेच सांगतो.