मुलींशी मैत्री करायचीय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 05:44 PM2016-12-01T17:44:01+5:302016-12-04T16:25:38+5:30
‘मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी एकदाच बरसून थांबणारी, मैत्री असावी रिमझिम सरी सारखी मनाला सुखद गारवा देणारी...!’
‘मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी
एकदाच बरसून थांबणारी,
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी
मनाला सुखद गारवा देणारी...!’
अशा मैत्रीची प्रत्येकाला अपेक्षा असते, आणि त्यासाठी हवी असते ती मैत्रीण. मनातले सर्वकाही जाणून घेणारी, सुख-दु:खाची जाणीव ठेवणारी... अशी मैत्रीण आपल्यालाही असावी असे बऱ्याच मुलांना वाटणे साहजिकच आहे. मात्र, बऱ्याच मुलांसमारे एकच प्रश्न असतो, तो म्हणजे मुलींशी संवादास सुरुवात कशी करावी? हीच भीती अनेक मुलांमध्ये पाहायला मिळते. मुलीशी संवादास कशी सुरुवात कशी करावी, हा विचार त्यांच्या मनात घोळत असतो. आजच्या सदरात आपण मुलींशी उत्तम संवाद कौशल्य कसे साध्य करायचे याबाबत जाणून घेऊया...
* एखाद्या कामाच्या किंवा प्रश्नाच्या बहाण्याने संवाद साधावा-
ज्या मुलीशी आपल्याला मैत्री करायची आहे, तिला स्मितहास्य करुन हाय-हॅलो म्हणावे. त्यानंतर स्वत:चे नाव सांगत तिचेही नाव विचारावे. जर यावेळीही आपणास अवघडल्यासारखे वाटत असेल तर एखादे काम अथवा प्रश्नाने संवादाला सुरूवात करावी. शिवाय एखाद्या कॉमन फ्रेंडच्या बाबतीत विषय काढूनही बोलण्यास सुरूवात करु शकता. कॉमन फ्रेण्ड नसेल आणि थोडी ओळख असल्यास आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी अथवा परिसरातील मोहक वातावरणाबाबतचा विषय काढून संवादास सुरूवात करावी.
* चांगल्या गुणांचे कौतुक करा-
एखाद्या मुलीच्या चांगल्या गुणांचे कौतुक केल्यास त्या मुलीसोबत तुमचा संवाद वाढण्यास मदत होते. मात्र, खोटे कौतुक वा स्तुती अजिबात करु नका. तिचा कॉलेज मधला चांगला परफॉर्मन्स, तिची काम करण्याची पद्धत, तिने गाठलेले एखादे अॅचिव्हमेंट, तिचे वागणे आदी गोष्टी लक्षात घेऊन तिचे कौतुक करु शकता. याशिवाय तिने वापरलेला परफ्यूम अथवा तिच्या हेअर स्टाईलचे कौतुक करू शकता. परंतु हे करताना त्या अनोळखी मुलीसोबत चुकूनसुद्धा असे वागू नका.
* तिच्या छंदाबाबत बोला-
बऱ्याच मुलींना वेगवेगळे छंद जोपासण्याची सवय असते. ओळखीची मुलगी असेल तर तिचे छंद काय आहेत याबाबत जाणून घ्या व त्याबाबत बोलून संवादास सुरुवात करा. एखादवेळेस तिला जे छंद असतील तेच तुमचेही छंद असू शकतील, जसे पुस्तकांचे कलेक्शन, परफ्यूम अथवा बॉडी स्प्रे इत्यादी कॉमन आवडी. यावरूनही तुम्ही संवादाची सुरुवात करू शकता.
मैत्री नसावी अशी...
बऱ्याचदा मुलींशी मैत्री तर होते, मात्र त्यानंतर त्या मैत्रीत फक्त दिसतो तो स्वार्थ. स्वत:च्या कामाच्या वेळेस आपले म्हटलं जातं, आणि ज्यावेळेस ती संकंटात असते तेव्हा मात्र पळ काढला जातो. काही वेळेस तर मैत्रीसाठी तिची श्रीमंती आणि तिचे सौंदर्यच पाहिले जाते. मात्र खरी मैत्री तशी नसून मैत्रीत असतो तो फक्त आदर, सन्मान, जिव्हाळा आणि सुख-दु:खाच्या क्षणी तिच्या मनाला जपणारी भावना, जीवनाला खरा अर्थ समजावणारी असावी ती मैत्री.