बाप्पाच्या स्वागताला इको फ्रेंडली सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:59 AM2017-08-19T02:59:12+5:302017-08-19T02:59:35+5:30

प्रत्येकाचा लाडका गणपती बाप्पा हा वेगळा असतो, तशीच प्रत्येकाची त्याच्याप्रति असलेली श्रद्धा वेगळी असते

Eco-friendly decoration of Bappa's welcome | बाप्पाच्या स्वागताला इको फ्रेंडली सजावट

बाप्पाच्या स्वागताला इको फ्रेंडली सजावट

googlenewsNext

-रवी सपकाळे
प्रत्येकाचा लाडका गणपती बाप्पा हा वेगळा असतो, तशीच प्रत्येकाची त्याच्याप्रति असलेली श्रद्धा वेगळी असते, त्याचप्रमाणे प्रत्येकाची सजावट देखील वेगळी असते किंबहुना प्रत्येकाची ही वेगळी असलेली धारणाच बाप्पाबद्दल असलेली त्याची श्रद्धा व्यक्त करीत असते आणि म्हणूनच आपल्या घरात येणा-या बाप्पाचे आगमन हा सर्वांचा कौतुकाचा नि आवडीचा विषय असतो.
गणपती बाप्पा म्हणजे लहान थोरांकरिता उत्सवाची एक पर्वणीच. उत्सवकाळात बाप्पाची मूर्ती, सजावट, आरती, प्रसाद आणि बाप्पासोबत आपल्या सर्वांचे आवडते मोदक सर्वांची पुरेपूर रेलचेल असते. मित्रमंडळीची आणि नातलगांची बाप्पाच्या निमित्ताने होणारी गाठीभेटी (याबद्दल कोकणामधील लोकांना विचारून पाहा) तर या अशा उत्साही आणि सकारात्मक वातावरणात दिवसाची सुरूवात कधी होते आणि रात्र कधी होते कळतच नाही. घरातील महिलावर्ग तर सकाळपासूनच नैवेद्य, आरती, पूजा आणि बाप्पाचे आणि सर्वांच्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यात मग्न असतात.
लाडक्या गणरायासाठी दरवर्षी जागा सजविण्याकरिता नवनवीन क्लृप्त्या वापरण्यात येतात, सर्वांमध्ये आपल्याच बाप्पाची सजावट कशी भारी आहे अशी जणू चढाओढच लागते. घराला आनंददायी आणि सुंदर बनविण्यासाठी आपण छानशी सजावट करतो तर कधी वेळेच्या समस्येमुळे नाइलाजास्तव बाजारात उपलब्ध असलेले तयार सजावट साहित्य वापरतो. परंतु योग्य मार्गदर्शन आणि योग्य विचार आणि सर्वांनी एकत्र घेऊन घर सजविण्यात एक वेगळीच मजा आहे. (आणि सजावटीकरिता चायना माल नकोच नको) सर्वांत आधी सजावटीकरिता एखादी संकल्पना ठरवावी लागते, एखादा विषय घेवून त्याअनुषंगाने सुरूवात करावी लागते. घरगुती गणपतीसाठी प्रामुख्याने रिबिन्स्, गिल्टर, मखर फ्रेम्स्, वॉलपेपर्स, फुले (असली/नकली), विविधांगी रंगीत प्रकाशयोजना मालिका, रंंगीत जाळी, थर्माकोलची शीट आणि खांबे, हार, गजरे आदी बाबींची आवश्यकता लागते.
सध्या पर्यावरणाला पूरक अशी मूर्ती आणि सजावट याकडे लोकांचा कल जात आहे आणि हे एकाअर्थी चांगले आहे कारण, सण साजरे करून प्रदूषणात भर टाकणे वाईटच. सृजनतेची आद्य देवता असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काही इको-फ्रेंडली आणि घरगुती सजावट देत आहोत पाहा कदाचित काही तुमच्या कामी देखील येतील.
>बाटल्यांची सजावट
प्लास्टिक/काचेच्या वापरलेल्या बाटल्यांना सामान्यत: कचºयात टाकण्यात येते, अशा बाटल्यांचा कल्पकतेने वापर करून सजावटीसाठी पार्श्वभूमी तयार करता येईल. प्रयत्न केल्यास काचेच्या बाटल्या किंवा ग्लास चिकटवून मखर देखील बनविता येईल आणि यात योग्य रोषणाई केल्यास अधिक सुंदर दिसेल.
घरातील हिरवळ
तुमच्या घरातील झाडे यांचादेखील बाप्पाच्या सजावटीकरिता उपयोग करता येईल, यामुळे तुम्हाला ताजेपणा आणि हिरवळ याची सुंदर सांगड घातला येईल. बाबंूची झाडे आणि इतर शोभिवंत वनस्पती वापर करू शकतो, अशा इको-फे्रं डली सजावटीमुळे तुम्ही नक्कीच कौतुकाला पात्र व्हाल.
टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर
वरील वस्तूंशिवाय आपण आपल्या घरातील टाकावू वस्तूंचा देखील सजावटीसाठी उपयोग करू शकतो. वापरात नसलेल्या सीडीज् किंवा प्लास्टिकच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक कचरा याचा सृजनात्मक वापर करून नवीन काहीतरी आकर्षक अशी सजावट निर्माण करता येईल ज्याने निश्चितपणे उत्सवाचा मूड सेट होण्यास मदत होईल.
>कागदाची सजावट
कागदाचा उपयोग करून सजावट करता येईल, रंगीबेरंगी कागदाची छत्री, फुले, चांदण्या, तोरण तयार करून सजविता येईल आणि त्यात लहानग्यांना सोबत घेतल्याने त्यांनाही सजावटीचा आनंद घेता येईल आणि त्यांच्याही कल्पकतेत भर पडेल. वृत्तपत्र आणि मासिकांचा देखील उपयोग करून लोकांना आश्चर्यचकित करणारी सजावट करता येईल.
>फुलांची सजावट
दीड दिवसाच्या गणपतीकरिता ताज्या फुलांची सजावट उत्तम असेल, फुलांची आकर्षक रंगसंगती करून त्यांचा पाळणा किंवा सिंहासन बनविता येईल किंवा फुलांचा मखर तयार करता येईल.
>नारळाची सजावट
नारळाच्या करवटींचा उपयोग करून सजावट तयार करता येईल. नारळाची करवंटी फेकून न देता त्याला कल्पकतेने चिकटवून विविध रंगाने रंगवून विविध आकार देवून त्याचा उपयोग सजावटीकरिता करता येईल शिवाय, ही पर्यावणास अनुकूल अशी सजावट असेल.
>कापडी सजावट :
सजावटीकरिता गडद रंगाच्या कपड्यांचा उपयोग करता येईल, तसेच साड्यांचा आणि दुपट्ट्यांचा देखील पार्श्वभूमी निर्मितीकरिता वापर करता येईल.

 

Web Title: Eco-friendly decoration of Bappa's welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.