पाचपैकी चार पुरुषांना चिंता : ‘मी कसा दिसतो?’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:24 AM2022-11-17T10:24:27+5:302022-11-17T10:25:44+5:30
आपण सुंदर दिसतो की नाही? आपल्या शरीराचे सर्व आकार-उकार व्यवस्थित आहेत की नाहीत? आपण आता जाड दिसायला लागलोत का? आपलं वजन वाढलंय का? आपण आता बेढब तर दिसणार नाही?.. हे आणि असे अनेक प्रश्न महिला, तरुणींना नेहमी सतावत असतात.
आपण सुंदर दिसतो की नाही? आपल्या शरीराचे सर्व आकार-उकार व्यवस्थित आहेत की नाहीत? आपण आता जाड दिसायला लागलोत का? आपलं वजन वाढलंय का? आपण आता बेढब तर दिसणार नाही?.. हे आणि असे अनेक प्रश्न महिला, तरुणींना नेहमी सतावत असतात. त्यामुळे आपल्या शरीराबाबत, चेहऱ्याबाबत त्या फारच जागरूक असतात. त्याविषयी सातत्यानं बोलत, चर्चा करीत असतात आणि आपल्या सौंदर्याच्या कल्पनेमध्ये फिट बसण्यासाठी सातत्यानं प्रयत्नही करीत असतात.
अगदी रस्त्यानं जाताना दुसरी एखादी महिला दिसली, तरी या महिला लगेच स्वत:शी त्या महिलेची तुलना करून पाहतात. पण, महिलाच फक्त आपल्या शरीर आणि सौंदर्याची अतीव काळजी करीत असतात का? - तर तसं नक्कीच नाहीए. पुरुषही आपल्या सौंदर्य आणि ‘पुरुषी’ मापदंडात करकचून आवळलेले आहेत आणि त्यांनाही आपल्या शरीराची, दिसण्याची तितकीच काळजी वाटत असते. खरंतर, पुरुष आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयी महिलांपेक्षा अधिक चिंतित असतात हे आता अभ्यासातून सिद्ध झालं आहे. आपलं सौंदर्य आणि शरीराविषयी महिला सतत बोलत असतात, पुरुष आपलं हे शल्य बोलून दाखवत नाहीत, इतकाच काय तो फरक. पण, पुरुषांना आपल्या दिसण्याविषयी अधिक वैगुण्य वाटत असतं आणि त्यामुळे ते मनातून अक्षरश: झुरत असतात.
यासंदर्भात काही वर्षांपूर्वी एक तपशीलवार सर्वेक्षण करण्यात आलं होतं. हे संशोधन सांगतं, आपण आता अजागळ दिसतोय, आपलं पोट वाढलंय, केस पांढरे झालेत, डोक्याला टक्कल पडलंय, शरीर मलूल पडलंय, आपण मॅनली दिसत नाही, आपली छाती लोंबकळतेय.. याबद्दल पुरुष आतून मनाला अतिशय खात असतात, आपलं हे ‘असं’ काय झालंय, याबद्दल त्यांना स्वत:विषयीच कमीपणा वाटत असतो, आपलंही शरीर आणि व्यक्तिमत्त्व मर्दानी असावं ही खंत त्यांना पोखरत असते.
आपल्या शरीराची ही चिंता पुरुषांना किती सतावत असावी? पाचपैकी तब्बल चार पुरुषांच्या (८०.७ टक्के) डोक्यात कायम हाच विचार घोळत असतो. महिलांमध्ये मात्र हे प्रमाण तुलनेनं बरंच कमी म्हणजे ७५ टक्के आहे. शरीरप्रकृती जर उत्तम होणार असेल, तर त्यासाठी आपल्या आयुष्यातलं एखादं वर्ष द्यायला ३८ टक्के पुरुषांची तयारी असते. हे प्रमाणही महिलांपेक्षा बरंच जास्त आहे.
या सर्वेक्षणापूर्वी असं मानलं जात होतं की, महिला आणि तरुण मुलींनाच आपल्या शरीर-सौंदर्याची चिंता भेडसावत असते, पुरुष मात्र तुलनेनं ‘कूल’ असतात. पण, या सर्वेक्षणानं हा समज पूर्णत: खोडून काढला. वेस्ट ऑफ इंग्लंड युनिव्हर्सिटीच्या संशोधिका डाॅ. फिलिपा डिडरिश्च यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश पुरुषांवर केलेल्या या संशोधनातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण जगभरातले पुरुष आपल्या दिसण्याविषयी अतीव चिंतित असतात, यावर शिक्कामोर्तब झालं होतं. सर्वेक्षणात लक्षात आलं की, आपलं वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर अधिक बलदंड दिसण्यासाठी अनेक पुरुष वाट्टेल ते करण्यास तयार असतात. काही जण आपल्या आहारावर नियंत्रण आणतात, अतिशय कमी खातात, काही जण वजन कमी करण्यासाठी चक्क रेचकांचा वापर करून, जुलाब घडवून आणून आपलं वजन घटवतात. ८१ टक्के पुरुष आपलं वजन, केस, बॉडी स्ट्रक्चर यामुळे चिंतित असतात. तीस टक्के पुरुषांना आपल्या पोटाची लाज वाटते. १९ टक्के पुरुषांना आपल्या छातीविषयी कमीपणा वाटतो. ६३ टक्के पुरुषांना आपल्या छातीचे आणि हातांचे स्नायू बळकट नसल्याचं वैगुण्य वाटतं. ज्या पुरुषांची यासंदर्भात चाचणी घेण्यात आली, त्यातील १८ टक्के पुरुष याच कारणांमुळे उच्च प्रोटिनयुक्त आहार घेत होते, १६ टक्के पुरुष बारीक होण्यासाठी कॅलरी-नियंत्रित आहार घेत होते. काही जण स्टेरॉईड्स घेत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्बल ३० टक्के लोक दिवसातून किमान पाच वेळा आपल्या ‘दिसण्याचा’च विचार करीत होते.
‘मॅनली’ नसल्यानं आजारी पडतात पुरुष
आपल्या शारीरिक वैगुण्यांविषयी महिलांपेक्षा पुरुषांना जास्त कमीपणा वाटतो, यावर नुकत्याच झालेल्या नव्या संशोधनानंही शिक्कामोर्तब केलं आहे. ५४ टक्के पुरुष तर ४९ टक्के महिला ‘बॉडी डिसफॉर्मिक डिसऑर्डर’नं ग्रस्त आहेत, असं संशोधकांचं म्हणणं आहे. चांगली उंची, कसलेलं शरीर, कमी वजन, बलदंड मसल्स.. यासाठी पुरुष अक्षरश: आसुसलेले असतात. आपण फिट असावं यासाठीचा हा दबाव त्यांच्या शरीर-मनावर विपरीत परिणाम घडवून आणतो. मात्र, आपल्याला असल्या काही समस्येनं ग्रासलेलं आहे, हे त्यांच्या गावीही नसतं, हा त्यातला आणखी एक विरोधाभास!