खिसेवाला ड्रेस म्हणे रूबाब वाढवतो. कंगना, अनुष्का, दीपिका यांच्याकडे बघून खरंच वाटतं हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:41 PM2017-08-17T18:41:17+5:302017-08-17T18:49:47+5:30
कुर्ती, स्कर्ट, पंजाबी ड्रेसेसच्या सलवारींना खिसे जोडण्याची फॅशन नवी नाही. आपल्या कपड्यांमध्ये एखादा तरी खिसेवाला ड्रेस असावा अशी इच्छा अनेकींची असते. त्यामध्येही बरेचदा पॉकेटवाले डेनिम ड्रेसेस वगैरे घेऊन अनेकजणी ही इच्छा पूर्ण करतात.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
जीन्स वगैरे सारख्या पुरूषी कपड्यांना खिसे असतातच पण खास स्त्रियांचे म्हणून ओळखल्या जाणार्या कपड्यांवरही जेव्हा दोन खिसे आवर्जून शिवले जातात तेव्हा त्या खिशांच्या ड्रेसमुळे मुलींची कॉलर ताठ झाल्यावाचून राहात नाही. कुर्ती, स्कर्ट, पंजाबी ड्रेसेसच्या सलवारींना खिसे जोडण्याची फॅशन नवी नाही, पण तरीही या फॅशनचाही एक खास असा चाहतावर्ग स्त्रियांमध्ये असल्याचं दिसतं. आपल्या कपड्यांमध्ये एखादा तरी खिसेवाला ड्रेस असावा अशी इच्छा अनेकींची असते. त्यामध्येही बरेचदा पॉकेटवाले डेनिम ड्रेसेस वगैरे घेऊन अनेकजणी ही इच्छा पूर्ण करतात. मात्र, काही स्त्रियांना पॉकेटवाले ड्रेसेस इतके आवडतात की त्या आपल्या रोजच्या वापरातल्या कुर्तीजनाही शिंप्याकडून वेगवेगळ्या स्टाईल्सचे खिसे जोडून घेतात. एकतर खिसा असला की चाव्या, छोट्या पर्स वगैरे कुठे ठेवायचे हा प्रश्नच उरत नाही, त्यामुळे सोयीसाठी अनेकजणी खिशांच्या कपड्यांनाच पसंती देतात.
साधारणत: 1800 च्या दशकांत, जेव्हा स्त्रियांनी समाजाच्या विरूद्ध जाऊन आपल्या अस्तित्त्वासाठी बंड पुकारलं तेव्हाच खरंतर फॅशनच्या जगतात हा मोठा बदल झाला होता, त्याचदरम्यान अशा क्रांतीकारी (बंडखोर) स्त्रियांच्या स्कर्ट्सला खिसे जोडण्यात आले होते. त्यानंतर 1954 मध्ये, जेव्हा महिलाही पुरूषांप्रमाणे पॅण्ट्स वापरू लागल्या होत्या, तेव्हा त्या पॅण्टसनाही खिसे लावण्यात आले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्टिीअन डायोर यांना एका व्यक्तीनं म्हटलं होतं, ‘पुरूषांना सोयीचे म्हणून खिसे जोडले जातात आणि बायकांच्या कपड्यांवर सजावट, सुशोभनार्थ म्हणून खिसे जोडले जातात.
फॅशनच्या दुनियेत स्त्रियांच्या कपड्यांवर खिसे सुसज्ज झाले खरे मात्र तरीही अनेक महिलांचा खिशांबद्दल दृष्टीकोन काहीसा संदिग्धच राहिला. त्यादरम्यान बॅग्स, हॅण्डबॅग्स, पर्सेस वगैरेंचे मार्केटही खूप वेगाने विकसित होत होतं. त्यामुळे अनेक महिलांची पसंती पर्सेसलाच मिळाली. असं असले तरीही, खिसाप्रेमी महिलांचा एक विशिष्ट वर्गही यानंतर आजतागायत दिसतो.
आपल्या ड्रेसला आवर्जून खिसे जोडून घेणार्या निवडक महिला आजही दिसतात. मात्र तरीही, अलिकडे जीन्सच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या वापरामुळे स्त्रियांना खिसे असलेल्या ड्रेसेसची फारशी गरज वाटत नाही हे देखील खरं.
बॉलीवूडमध्ये तर अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनीही खिसेवाल्या ड्रेसेसचा किमान एकदा तरी कोणत्या ना कोणत्या चित्रपटात वापर केलेलाच आहे हे देखील लक्षात घ्यायला हवं.
डंग्री म्हणा, स्कर्ट म्हणा किंवा डेनिमचा स्कर्ट, खिसे असलेले कपडे घालून मिरवायची मजा काही न्यारीच असते हे दीपिका पदुकोणकडे पाहिलं तरीही तुमच्या लक्षात येईल. कंगना, अनुष्का या नव्या काळातल्या तर झीनत, टीना मुनीम यांनीही त्या काळी असे कपडे वापरले आहेत. अर्थातच हा फॅशन ट्रेण्ड पुढेही असाच कायम लोकप्रिय राहील यात शंका नाही...