आपल्या शहरापासून दूर जावून पावसाळा एन्जॉय करायचाय? मग थेट कोलकाता गाठा. पावसाळ्याची वेगवेगळी रूपं अनुभवायला मिळतात इथे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:22 PM2017-07-19T18:22:38+5:302017-07-19T18:25:33+5:30
पावसाळी पर्यटनाच्या रूटीन ठिकाणांपेक्षा वेगळी ठिकाणं पाहायची असतील तर थेट कोलकाता गाठा.
- अमृता कदम
रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आवाज गाड्यांच्या कर्कश हॉर्नमध्ये विरु न जातोय. काळ्या मेघांनी आकाश दाटल्यावर मनात छान आठवणी दाटून येण्याऐवजी आज आॅफिसला प्रवास कसा करायचा याची चिंता लागलीये. याचा अर्थ तुम्ही अशा शहरात राहताय जिथे तुम्हाला पावसाची मजा अनुभवता येणार नाही. शहराचा हा झगमगाट बाहेर सोडून किमान आठवडाभरासाठी तरी पावसाचा आनंद लुटायला बाहेर पडा. पावसाळी पर्यटनाच्या रूटीन ठिकाणांपेक्षा वेगळी ठिकाणं पाहायची असतील तर थेट कोलकाता गाठा. या शहराच्या जवळपास अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की पावसाळा किती प्रकारानं तुम्हाला नवी उर्जा देत असतो.
कोलकत्तामधलं पावसाळी पर्यटन
अजोध्या हिल्स
हिरव्यागार टेकडीवर काळे ढग हलक्या पावसाचा वर्षाव करताहेत आणि पायथ्याला निळ्याशार पाण्याचा तलाव दिसतोय असं चित्र जर तुम्ही मनोमन रेखाटत असाल तर कोलकात्यातल्या पुरूलियाजवळचं ‘अजोध्या हिल्स’ हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. इथल्या जैवविविधतेचा आनंद लुटत ट्रेंकिग करण्यासाठी अनेक पॉर्इंटस इथे उपलब्ध आहेत. गोरगाबुरु हिल हे या रांगांमधलं सर्वोच्च शिखर तर त्यासाठी सर्वात उत्तम. शिवाय इथल्या अनेक टेकड्यांवरचे छोटे छोटे धबधबेही आनंद देतात. यातही इथला ‘बामनी’ धबधबा चुकवू नये असा. याला लागूनच खैराबेराचा तलाव आहे, जिथे तुम्हाला अत्यंत दुर्मिळ अशा पक्षांच्या निरीक्षणाची संधीही मिळेल. अजोध्या हिल्स कोलकात्यापासून 250 किमी अंतरावर आहेत. लालमती एक्सप्रेस किंवा हावडा- चक्रधरपूर एक्सप्रेस हा इथं पोहचण्याचा सर्वांत उत्तम मार्ग. बारभूम हे इथलं जवळचं स्टेशन आहे. अजोध्या हिल्सचं प्रवेशद्वार मानलं जाणाऱ्या बाघमुंडी गावापासून हे स्टेशन अवघ्या काही मीनिटांच्या अंतरावर आहे. बाघमुंडीत राहण्यासाठी अनेक बजेटमधली हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेस उपलब्ध आहेत. ताजपूर समुद्र, वाळूचे किनारे आणि सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा देखावा हे खरंतर लोकांचं आवडतं कॉम्बिनेशन आहे. पण खरे रसिक पावसळ्यातही समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. समुद्राच्या साक्षीनं पाऊस अनुभवण्यासाठी कदाचित ताजपूरसारखं दुसरं ठिकाण नाही. बंगालच्या खाडीत थोडं धाडस करून तुम्ही पावसासोबत उधाणलेल्या समुद्राच्या साक्षीनं लॉन्ग वॉक करु शकता. एका बाजूला दाड झाडी आणि सोबत लाटा शिवाय आजूबाजूला हजारो लाल खेकडेही तुम्हाला त्यांचा निवारा शोधत धावताना दिसतील. अगदीच सावध स्वभावाचे असाल तर बीचवरच्याच छोटेखानी हॉटेलमध्ये एखादं टेबल पकडून अगदी बसल्या बसल्याही तुम्हाला निसर्गाचे अनेक रंग अनुभवता येतील.