​डिजिटल विश्वातील वाढती अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 03:30 PM2016-11-03T15:30:02+5:302016-11-03T15:30:02+5:30

डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारे त्याने डिजीटल विश्व अंगिकारलेले दिसत आहे.

Growing nervousness in the digital world | ​डिजिटल विश्वातील वाढती अस्वस्थता

​डिजिटल विश्वातील वाढती अस्वस्थता

Next
ong>-Ravindra More

डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारे त्याने डिजीटल विश्व अंगिकारलेले दिसत आहे. मात्र, या डिजिटलचा अतिवापर घातक ठरत असून, जवळपास सर्वचजण डिजिटल जगाचे गुलाम म्हणजेच आॅनलाईन व्यसनाचे बळी ठरत आहेत. आजच्या सदरात आपण या डिजिटल विश्वातील वाढती अस्वस्थता, ताणतणाव काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करावी याबाबत जाणून घेऊया...

संशोधनानुसार आपल्याजवळ जर मोबाईल नसला तर बरेच प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. त्यात आपल्या घराऐवजी आॅनलाइन विश्वात काय चाललंय याबद्दल अधिक रस वाटणे, सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याचा मोबाइल डाटा चालू करणे, आॅनलाईन बोलण्यात आनंदाचा आभास होणे, कुणी तुमच्याशी आॅनलाईन बोलत असताना पलीकडून पटकन रिप्लाय आला नाही किंवा कोणी आनलाईन भेटले नाही तर तुम्हाला वाईट किंवा अस्वस्थ वाटणे, आभासी जगातील तुमचा 'मी' हा वास्तवातल्या 'मी' वर कुरघोडी करणे, तुमचे शेवटचे प्रत्यक्ष फेस टू फेस (फेसबुकवर नव्हे) चांगले बोलणे कुणाशी झाले हे आठवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागणे, यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही डिजिटल विश्वामुळे अस्वस्थ झाले आहेत असे समजायला काही हरकत नाही.

तंत्रज्ञान आपले आयुष्य सोपे बनवते; पण आपण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने तणावाला निमंत्रण देतो आणि दुखणे विकत घेतो. मला किती 'लाईक्स' मिळाले? एखादा 'सेल्फी' घेऊन आपण कुठे आहे हे इतरांना दाखवू, त्याने/तिने मला 'लाईक' का केले नाही? तिचे/त्याचे किती 'फॉलोअर' आहेत, ‘फ्रेंड’ आहेत? आणि माझे? हे आताचे प्रश्न, त्यातून येणारा ताण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने निर्माण झाले आहे. आॅनलाइन ताणतणावातून सुटका कशी करायची यासाठी काही उपाय बघूया. 

प्रत्यक्ष संवादास प्राधान्य :
बऱ्याचदा आपण आपल्या जिवलग मित्र / मैत्रिणींना एकमेकांना न भेटता संवाद साधण्यासाठी आनलाईनवर विश्वास ठेऊन फक्त चॅटिंगला महत्त्व देतो. मात्र, असे वारंवार केल्यास आपणास गरज असेल तेव्हा मात्र जोरदार धक्का बसू शकतो आणि तो पचवणेही कठीण जाईल. यासाठी एक छोटे काम करा. आपल्या मित्रांना फोन करा आणि चाय पे चर्चा करत भेट घेऊन प्रत्यक्ष संवादास प्राधान्य द्या. जेव्हा तुम्ही समोरासमोर बोलतात तेव्हा व्यक्तीच्या भावनांचा अंदाज चांगल्याप्रकारे घेता येतो. न बोलताही बऱ्याचदा डोळे, चेहरा, हावभाव यातून मनस्थितीचा वेध घेता येतो. आनलाईन चॅटिंग हा एक आभास असतो. संशोधकांनी सुद्धा मान्य केलंय की आभासी आनलाईन संवाद प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊच शकत नाही. तुमच्या वैयक्तिक संवादासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा आणि व्यक्त व्हा. तुम्हाला नक्कीच चांगले वाटेल. 

स्मार्टनेस कमी करणारा ‘स्मार्टफोन’
हा आपला मोठा गैरसमज आहे की स्मार्टफोन आपणास ‘स्मार्ट’ बनवत असतो. मात्र तसे नसून आपला आत्मविश्वास, आपला दृष्टिकोन आपणास स्मार्ट बनवितो. बऱ्याचजणांना या गैरसमजामुळेच स्मार्टफोनचे जणू व्यसनच जडले आहे. स्मार्टफोन आपल्यापासून दूर ठेवूच शकत नाही. मात्र स्मार्टफोनमुळे आपली निर्णयक्षमता कमी होत असते, तर सतत २४ तास सोबत असणारा मोबाइल विक्षिप्त वागणुकीबरोबर सायबर सिकनेस, फेसबुक डिप्रेशन इ. ला जन्म देत असतो. 

वास्तवतेची जाण ठेवा
मोबाइलच्या अतिवापरामुळे एका जागी बसूनही थकल्यासारखे वाटते. कारण तुमचे डोके सतत कशाततरी गुंतलेले असते. मोबाइलचे व्यसन लागलेला व्यक्ती वास्तवातील समस्येला भिडताना सैरभैर होण्याची शक्यता असते. वास्तव जगाशी संवाद तुटल्याने 'मी-माझे' याच जगात ते वावरतात, जिथे ते सतत त्यांचे आनंद, दु:ख, प्रतिक्रिया या आॅनलाईन मांडत असतात.

संशोधकांच्या मते, जर तुम्ही दिवसातील ७ तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोन, आयपॅड, कॉम्पुटरवर व्यतीत करत असाल तर सामाजिक भावनांचे जाळे असलेल्या मेंदूच्या भागाची हानी होऊ शकते. यातूनच मग तुमच्या आकलनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या थरापर्यंत जाण्यापेक्षा वास्तवात आणि या निसर्गाचा आनंद घ्या.


एकावेळी अनेक कामे नको
जगातील मानसशास्त्रज्ञांचे एकमत आहे की, एकावेळी अनेक कामे मानवासाठी योग्य नाहीत. मानवाच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत. काही मानसशास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की सतत आॅनलाइन राहणे आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व मेंदूतील रासायनिक अभिक्रिया बदलवते. त्यामुळे आपण चिडखोर, अधीर हेकेखोर होतो.

नव्या युगाचे नवे ‘डिजिटल’ आजार:
 * तुमच्या मोबाइलची बॅटरी कमी होते किंवा बंद पडते तेव्हा तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नोमोफोबिया ग्रस्त आहात.
 * जर तुमच्या खऱ्या​ किंवा कल्पित आजाराच्या लक्षणांसाठी तुम्ही इंटरनेटवर ‘सर्च’ करत असाल तर तुम्ही ‘सायबरकोंद्रिया’ चे बळी आहात.
 * मोबाइल रिंगटोन वाजत नसतानाही तुम्हाला तसा वारंवार भास होत असल्यास ‘फॅन्टम व्हायबे्रशन सिंड्रम’ चे तुम्ही शिकार आहात.
 * जर तुम्हाला इतरांना आॅनलाईन छळायला मजा येत असेल तर तुम्ही ‘आॅनलाइन डिसहॅबीटेशन सिंड्रम’ने ग्रस्त आहात. 
 * जर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट,अपडेट आॅनलाईन मांडत असाल तर तुम्ही ‘डिजिटल गोल्डफिश’ च्या जाळ्यात अडकला आहात.


नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुच नये असे नाही पण त्यावरच पूर्णत: अवलंबून राहणे धोक्याचे! सतत गुगल वापरणे आणि माहिती मिळवणे म्हणजे मोठे कर्तृत्व किंवा हुशारी नाही. माहिती आणि ज्ञान यातील फरक समजला तरी धन्य! माहितीच्या प्रचंड महासागरातील लाटेवर स्वार होऊन गटांगळ्या खाण्यापेक्षा त्याचा विधायक वापर करून प्रगतीकडे वाटचाल करणेच योग्य.

Web Title: Growing nervousness in the digital world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.