पावसाळ्यात चेहेरा मऊ, मुलायम आणि चमकदार राहाण्यासाठी करा घरगुती उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:31 PM2017-08-01T19:31:15+5:302017-08-01T19:38:58+5:30

पावसाळ्यात त्वचेची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात काही घरगुती लेप खूप परिणामकारक ठरतात. ते लावले तरी पावसाळ्यातल्या कुंद दमट ओल्या वातावरणात आपली त्वचा निरोगी राहून तेजस्वी आणि चमकदार दिसू शकते.

Healthy Skin in mansoon.. apply this home made face pack | पावसाळ्यात चेहेरा मऊ, मुलायम आणि चमकदार राहाण्यासाठी करा घरगुती उपाय.

पावसाळ्यात चेहेरा मऊ, मुलायम आणि चमकदार राहाण्यासाठी करा घरगुती उपाय.

Next
ठळक मुद्दे* पावसाळ्यातलं दमट हवामान त्वचेसाठी घातकच. त्वचेला जंतूसंसर्ग होवून त्वचा खराब होण्याचं कारण म्हणजे पावसाळ्यातलं वातावरण.* पावसाळ्यात त्वचेच आरोग्य उत्तम राखण्यासाठी बेसन, हिरवे मसूर, मेथ्या, कडूलिंब, बटाटा, मध, केळं यासारखे घटक उपयोगी पडतात.



- माधुरी पेठकर


पावसाळा ॠतू न आवडणारी व्यक्ती विरळच. अख्खा निसर्ग बदलवून टाकण्याची ताकद या पावसाळ्यातच असते. पावसाळा म्हणजे मौज, मजा, खाणं, भटकणं असं भरपूर काही असतं. पण पावसाळा म्हणजे आजार हे समीकरणही रूढ आहे याचा विसर पडायला नको. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होतात. पोटाचे विकार बळावतात. तसेच पावसाळ्यात त्वचाविकारही होतात. मरूम, फुणसे,फोड यासारखे विकार त्वचेला याच काळात होतात.
पावसाळ्यातलं दमट हवामान त्वचेसाठी घातकच. त्वचेला जंतूसंसर्ग होवून त्वचा खराब होण्याचं कारण म्हणजे पावसाळ्यातलं वातावरण. आता पावसाळ्यात हे वातावरण आपण बदलवू शकत नाही. पण या वातावरणात तग धरू शकेल अशी ताकद आपण आपल्या त्वचेला नक्कीच देवू शकतो. पावसाळ्यात त्वचेची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात काही घरगुती लेप खूप परिणामकारक ठरतात. ते लावले तरी पावसाळ्यातल्या कुंद दमट ओल्या वातावरणात आपली त्वचा मात्र तेजस्वी आणि चमकदार दिसू शकते.

 



1 बेसन, मध आणि ग्रीन टी.
हा लेप तयार करताना बेसन, मध, ग्रीन टी आणि रोज हिप आॅइल यांचा वापर करावा. तीन चमचे बेसन, एक चमचा मध, लेप मऊ करण्यासाठी दोन तीन चमचे ग्रीन टीचं पाणी आणि चार पाच थेंब रोज हिप आॅईल घालावं. आणि हा लेप चेहेर्याला लावावा. अर्धा तास ठेवून पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा.
बेसनामुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचेवरचे ब्लॅक हेडस निघतात. मध हे त्वचेला मॉश्चरायजर मिळायला तसेच त्वचा निर्जंतुक करण्यासही उपयोगी पडतं.
 

2) बटाटा लिंबू आणि गुलाबपाणी
पावसाळ्यात अनेकांच्या चेहेर्यावर डाग पडतात.हे डाग घालवण्यासाठी बटाटा हा उत्तम असतो. बटाटा किसून त्याचा रस काढावा. त्यात एक छोटा चमचा लिंबाचा रस आणि थोडसं गुलाबपाणी घालावं. बटाट्यामुळे चेहेर्यावरचे डाग जातात. गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो तसेच डागांभोवतीचा लालसरपणा आणि काळेपणा कमी होण्यास मदत होते. हा लेप लावून अर्धा तास वाळू द्यावा. नंतर पाण्यानं धुवावा.
 

3) घरगुती पावडर 

चेहेरा धुण्यासाठी साबण वापरण्याऐवजी घरगुती पावडर वापरावी. त्यासाठी हिरवे मसूर, चणा दाळ, मेथ्या यांचा वापर करावा. हिरवे मसूर, चणा दाळ हे समप्रमाणात घेवून त्याच्या निम्म्या प्रमाणात मेथ्या घ्याव्यात. ते एकत्र वाटावं. लेप तयार करताना ती पावडर घेवून ती गुलाब पाण्यात भिजवावी. आणि संपूर्ण अंगाला साबणाऐवजी या पावडराचा लेप लावून आंघोळ केल्यास त्वचेचा पोत सुधारतो. आणि साबणामुळे होणारी त्वचेची हानी टाळली जाते. हा लेप पावसाळ्यातच नव्हे तर कायमस्वरूपीही वापरता येतो.

 

4)  चंदन पावडर

त्वचेचा काळेपणा काढण्यासाठी एक चमचा चंदन पावडर , दूध पावडर आणि संत्र्यांच्या सालाची पावडर घ्यावी. त्यात लवेंडर आॅइलचे दोन तीन थेंब घालावेत. दही घालून लेप तयार करावा. त्यात थोडं लिंबू पिळावं. आणि हा लेप चेहेर्याला लावावा. पंधरा मीनिटं वाळू द्यावा. आणि नंतर पाण्यानं धुवावा.

5)  पिकलेलं केळ 

पिकलेलं केळ कुस्करावं. त्यात एक चमचा व्हेजिटेबल आॅइल घालवं. आणि हे मिश्रण चेहेर्यास लावावं. पंधरा वीस मीनिटं लेप वाळू द्यावा. नंतर पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा.

6) कडूलिंबाची पानं

पावसाळ्यात चेहेर्यावर फुणसे आणि फोड येतात ते फुटतात आणि त्वचेची आग होते. हा त्रास घालवण्यासाठी कडूलिंबाची पानं घ्यावी. ती धुवून घ्यावी . ती वाटावी. त्यात पचौली आॅइलचे तीन चार थेंब घालावेत. त्यात थोडं लिंबू पिळावं. आणि थोडा लसूण किसून घालावा. हे मिश्रण वाटून एकजीव करावं. आणि हा लेप चेहेर्यावर जिथे जिथे फुणसे, फोड आहे तिथे लावावा. वीस मीनिटं वाळू द्यावा. पावसाळ्यात हा लेप रोज लावल्यास फायदा होतो.

Web Title: Healthy Skin in mansoon.. apply this home made face pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.