तुमच्या मौल्यवान दागिन्यांची अशी घ्या काळजी; दीर्घकाळ टिकेल लकाकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 05:46 PM2018-11-29T17:46:21+5:302018-11-29T17:47:22+5:30
दागिने म्हटलं की, महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मग ते चांदीचे असो किंवा हिऱ्याचे. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ते नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु जेव्हा गोष्ट दागिन्यांची काळजी घेण्याची येते त्यावेळी आपण त्याकडे फार दुर्लक्ष करतो.
दागिने म्हटलं की, महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. मग ते चांदीचे असो किंवा हिऱ्याचे. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ते नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु जेव्हा गोष्ट दागिन्यांची काळजी घेण्याची येते त्यावेळी आपण त्याकडे फार दुर्लक्ष करतो. वेळोवेळी दागिन्यांची काळजी घेतली नाही तर त्यांची चमक कमी होते. वर्षानुवर्षे चांदी, सोनं, हिरे आणि मोत्यांचे दागिने व्यवस्थित ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो करणं फार गरजेचं असतं. जाणून घेऊया दागिन्यांची देखभाल करण्याबाबत...
सोन्याचे दागिने :
- सोन्याचे दागिने वेळोवेळी पॉलिश करण्याची गरज असते.
- सोन्याची चेन आणि बांगड्या कधीही एकत्र ठेवू नका. एकत्र ठेवल्यामुळे हे एकमेकांमध्ये अडकू शकतात आणि त्यामुळे हे तुटण्याचा धोका अधिक असतो.
- गोल्ड ज्वेलरी परिधान केल्यानंतर ठेवताना बॉक्समध्येच ठेवा.
हिऱ्यांचे दागिने :
- हिऱ्यांच्या दागिन्यांची फार काळजी घेणं गरजेचं असतं. घरातील काम करत असाल तर हे दागिने काढून ठेवणं गरजेचं असतं. कारण साबणामुळे हिऱ्यांची चमक कमी होते. हे स्वच्छ करण्यासाठी अमोनियाचा पाण्यासोबत एकत्र करून वापर करा.
- हेवी असो किंवा लाइट वेट हे दागिने नेहमी बॉक्समध्येच ठेवा. इतर दागिन्यांसोबत हे ठेवल्यामुळे हिऱ्यांवर डाग पडतात.
- हिऱ्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टुथपेस्टचाही वापर करू शकता.
- हिऱ्यांसोबत मोत्यांचं जडवकाम केलेले दागिने असतील तर ते जास्त वेळ अंधारात किंवा कोरड्या ठिकाणी ठेवू नका. त्यामुळे मोत्यांची चमक नाहीशी होते.
- हे दागिने आर्टीफिशिअल दागिन्यांसोबत ठेवू नका.
- जर तुम्ही एखाद्या समारंभासाठी हिऱ्यांचे दागिने परिधान करणार असाल तर परफ्यूमचा वापर करू नका. यातील केमिकल्स हिऱ्यांची चमक नष्ट करतात.
मोत्याचे दागिने :
- मोत्यांच्या दागिन्यांची खास देखभाल करण्याची गरज असते. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे किंवा जास्त गरम वातावरणात ठेवल्यामुळे हिऱ्यांची चमक फिकी पडते. ज्यामुळे हे रंगहिन होतात.
- हे परिधान केल्यानंतर एखाद्या मुलायम कपड्याने स्वच्छ करा. त्यानंतर सुकवून एयरटाइट डब्ब्यामध्ये बंद करून ठेवा.
- हे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा किंवा ब्लीचचा वापर करू नका. त्यामुळे मोती खराब होतील.
- नेहमी मेकअप केल्यानंतरच मोत्यांचे दागिने परिधान करा. मेकअप स्प्रे, हेअर स्प्रे किंवा परफ्यूमपासून दूर ठेवा.
- मोत्यांचे दागिने नेहमी मलमलीच्या कपड्यामध्ये ठेवा. जास्त घामामुळेही हे दागिने खराब होतात.
चांदीचे दागिने :
चांदीचे दागिने फार लवकर काळे पडतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी पॉलिश करण्याची गरज असते. यांची चमक तशीच ठेवण्यासाठी त्यांवर टूथपेस्ट लावून ठेवा आणि थोड्या वेळाने ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. स्वच्छ आणि नरम कपड्याने पुसून ठेवा.
कुंदन ज्वेलरी :
कुंदन जडवलेले दागिने फार सुंदर दिसतात. हे स्पंजच्या सहाय्याने किंवा कापसाच्या मदतीने प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवा. यामुळे स्टोनचा रंग तसाच राहण्यास मदत होते.