पावसात ‘कसे’ कपडे घालताय तुम्ही?-जरा सांभाळा..
By Admin | Published: June 16, 2017 01:54 PM2017-06-16T13:54:51+5:302017-06-16T13:54:51+5:30
आपले कपडे पावसाळ्यात आपल्या तब्येतीचं गणित बिघडवू शकतात.
- नेहा चढ्ढा
पावसाळा आलाच आता, त्यात मान्सून सेल लागतील. मान्सून फॅशन्सच्या चर्चा सुरु होतील. मात्र आपल्याकडच्या पावसाळ्यात कसे कपडे घालावेत याचा योग्य विचार केला नाही तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होवू शकतो. आपल्या त्वचेवर होतो. त्वचाविकार होतात. कपडे ओले राहिल्यानं इन्फेक्शन्स वाढतात. त्यातून आजारपणं येतात. आणि आपण मात्र फॅशनच्या पलिकडे कपड्यांचा विचार करत नाही. खरंतर आपल्या ऋतूमानाप्रमाणं कपडे घालणं, त्यातून आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत साधं सूत्र आहे. मात्र ते लक्षात न घेता अनेकदा पावसाळी पेहराव केले जातात. आणि त्यानं तब्येतीवर मात्र वाईट परिणाम होतात. म्हणून काही साध्या गोष्टी या पावसाळ्यात लक्षात ठेवलेल्या चांगल्या.
१) व्हाईट इज नो राईट हे लक्षात ठेवलेलं बरं. पांढऱ्या कपड्यांचं प्रेम मान्य. ते अनेकांना आवडतातच. मात्र आपल्याकडच्या पावसाळ्यात, चिखलात, प्रवासात पांढरे कपडे घालणं म्हणजे सगळे डाग स्वत:सोबत घेवून फिरणं. ते वाईट दिसतंच.पण ते डाग निघत नाहीत. आपण दिवसभर तसेच कपडे घालून वावरत राहतो. परिणाम त्यातून आपल्याला जंतूसंसर्ग होवू शकतो. दुर्गंध येतो तो वेगळाच. म्हणून शक्यतो पांढरे कपडे नकोत.
२) जिन्स तर पावसाळ्यात अजिबात घालू नये. अनेकांना वाटतं की जिन्स घालणं सुटसुटीत. पावसात सोयीचं पण ते चूक आहे. पावसात भिजलं तर या पॅण्ट्स लवकर वाळत नाहीत. ओल्याच राहतात. त्यात अंगाला घट्ट असतात. त्यातून जंतूसंसर्ग होतो. त्वचाविकार होतात. म्हणून पावसाळ्यात जिन्सला सुटी देणं उत्तम.
३) लेदरच्या जॅकेट्सचं, बॅगचंही असंच. या वस्तू पाण्यात भिजतात. वाळत नाही. ओल कायम राहते. ते टाळायला हवं.
४) लूज कपडे घालणं उत्तम. पण पायघोळ नकोत. कपडे लवकर वाळतील, सैलसर असतील असं कापड वापरणं उत्तम.
५) रबरी चपलांचंही तेच, त्या कितीही सोयीच्या वाटत असल्या तरी त्यानं टाचदुखी, पायदुखी वाढू शकते. त्याऐवजी चांगल्या वॉटरप्रुफ चपला वापरायला हव्यात.