मुलींसाठी अनारकली तर मुलांसाठी मनारकली. पुरूषांच्या फॅशन विश्वात इण्डो वेस्टर्न स्टाइलचा धमाका.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 07:31 PM2017-08-11T19:31:55+5:302017-08-11T19:37:39+5:30
फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात.
- मोहिनी घारपुरे- देशमुख
अनारकली ड्रेसेसने ज्याप्रमाणे गेल्या काही काळापासून महिलांच्या वॉर्डरोबमध्ये आपली जागा निर्माण केली त्याप्रमाणेच आता पुरूषांसाठीही अनारकली ड्रेसेसची फॅशन आली आहे. तूर्तास या ड्रेसला फॅशन विश्वानं मनारकली असं टोपणनाव दिलं आहे.
फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांनी नुकताच दिल्लीमध्ये फॅशन शो केला. यावेळी पुरूष मॉडेल्सच्या अंगावर हे मनारकली ड्रेसेस झळकत होते. फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात असे यावेळी या डिझायनर्सनं सांगितले.
बाजीराव पेशवा या चित्रपटात रणबीर सिंहने घातलेले, रॉयल, मुघल अपील देणारे हे मनारकली ड्रेसेस सध्या फॅशन जगतात इन आहेत. विशेषत: सणसमारंभांमध्ये हे ड्रेसेस घालून पुरूष मिरवू शकतात. लग्नसराईच्या काळात या प्रकारच्या कपड्यांना विशेष मागणी येत आहे हे विशेष!
इण्डो वेस्टर्न स्टाइल
पुरूषांच्या फॅशन दुनियेत इण्डो वेस्टर्न स्टाइल आघाडीवर आहे. आघाडीचे डिझायनर असलेले कुणाल रावल यांनी गेल्या वर्षाखेरीस नव्या स्टाइल्सचे शॉर्ट हेम्ड कुर्ताज पुरूषांसाठी लाँच केले. त्यानंतर ते अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. हे कुर्ते पुरूषांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास झळकताना दिसतात. मात्र असे असले तरीही या कुर्त्यांच्याबरोबर नेमकं काय घालावं, नेमकी कधी कोणती स्टाईल करून हे कुर्ते वापरावेत हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
सध्याच्या काळात पुरूषांच्या फॅशन जगतात अशा प्रकारचे कुर्ताज देखील खूप इन आहेत. स्ट्रेट बॉटम, राऊंड बॉटम किंवा प्लॅकेट कुर्ता (मानेखाली बटन्सची लाईन असलेला कुर्ता) यांपैकी प्रत्येकच प्रकाराला मागणी आहे. हे शॉर्ट कुर्ता घालून त्यावर एखादी बंडी, स्लीव्हलेस जॅकेट घालायचे आणि त्याखाली पटीयाला किंवा ब्रीच पॅण्ट्स किंवा चुडिदार घातली की पारंपरिक आणि आधुनिक असा दोन्हीही लुकचा मिलाफ साधला जातो. किंवा डेनिम आणि स्नीकर्स वर शॉर्ट कुर्ता आणि बंडी घातली तरीही छान दिसते. इंडो वेस्टर्न लुकसाठी कुर्तीवर ब्लेझर, चिनोज घातलं जातं.
इंडो वेस्टर्न लूक कॅरी करताना..
1) अशा काँटेम्पररी लुकबरोबर पायात मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल घाला.
2) सिम्पल, शॉर्ट स्टोल्सदेखील घेता येतील. त्यानं लुक एकदम रिच दिसेल.
3) काँटेम्पररी लुक साधण्यासाठी या बंडींचा वापर वेगवेगळ्या स्टाईलनं करता येईल. फक्त कपड्याचा पोत आणि योग्य रंग निवडता यायला हवा.