सुखकर प्रवासासाठी फक्त एवढं करा!
By admin | Published: April 6, 2017 09:23 PM2017-04-06T21:23:05+5:302017-04-06T21:23:05+5:30
कोणत्याही ट्रिपचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवास. प्रवासावरच संपूर्ण ट्रिपचा मूड अवलंबून असतो. प्रवासाची छोटी मोठी तयारी करताना जर नीट नियोजन केलं नाही तर सहल राहते
कोणत्याही ट्रिपचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवास. प्रवासावरच संपूर्ण ट्रिपचा मूड अवलंबून असतो. प्रवासाची छोटी मोठी तयारी करताना जर नीट नियोजन केलं नाही तर सहल राहते बाजूला,कटकटींनाच तोंड द्यावं लागतं. असं होवू नये म्हणून प्रवासाच्या आधी काही सोप्या गोष्टी करा. परीक्षा संपू लागल्या आहेत आणि सुट्टयांचा मौसम सुरु होतोय. अनेकांनी सुटीमध्ये एखादी ट्रिप प्लॅन केली असेल. काहींनी दुसऱ्या राज्यामध्ये किंवा परदेशी प्रवासाचेही लांबलचक बेत आखले असतील. काही जणांसाठी लांबवर प्रवास करण्याची पहिलीच वेळ असू शकते तर हौशी भटके ‘एकला चलो रे’ म्हणत प्रवासाला निघतील. आपल्या नेहमीच्या धावपळीतून काही निवांत क्षण मिळवण्यासाठी फिरण्यासारखा पर्याय नाही. पण प्रवासाची छोटी-मोठी तयारी करताना जर नीट नियोजन नाही केलं तर आनंद आणि निवांतपणापेक्षा कटकटीच उद्भवू शकतात. कोणत्याही ट्रिपचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रवास. तो कसा होतो यावर संपूर्ण ट्रिपचा मूड अवलंबून असतो म्हणूनच प्रवास सुखकर करण्याकडे भर द्यावा. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतात. 1.नेहमीचे ठरलेले टूरिस्ट स्पॉट धावत-पळत पाहण्यापेक्षा तुम्ही ज्या ठिकाणी प्रवासाला जात आहात ते शहर, ते ठिकाण जास्तीत जास्त एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा. तिथली संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या ठिकाणच्या संस्कृतीचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे खाणं. त्यामुळे हॉटेलमध्ये पंजाबी, चायनीज,साउथ इंडियन हे एवढ्याच प्रकारचे पदार्थ खाण्यापेक्षा लोकल क्युझिन्स ट्राय करा. या सगळ्यासाठी तिथे आधी जाऊन आलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना तिथली माहिती विचारा. 2. तुम्ही जर परदेशी प्रवासाला जात असाल, तर सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पासपोर्टची एक्सपायरी डेट आधी तपासून पहा. काही देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान सहा महिन्यांची व्हॅलिडिटी असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे निघण्याच्या आधी तुम्हाला व्हिसा काढणं गरजेचं आहे की नाही याचीही चौकशी करा. त्याचप्रमाणे परदेशी प्रवासात तिथल्या चलनाबद्दलही योग्य प्रकारे माहिती करून घ्या. 3. परदेशी प्रवासाला निघताना तुमचा पासपोर्ट, व्हिसा, प्रवास विमा यांचे फोटो काढून स्वत:लाच मेल करून ठेवायला विसरु नका. समजा यातलं काहीही गहाळ झालं तर हा खबरदारीचा उपाय! 4. काही कॅश तसेच एखादं क्र ेडिट कार्ड तुमच्या पर्स किंवा पाकिटाव्यतिरिक्त तुमच्या ट्रॅव्हल बॅगच्या एखाद्या चोरकप्प्यात किंवा तुम्हाला सोयीच्या दुसऱ्या ठिकाणी ठेवायला विसरु नका. दुर्दैवानं गर्दीच्या ठिकाणी पर्स/पाकिट चोरीला जाणं किंवा हरवणं असा प्रसंग ओढावला तर परक्या ठिकाणी फजिती व्हायला नको. 5. नवीन ठिकाणी बऱ्याचदा भाषेमुळे अडचण येण्याची शक्यता असते. सगळीकडेच हिंदी किंवा इंग्लिश कामी येईलच असं नाही. त्यातही खाद्यपदार्थ, रस्त्यांची नावं, स्थळांची नावं याबाबत अडचण येऊ शकते. अशावेळी उत्तम उपाय म्हणजे गुगल ट्रान्सलेटर डाऊनलोड करून ठेवावा. निदान बेसिक शब्दांच्या बाबतीत तरी अडचण उद्भवत नाही. 6.विमानानं प्रवास करणार असाल तर लगेज अलाऊन्सची माहिती घ्या आणि शक्यतो चार्जर्स, कॅमेरा, टॅब यांसारख्या वस्तू आपल्या हँडबॅगमध्येच ठेवा. आपल्याला जेवढं सामान घेण्याची आवश्यकता वाटत असते, त्यापेक्षा नि:शंकपणे थोडं कमी सामान पॅक केलंत तरी चालेलं. कारण बऱ्याचदा बाहेर पडल्यावर आपण नको त्या ओझ्याच्या वस्तू घेतल्याची जाणीव होत राहते. एका छोट्या डायरीमध्ये आपल्या गरजेच्या सामानाची यादी करु न ठेवा. म्हणजे हॉटेल सोडताना आपल्या सर्व वस्तू आपण नीट घेतल्या आहेत ना याची चेकलिस्ट बनवता येऊ शकते. 7.हवा-पाण्यातील बदलामुळे काही जणांना प्रवासामध्ये सर्दी-पडसं, पोटदुखी किंवा पोट बिघडणं अशा तक्र ारी उद्भवू शकतात. त्यामुळेच प्रवासाला निघण्याच्या आधी एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरांना भेटून किरकोळ दुखण्यांवरची गोळ्या-औषधं बरोबर ठेवावीत. तुम्ही जर ट्रेकिंगला किंवा जंगलात कँपिंगला वगैरे जात असाल तर जवळ फसर््ट एड बॉक्सही ठेवावा. 8.धावतपळत सगळीच्या सगळी प्रेक्षणीय स्थळं बघण्यापेक्षा मोजक्या आणि निवडक ठिकाणी निवांतपणे फिरा. जे बघणं आवश्यक आहे, अशा ठिकाणांना जास्त वेळ द्या. अनेक पर्यटन स्थळांना भेट दिल्यावर कळतं की बघण्यासारखी मोजकीच दोन-चार ठिकाणं आहेत. बाकीची उगीचंच गाईड आणि पर्यटन विभागानं केलेली भरती असते! त्यामुळे प्रवासाला निघण्याआधी आपण जात असलेल्या ठिकाणांचा थोडा अभ्यास करा. आधी जाऊन आलेल्या लोकांशी बोला आणि मगच तुमची ‘वॉच लिस्ट’ पक्की करा. 9. शेवटची पण सगळ्यात जरूरीची सूचना. बाहेर पडल्यानंतर आपल्या सेलफोनमधून डोकं थोडं वर काढा आणि आजूबाजूच्या जगाशी एकरु प होण्याचा प्रयत्न करा, अनेकदा फोनवर सेल्फी घेऊन लवकरात लवकर आपला फोटो शेअर करण्याच्या फंदात त्या पर्यटनस्थळाची माहिती घेणं, त्याचा आस्वाद घेणं आपण विसरून जातो. आणि सोबत फक्त फोटोच घेऊन येतो. शिवाय कधीकधी हा फोटोंचा अतिनाद जीवावर बेतल्याच्याही घटना आपण वाचतो, ऐकतो. प्रवासाला आपण निघतो आनंदाचे क्षण गोळा करण्यासाठी. त्यामुळेच छोट्या-छोट्या गोष्टींची खबरदारी घेतली तर प्रवास सुखाचाही होतो आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभवही मिळतो.