पाठीवरील मुरुमांमुळे आहात त्रस्त, वाचा हे उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:55 AM2017-07-24T11:55:46+5:302017-07-24T11:55:46+5:30
चेह-यावरील मुरुमांच्या समस्याप्रमाणेच पाठीवर येणा-या मुरुमांमुळेही बहुतांश लोकं त्रासलेले असतात. पाठीवर मुरुमं येणे ही देखील एक मोठी समस्या आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - चेह-यावरील मुरुमांच्या समस्याप्रमाणेच पाठीवर येणा-या मुरुमांमुळेही बहुतांश लोकं त्रासलेले असतात. पाठीवर मुरुमं येणे ही देखील एक मोठी समस्या आहे. पाठीवर येणा-या मुरुमांना बॅक अॅक्ने असंही म्हणतात. पाठीवरील मुरुमांमुळे हवे तसे कपडे, फॅशन करायला मिळत नाही, अशी ब-याच महिलांची तक्रार असते. साधारणतः पाठीवरील मुरुमं दिसत नाहीत, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत घाम व धुळीमुळे मुरुमं भयानक स्वरुपात दिसू लागतात.
पाठीवरील मुरुमांची समस्या अधिकतर महिलांमध्ये दिसून येते. एका सर्व्हेक्षणानुसार, 20 वयोवर्षातील 50 टक्के महिला आणि 40 टक्के पुरुष या समस्येमुळे हैराण असतात. ही समस्या कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहूया. यामुळे तुमची ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. पाठीवरील मुरुमांची समस्या साधारणतः कमी पौष्टिक खाल्ल्यानं, अधिक प्रमाणात तिखट पदार्थाचं सेवन केल्याने व मानसिक तणावामुळे उद्भवते. याशिवाय गर्भावस्थेदरम्यान व मासिक पाळीत शरीरातील हार्मोन्स बदलतात,यामुळेदेखील पाठीवर मुरुमं येतात.
1. जवाचे पीठ
पाठीवरील मुरुमांची समस्या मुळापासून नष्ट करायची असल्यास जवाचे पीठ बरेच फायदेशीर आहे. जवाचे पीठ शिजवून त्यात मध टाकून मिश्रण तयार करावे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण पाठीवर लावावे व अर्धा तास ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे
2. कोरफडीची लेप
एका वाटीत कोरफडीचा लेप घ्यावा त्यात टोमॅटो वाटून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मुरुमं असलेल्या जागेवर अर्धा तास लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुऊन पाठ स्वच्छ करुन घ्यावी.
3. तुळस-पुदिन्याचा लेप
तुळस-पुदिन्याचा लेप लावल्यानंही पाठीवरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. एका भांड्यात तुळस-पुदिन्याच्या पानं घेऊन त्यात थोडीशी हळद व मुलतानी माती मिळवून लेप तयार करावा. हा लेप पाठीवर 15 मिनिटं लावून ठेवावा व कोमट पाण्यानं पाठ स्वच्छ धुवावी.
4. फळं-हिरव्या भाज्या खाव्यात
याशिवाय आहारात फळं व हिरव्या भाज्यांच्या समावेश वाढवावा. पाणी अधिक प्यावे. या उपायांमुळे नक्कीच पाठीवर येणा-या मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल.