सकाळी सुंदर दिसायचंय मग रात्री या गोष्टी करण्याचा कंटाळा अजिबात करू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:34 PM2017-07-28T18:34:12+5:302017-07-28T18:44:54+5:30
सुंदर दिसण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ चेहेºयावर नुसते मेकअपचे थर देवून चालत नाही. तर आधी झोपण्याआधी थोडा वेळ देवून आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं.
- माधुरी पेठकर.
दिवसभर काम करून थकल्यानंतर आपलं शरीर आणि मन थकतं. हा थकवा दूर करण्यासाठी कोणी रात्री झोपण्याआधी आरामशीर बसून थोडा वेळ टी.व्ही बघतं, कोणी पुस्तक वाचतं, कोणी गप्पा मारतं तर कोणी एकटं बसून गाणी ऐकतं. आता प्रत्येकाच्या आरामाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. जो तो त्या त्यानुसार आपल्या शरीर मनाला रिलिफ देण्याचा प्रयत्न करत असतो. पण दिवस संपत असताना आपण कधी स्वत:ला नीट आरशात बघितलं का? नीट बघितलं तर आपण थकलेलो वाटत असतो आणि आपली त्वचा ही मलूल झालेली दिसते. त्वचेच मलूल होणं म्हणजेच त्वचेचा थकवा.
त्वचेला थकवा येण्यामागे मनावरचा ताण, ऊन वारा पावसाचा परिणाम, मेकअप आणि दुर्लक्ष अशी अनेक कारणं असतात. पण या सर्व कारणांमुळे दिवसअखेर आपली त्वचाही थकत असते हे आधी मान्य करावं. हा थकवा दूर केला नाही तर त्याचा परिणाम दुसर्या दिवशी आपल्या दिसण्यावर होतो. सुंदर दिसण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ चेहेर्यावर नुसते मेकअपचे थर देवून चालत नाही. तर आधी झोपण्याआधी थोडा वेळ देवून आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसाठी काही गोष्टी नियम म्हणून केल्या तरच दुसर्या दिवशी दिवसभर प्रसन्न, उत्साही आणि सुंदर दिसण्यात आपली त्वचाही पुढाकार घेते.
रात्री झोपण्यापूर्वी
* बाहेरून, कामावरून, घरातलं काम करून किंवा एखादा कार्यक्रम अथवा समारंभाला जावून आल्यानंतर कितीही थकवा वाटत असला तरी चेहेर्यावरचा मेकअप काढायचा कंटाळा करू नये. रात्रभर मेकअप तसाच ठेवला तर त्वचेवर त्याचे वाईट परिणम होतात. त्वचा खराब होते. त्वचेला मोकळा आणि नैसर्गिक श्वास घेण्याची संधी मिळत नाही. मेकअपमुळे त्वचेला संसर्ग होण्याचीही भिती असते. त्यामुळे बाजारात मेकअप काढणारे पॅडस मिळतात त्याचा आणि मिसेलर वॉटरचा उपयोग करून चेहेर्यावरचा मेकअप काढता येतो. किंवा आॅलिव्ह आॅइलनंही मेकअप काढता येतो.कसाही काढा पण झोपण्याआधी चेहेर्यावरचं मेकअपचं ओझं उतरणं गरजेचं असतं.
* रात्री झोपण्यापूर्वी रोज चांगल्या क्लिन्जरनं आपला चेहेरा स्वच्छ करावा. यामुळे चेहेर्यावरच्या त्वचेवरची धूळ स्वच्छ होते, तेलकटपणा निघून जातो. तसेच त्वचेची रंध्र मोकळी होतात. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य ते क्लिन्जर निवडून आपण ही काळजी घेवू शकतो.
* दिवसा बाहेर जातना चेहेर्याला लावयला जसं आपण एखादं क्रीम ठेवतोच. तसंच रात्री चेहेर्याला लावायचं क्रीम असणं त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. रात्रीच्या क्रीममध्ये प्रामुख्यानं मॉश्चरायझिंग घटक असतात. त्यामुळे त्वचेला हवा असलेला ओलावा या नाइट क्रीममधून मिळतो. या क्रीममुळे त्वचेच्या पेशींना बळ मिळते.
* डोळ्यांखालची वर्तुळ, काळसरपणा किंवा सूज यामुळे सौंदर्यास बाधा येते. ही डोळ्याखालची त्वचा सुदृढ करायची असल्यास रात्री झोपण्याआधी डोळ्यांखाली आय क्रीम लावावं. या क्रीममुळे डोळ्याखालची त्वचा कोरडी पडत नाही त्यामुळे डोळ्याखाली वर्तुळ किंवा सुरकुत्या पडत नाही.
* त्वचा निरोगी आणि सुदृढ करायची असेल तर त्वचेला मेकअपची नाही तर नैसर्गिक घटकांच्या लेपाची गरज असते. या लेपामुळे त्वचा स्वच्छ होण्यासोबतच तजेलदार आणि निरोगीही होते. त्यामुळे आपल्या त्वचेला चालणारे नैसर्गिक घटक माहिती करून त्याचा लेप रात्री झोपण्यापूर्वी दहा पंधरा मीनिटं लावावा. सुकल्यावर तो धुवून मग त्वचेला नाइट क्रीम लावून झोपावं. लेप लावणं रोज जमलं नाही तरी आठवड्यातून दोनदा तरी त्वचेसाठीहा उपाय करायलाच हवा.
* शांत आणि पुरेशी झोप हा शरीर मनाच्या थकव्यासोबतच त्वचेचा थकवा दूर करणारा सोपा उपाय आहे. रोज आपली झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्यायला हवं.